Set 1: मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध – Mi Pahilela Cricket Cha Samna Nibandh Marathi

आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. ‘संघ अ’ आणि ‘संघ ब’ असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते.

सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. ‘अ’ संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर ‘ब’ संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते. एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते.

अखेरीस ‘संघ अ’ विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

Set 2: मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध – Mi Pahilela Cricket Cha Samna Nibandh Marathi

कसोटी मालिका आणि एक दिवसीय क्रिकेट सामने आम्ही पाहतो ते दूरचित्रवाणीवर आमच्या गावात हे सामने कसे होणार ? पण शहरात असे सामने सुरू झाले की आजुबाजूच्या गावातील मुलानाही सामन्यांची स्फूर्ती होते. असाच मी पाहिलेला, सामना रंगला होता.

सामना होता आमच्या शाळेच्या म्हणजे सेंट जोसेफ हायस्कूलच्या व न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांशी एक दिवसाचा सामना होता. सामन्याच्या सुरवातीला शुभशकुन झाला. आज आमच्या कप्तानाने नाणेफेक जिंकली. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रतिस्पर्धा करण्याची संधी दिली. सामन्याला मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली. प्रति स्पर्धा संघातील पहिले चार खेळाडू लवकर बाद झाले. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुसता जल्लोष चालवला होता.

पाचव्या आणि सहाव्या खेळांडूनी आपली जोडी जमवली. धावांचा आकडा सतत वाढत होता. गोलंदाज परोपरीने प्रयत्न करत होते, पण ती जोडी फुटण्याचे लक्षण दिसत नव्हते. कशीबशी त्यांच्यासाठी ठरवलेली षट्के संपली, पण धावांचा आकडा बराच फुगला होता.

आता आमचा संघ खेळायला उतरला. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे ? आमचे सलामी वीर अपेक्षेपेक्षा लवकर बाद झाले. धावांची संख्या फारच कमी होती. अतिशय दडपण आले होते. पण आमचा कप्तान मात्र मोठ्या धैर्याने आणि जबाबदारीने खेळत होता. त्याला साथ देणारे एक-दोघे बाद झाले. वीस-पंचवीस धावांचा फरक असताना आम्हाला पेच पडला, जिंकणार कोण ? शेवटी तीन धावा कमी होत्या व एक चेंडू राहिला होता.

श्वास रोखून सर्वजण सामना पाहत होते. गोलंदाजाने शेवटचा चेंडू टाकला आणि कप्तानाने जो टोला दिला तो चेंडू मैदानाच्या पार पलिकडे पडला. शेवटच्या षट्काराने आम्हाला विजय मिळवून दिला होता,

त्या सामन्यातील ‘सामनावीर’ होता आमच्या शाळेचा कप्तान संजीव जोशी. हर्षोल्हासात सर्व मुलांनी संजीवला खांदयावर घेऊन मैदानभर मिरवले. गुलाल उधळत सर्व गावात मिरवणूक काढली. त्याच्याच मुळे आज आमच्या शाळेची शान वाढली होती. असा हा विस्मरणीय सामना सर्वांच्या कायमचा स्मरणात राहिल.

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना निबंध – Mi Pahilela Cricket Cha Samna Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply