शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी निबंध – Shaletil Snehasamelan Essay in Marathi

नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही डिसेंबर महिन्यात आमच्या शाळेचे वार्षिक संमेलन झाले. मी ह्या वर्षी ‘पिपाणीचे सुर’ ह्या नाटकात भाग घेतला होता. तसेच मला चित्रकला स्पर्धेत बक्षीसही मिळाले होते. त्यामुळे मी ह्या स्नेहसंमेलनाची अगदी आतुरतेने वाट पाहात होतो. मी नाटकात काम करीत असल्यामुळे नाटक बघायला माझी आई, बाबा, आजी आणि ताई आले. त्यामुळे माझा आनंद अगदी द्विगुणीत झाला. मी अगदी तडफदारपणे माझे काम केले आणि सर्वांची वाहवा मिळवली. नाटकात काम करताना तोंडाला मेकअप लावतात. तो मेकअप तर काढूच नये असे मला वाटत होते. नाटक संपल्यावर बाहेर येऊन मिरवताना सगळेजण माझ्याकडे बोट दाखवून म्हणत होते, ” तो बघ… तो बघ… पिपाणीचे सुरमधला कार्तिकेय. ” लोकांनी तसे म्हटले की मला स्वतःबद्दल अभिमान वाटत होता. मग जेव्हा अगदी संध्याकाळ झाली.

कार्यक्रम संपण्याची वेळ आली तेव्हा कुठे मी तो मेकअप काढायला गेलो. त्या दिवशी घरी आल्यावरही मी स्नेहसंमेलनाचीच स्वप्ने पाहात होतो. मला वाटत होते की आता काय? आता रोजचीच रूक्ष शाळा सुरू! पुढील स्नेहसंमेलनासाठी एक वर्ष वाट पहावी लागणार आपल्याला.शाळांची वार्षिक स्नेहसंमेलने सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यात असतात. कारण तेव्हा सहामाही परीक्षा होऊन गेलेली असते आणि वार्षिक परीक्षेला अजून वेळ असतो. तसेच हवाही चांगली असल्याने क्रीडास्पर्धाही आणि आंतर्वर्गीय सामनेही घेता येतात. वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करणे आवश्यक असते कारण शाळा म्हणजे काही फक्त अभ्यासच नसतो. मुलांच्या अंगात नानाविध कला असतात. कुणी उत्तम चित्रे काढतो, तर कुणी उत्तम अभिनय करतो.

कुणाला गाता चांगले येते तर कुणाला चांगले नृत्य करता येते. कुणी छान बासरी किंवा तबला वाजवीत असतो. लहान मुलांमध्ये असे कित्येक सुप्त गुण दडलेले असतात. हे गुण एरवी बाहेर कसे येणार? त्यामुळेच वार्षिक स्नेहसंमेलने हवीतच. कारण शेवटी माणसाने अनेक आनंद घ्यायला हवेत. ह्या संमेलनात भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशाही मिळू शकते. त्यांना कळते की आपल्या अंगी काय कला आहे? काय केले की आपण आनंदात असतो? खरोखरच आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींना जर आपण उपजीविकेचं साधन बनवले तर कामाचा कंटाळा कधी येणार नाही.

स्नेहसंमेलनाच्या आधी क्रीडास्पर्धाही होतात. त्यात आपले कौशल्य दाखवण्यास वाव मिळतो. मुलांच्या अंगात खिलाडूपणाची वृत्ती येते. तसेच रोजच्या अभ्यासातून काही काळ आनंदात आणि शारीरिक व्यायामात घालवता येतो. म्हणून शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन झालेच पाहिजे अशा मताचा मी आहे.

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मराठी निबंध – Shaletil Snehasamelan Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply