Set 1: श्रमाचे महत्व निबंध मराठी – Shramache Mahatva Nibandh Marathi

आपण सर्वजणच कष्टाला कमी लेखतो. म्हणून आपल्यासमोर डॉक्टर वा वकील आला, तर लोक त्याच्याकडे आदराने बघतात. मात्र, शेतकरी वा गवंडी समोर आला, तर त्याच्याकडे कोणी आदराने बघत नाही.

घरातही आपण हेच करतो. केर काढण्याची वेळ आली की, आपण ते टाळतो. शाळेत साफसफाईचे काम कोणी आनंदाने करत नाही. कारण आपण शारीरिक श्रम कमी दर्जाचे मानतो.

लक्षात घ्या – शेतकऱ्याने शेती केली नाही, तर आपल्याला अन्न मिळेल का? गवंड्याने घर बांधले, तरच आपल्याला राहायला घर मिळते. सैनिक सीमेचे रक्षण करतात, म्हणून आपण सुरक्षित राहतो. कष्टकऱ्यांच्या कष्टावरच जग चालते. आपण स्वत: कष्ट करून आकाशकंदील बनवला, तर आपल्याला खूप आनंद मिळतो. तेवढा आनंद विकत आणलेल्या कंदिलाने मिळत नाही. शारीरिक श्रमाचे हे मोल आपण जाणले पाहिजे.

Set 2: श्रमाचे महत्व निबंध मराठी – Shramache Mahatva Nibandh in Marathi

श्रमाला पर्याय नसतोच. आपल्याला जीवनात काहीतरी बनायचे असेल तर त्यासाठी श्रम करावेच लागतात. चांगले गुण मिळवायचे असल्यास अभ्यासाचे श्रम उचलावेच लागतात. कुठल्याही मोठ्या माणसाचे चरित्र आपण पाहिले तर त्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी किती परिश्रम घेतले ते आपल्याला सहज कळते. श्रम सफल झाल्यावर जो आनंद मिळतो त्याला ह्या जगात तोड नसते. श्रम हे शारीरिक असतात तसेच ते मानसिक आणि बौद्धिकही असतात.

आपण माणसे समाजात राहातो. आपल्याला दुस-याकडून भावनिक आधार लागतो. कधीकधी शारीरिक आणि आर्थिक मदतीचीही गरज लागते हे अगदी मान्य असले तरी ही मदत कुठवर घ्यायची? किती काळ दुस-यांच्या चांगुलपणावर जगायचे ह्यालाही मर्यादा असते. शेवटी स्वतः श्रम करून स्वतःच्या पायावर उभे राहाणे ह्यातच खरे सुख आहे. जी कामे आपल्याला शक्य आहेत त्यासाठी दुस-या कुणावर अवलंबून न राहाणे आणि ती स्वतःहून करणे हेच इष्ट असते.

मात्र स्वावलंबनासाठी तशीच जाज्वल्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाची गरज असते. स्वावलंबनाचे धडे शाळेत शिकवता येत नाहीत की स्वावलंबी व्हा असा नुसता उपदेश करून फायदा होत नाही. स्वालंबन हा एक संस्कार असतो आणि घरातील आणि असपासच्या मोठ्या लोकांच्या वागण्यातून तो लहान मुलांच्या मनावर होतो. घरातील कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते. मुलांवर श्रमसंस्कार घरातूनच घडतात.

श्रममाणसाला सकारात्मक बनवतात, त्यामुळे त्याचे पाय जमिनीवरच राहातात. श्रमांमुळे यशाचा मार्ग खुला होतो. अपयशापासूनही धडा घेऊन चिकाटीने आपला मार्ग अनुसरणे हे श्रमसंस्कारांमुळेच शक्य होते. श्रम करणे ह्याचा अर्थ आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. केवळ नशीबावर अवलंबून न राहाता आपल्या क्षमतांचा विकास करणे. सिंह जर झोपून राहिला तर हरीण काही आपोआप त्याच्या तोंडात येऊन पडत नाही. सिंहालाही शिकार करावीच लागते.

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हे वागणे चुकीचेच आहे. जगातील सर्व महापुरूष श्रम करीत होते. इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, लालबहादुर शास्त्री ही सर्व मोठी माणसे स्वतःवर अवलंबून राहिली म्हणूनच ती मोठी बनली. बांगला देशच्या युद्धात इंदिरा गांधींनी स्वतःवर श्रद्धा ठेवली म्हणूनच त्या युद्धात त्या यशस्वी झाल्या.

जो स्वतःसाठी कष्ट घेतो त्याच्यामागे प्रत्यक्ष देव उभा राहातो. अशी व्यक्ती सतत धडपड करते, हरली तरी चिकाटी सोडत नाही त्यामुळे तिला यश प्राप्त होते. म्हणूनच समाजसेवेचे शिक्षण देताना शिकवले जाते की ‘कुणाला मासा देऊ नका परंतु मासेमारी करायला जरूर शिकवा. मासा दिल्याने त्याची एक दिवसाची भूक भागेल. पण त्याला मासेमारी करायला शिकवले तर त्याची रोजचीच भूक भागेल आणि तो आत्मसन्मानाने जीवन कंठू शकेल.’

कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ म्हणजे कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण त्यापासून मिळणा-या फळावर नाही, असे भगवद्गीता सांगते. ह्याचा अर्थ असा की आपण कर्म करीत राहावे. त्यापासून फळ मिळणे न मिळणे हे दैवाधीन असते. परंतु आपण आपले काम केले हे समाधानच पुष्कळ मोठे असते. त्यातूनच आपल्याला श्रमसाफल्य मिळते. म्हणून श्रमांना महत्व आहे.

श्रमाचे महत्व निबंध मराठी – Shramache Mahatva Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply