भारतात व्हॉलीबॉल खेळाचा उगम मद्रास राज्यात झाला. भारताने पहिला सामना 1916 मध्ये लाहोरमध्ये खेळला. या सामन्यातील विजयानंतर, व्हॉलीबॉल चाहत्यांनी पंजाबच्या लुधियाना शहरात भारतीय व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली.

व्हॉलीबॉल या खेळाला फार महागड्या उपकरणांची गरज नाही, म्हणून आपल्या देशात हा खेळ खेड्यापाड्यात झपाट्याने पसरला आणि मोठ्या आवेशाने खेळला गेला. व्हॉलीबॉल जगात खूप लोकप्रिय आहे. हा खेळ अनेक देशांचा राष्ट्रीय खेळ आहे.

व्हॉलीबॉल माहिती-Volleyball Information in Marathi
व्हॉलीबॉल माहिती, Volleyball Information in Marathi

व्हॉलीबॉल माहिती – Volleyball Information in Marathi

व्हॉलीबॉल खेळाचा इतिहास

व्हॉलीबॉल हा एक खेळ आहे ज्याचा उगम अमेरिकेत झाला आहे, परंतु या खेळाने जगभरात ठसा उमटवला आहे. व्हॉलीबॉलची सुरुवात अमेरिकेत 1895 साली झाली आणि विल्यम मॉर्गन हे त्याचे वडील मानले जातात. हा खेळ खेड्यांमध्ये खेळला जाणारा खेळ म्हणून सुरू झाला पण लवकरच तो येथे जागतिक खेळ बनला. 1964 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये व्हॉलीबॉलचा समावेश करण्यात आला.

सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याची संघटना भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवली गेली आणि नियम आणि कायदेही बनवले गेले. या नियमांच्या आधारे हा खेळ जगभर खेळला जातो. सध्या व्हॉलीबॉल आंतरराष्ट्रीय खेळांचा तसेच ऑलिम्पिक खेळ आणि पॅन अमेरिकन खेळांचा भाग आहे.

तथापि, सध्या हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे आणि हा खेळ पुरुष आणि महिला दोन्ही स्तरावर खेळला जातो. चला तर मग जाणून घेऊया व्हॉलीबॉल खेळाचे नियम आणि त्याविषयीची माहिती.

व्हॉलीबॉल खेळाचे मैदान

व्हॉलीबॉल खेळाचे मैदान
व्हॉलीबॉल खेळाचे मैदान

क्रीडांगण

१८ मी. × ९ मी.

मध्यरेषा

क्रीडांगणाचे दोन समान भाग करणारी रेषा.

हल्ला रेषा (Attack Lines)

मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना ३ मीटर अंतरावर मध्यरेषेशी समांतर असणाऱ्या रेषा. (रेषेची जाडी ५ सें.मी. असून ती ३ मीटरमध्येच समाविष्ट असते.)

सर्व्हिस एरिया

क्रीडांगणाच्या अंतिम रेषेमागील ९ मी. रुंदीचे क्षेत्र (पाठीमागील अंतिम रेषेपासून २० सें.मी. अंतरावरून १५ सें.मी. लांबीच्या दोन रेषांनी सर्व्हिस एरियाची मर्यादा दाखविलेली असते.)

खांब

क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूंना (Side Lines) मध्यरेषेच्या बाहेर ५० सें.मी. ते १ मी. अंतरावर जाळे बांधण्यासाठी असणारे गोल खांब.

जाळे (Net)

 • लांबी – ९.५० मी.
 • रुंदी – १ मी.

जाळ्याचा रंग काळा असावा. जाळ्याच्या वरच्या बाजूला ७ सें.मी. उंचीची कॅनव्हासची पांढरी पट्टी असते. ही पट्टी जाळ्याचाच भाग असते. त्यातून दोरी ओवून जाळ्याची वरची बाजू खांबाशी ताणून बांधली जाते. जाळ्याच्या खालच्या बाजूला ५ सें.मी. उंचीची कॅनव्हासची पांढरी पट्टी असते. त्या पट्टीतून दोरी ओवून घेऊन जाळे खांबाशी घट्ट बांधले जाते.

क्रीडांगणाच्या मध्यभागी जाळ्याची जमिनीपासून उंची – २.४३ मी. (पुरुष), २.२४ मी. (महिला)

(दोन्ही बाजूंना अंतिम रेषेवर जाळ्याची उंची समान असेल आणि मध्यभागी असणाऱ्या जाळ्याच्या उंचीपेक्षा म्हणजे २ सें.मी.पेक्षा अधिक नसेल.)

साइड मार्कर्स (Side markers)

बाजूच्या अंतिम रेषेवर जाळ्याला लंब स्वरूपात बांधलेल्या १ मी. लांब व ५ सें.मी. रुंद अशा पांढऱ्या पट्ट्या. या पट्ट्या जाळ्याचाच भाग मानल्या जातात.

अँटेना (Antenna)

साइड मार्करला लागूनच बाहेरील बाजूस अँटेना जाळ्याला बांधलेल्या असतात. दोन अँटेनांमध्ये ९ मीटर अंतर असते. अँटेना फायबर ग्लास किंवा तत्सम वस्तूची असते. तिची उंची १.८० मी. असते आणि जाडी १ सें.मी. असते. अँटेनाचा वरील ८० सें.मी. भाग जाळ्याच्या वर राहतो. अँटेनाच्या प्रत्येक १० सें.मी. भागास पांढरा व तांबडा रंग दिलेला असतो.

टीप –

 1. क्रीडांगणाच्या चारही बाजूंना अंतिम रेषेच्या बाहेर ३ मी. मोकळी जागा (फ्री झोन) असावी. क्रीडांगणाच्या वर ७ मी.पर्यंत कोणताही अडथळा नसावा.
 2. क्रीडांगणावरील सर्व रेषा ५ सें.मी. जाडीच्या असतात.
 3. अंतिम रेषा व बाजूच्या रेषा क्रीडांगणातच समाविष्ट असतात.

व्हॉलीबॉल चेंडू

 • वजन – २६० ते २८० ग्रॅम.
 • परीघ – ६५ सें.मी. ते ६७ सें.मी.

व्हॉलीबॉल खेळाचे नियम

व्हॉलीबॉलचा सामना दोन संघांमध्ये खेळला जातो, प्रत्येक संघात 12-12 खेळाडू असतात, परंतु कोर्टवर फक्त 6 खेळाडूंना परवानगी आहे, उर्वरित 6 खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. सामना सुरू करण्यासाठी, नाणे नाणेफेक करण्यासाठी फेकले जाते आणि नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या खेळाडूला बेसलाइनच्या मागून सेवा द्यावी लागते. जो खेळाडू सर्व्हिस घेतो तो प्रथम पिच करतो, याला पास किंवा बंप सेट म्हणतात. चेंडूला स्पर्श करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूला सेटर म्हणतात, जो चेंडू नेटजवळ खेळाडूकडे नेण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडूला स्पर्श करणाऱ्या शेवटच्या खेळाडूला ‘स्पाइक’ म्हणतात .

व्हॉलीबॉल खेळाडू व बदली खेळाडू नियम

१) संघामध्ये जास्तीतजास्त १२ खेळाडू असतील. त्यांपैकी एक संघनायक असतो. प्रत्यक्ष सामन्यात ६ खेळाडू खेळतात आणि ६ खेळाडू राखीव खेळाडू म्हणून राहतात. ६ राखीव खेळाडू पंचांच्या पाठीमागे फ्री झोनच्या बाहेर ठेवलेल्या बेंचवर बसतात.

२) संघात सहापेक्षा कमी खेळाडू असतील‚ तर त्या संघाला सामना खेळता येणार नाही.

३) सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंची (राखीव खेळाडूंसह) नावे गुणलेखकाकडे नोंदवावीत. नाव न नोंदविलेल्या खेळाडूला सामन्यात खेळता येणार नाही.

४) राखीव खेळाडू व मार्गदर्शक (कोच) यांनी सरपंचाच्या विरुद्ध बाजूस फ्री झोनच्या बेंचवर बसावे (राखीव खेळाडूंनी जवळपास उत्तेजक व्यायाम करावयास हरकत नाही.)

५) चेंडू खेळात नसताना (Dead ball) पंच किंवा सरपंच यांच्या परवानगीने कोच किंवा संघनायक यांना त्रुटित काळाची मागणी करून बदली खेळाडू घेता येतील.

६) प्रत्येक सेटमध्ये (Set) प्रत्येक संघाला सहा बदली खेळाडू घेता येतील. बाहेर गेलेला खेळाडू त्याच सेटमध्ये परत खेळावयास येऊ शकतो. मात्र‚ त्याने त्याच्या जागी खेळावयास आलेल्या बदली खेळाडूच्या जागीच खेळावयास पाहिजे.

बदली खेळाडू खेळत असताना त्याच्या जागी अन्य राखीव खेळाडूला बदली खेळाडू म्हणून खेळता येणार नाही. बदली खेळाडू बाहेर गेल्यावर त्याला पुन्हा त्या सेटमध्ये बदली खेळाडू म्हणून खेळता येणार नाही.

(एखादा खेळाडू जबर जखमी झाल्याने संघात सहा खेळाडू राहत नसतील व नवीन बदली खेळाडूही घेता येत नसेल‚ तर बाहेर गेलेल्या बदली खेळाडूस जखमी खेळाडूच्या जागी पुन्हा खेळावयास परवानगी द्यावी.)

७) एखाद्या खेळाडूस शिक्षा देऊन बाहेर काढले असेल व बदली खेळाडू घेण्यास वाव नसल्याने संघात सहा खेळाडू राहत नसतील‚ तर तो संघ तो सेट हरला‚ असे जाहीर करावे.

८) एका वेळी एक किंवा अधिक बदली खेळाडू घेता येतील. एका वेळी अधिक बदली खेळाडू घ्यावयाचे असतील‚ तर एक खेळाडू घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेतच ते काम झाले पाहिजे. एका संघाला एकाच वेळी बदली खेळाडू घेण्यासाठी दोन सलग त्रुटित काळाचा फायदा घेता येणार नाही. बदली खेळाडू म्हणून येणाऱ्या खेळाडूने / खेळाडूंनी गुणलेखकाजवळ तयार राहावे. संघनायक किंवा कोच याने प्रथम बाहेर जाणाऱ्या व नंतर आत येणाऱ्या खेळाडूंचा क्रमांक सांगावा. बाहेर जाणाऱ्या व आत येणाऱ्या खेळाडूंनी त्या वेळी हात वर करावा.

९) बदली खेळाडू घेण्याच्या वेळेत कोच आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार नाही.

१०) बदली खेळाडू घेण्यासाठी लागलेला वेळ त्रुटित काळ (Time out) म्हणून त्या संघाच्या नावे लिहिला जाणार नाही; परंतु बदली खेळाडू घेण्यास अकारण विलंब लावला किंवा त्या वेळी बदली खेळाडू घेतला नाही‚ तर त्या संघाच्या नावे त्रुटित काळाची नोंद केली जाईल.

११) प्रत्येक खेळाडूच्या छातीवर व पाठीवर त्याचा क्रमांक (१ ते १२) असला पाहिजे. खेळाडूंना बिनटाचाचे कॅनव्हासचे अगर कातडी शूज वापरता येतील.

व्हॉलीबॉल लिबरो खेळाडू (Libero)

आपल्या संघात लिबरो खेळाडू खेळवण्याचा पर्याय (Option) संघास खुला असतो. संघाच्या सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या अधिकृत यादीत त्याच्या नावाची नोंद पाहिजे. त्याच्या नावापुढे (L) अशी खूण हवी. त्याचा पोशाख आपल्या संघाच्या खेळाडूपेक्षा वेगळा पाहिजे. लिबरो हा बॅक लाइन बचावात्मक खेळणारा खेळाडू म्हणूनच खेळू शकतो. त्याला सर्व्हिस करता येणार नाही. तसेच तो संघाचा कप्तानही असू शकणार नाही.

पहिल्या सेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या (Line up) यादीमध्ये त्याचे नाव असणे आवश्यक आहे. बॅक लाइनच्या कोणत्याही खेळाडूच्या जागी लिबरो खेळू शकतो. लिबरो ज्या खेळाडूच्या जागी येतो‚ तो खेळाडू बाहेर जातो व लिबरो खेळाडू पुन्हा बाहेर जाईल त्या वेळी त्याच्याबद्दल बाहेर गेलेला तो खेळाडू आत येईल.

लिबरो खेळाडूस बॅक झोन‚ फ्रंट झोन किंवा फ्री झोनमधून जाळ्याच्या वरच्या पट्टीपेक्षा अधिक उंचीवरील चेंडूस फटका (attack hit) मारता येणार नाही. लिबरोने फ्रंट झोन (Front Zone) मधून त्याच्या डोक्यावरील चेंडूचा पास (Finger Pass) नेटच्या वरील पट्टीपेक्षा अधिक उंच असा काढला असेल‚ तर त्याच्या संघातील खेळाडूला त्या बॉलला फटका (attack hit) मारता येणार नाही. बॅक झोनमधून त्याने डोक्यावरील चेंडूचा फिंगर पास (Finger Pass) काढला असेल‚ तर त्याच्यावर फटका (attack hit) मारता येईल.

चेंडू खेळात नसताना तो कितीही वेळा बाहेर जाऊ शकतो आणि त्याच्या जागी बदली खेळाडू मैदानात येतो (एका सेटमध्ये सहा वेळा बदली खेळाडू घेण्याबाबतचा नियम लिबरो खेळाडूस लागू नाही.) लिबरो बाहेर गेल्यानंतर किमान एक खेळी (रॅली) पूर्ण होईपर्यंत त्याला पुन्हा मैदानात येता येणार नाही. लिबरो मैदानाबाहेर जाताच तो ज्याच्या जागी खेळत होता‚ तो खेळाडू लिबरोची जागा घेईल. लिबरो आणि त्याच्या जागी येणारा बदली खेळाडू यांचे मैदानावरून बाहेर जाणे किंवा मैदानावर येणे त्याच्या बेंचकडील हल्ला रेषा व अंतिम रेषा यांच्यामधील बाजूच्या रेषेवरून होईल.

लिबरो जखमी होऊन खेळावयास असमर्थ ठरला‚ तर खेळाडूंच्या अधिकृत यादीतील बेंचवरील अन्य खेळाडूस त्याच्या जागी लिबरो म्हणून खेळवता येईल. जखमी लिबरोच्या जागी बेंचवरील दुसरा खेळाडू लिबरो म्हणून खेळण्यास कोच सरपंचाकडे परवानगी मागतील. नवीन लिबरो म्हणून आलेल्या खेळाडूच्या अंगावर लिबरोचाच पोशाख असेल. त्याला तो सामना संपेपर्यंत लिबरो म्हणूनच खेळावे लागेल. जखमी होऊन बाहेर गेलेल्या लिबरोस पुन्हा त्या सामन्यात खेळता येणार नाही.

व्हॉलीबॉल त्रुटित काळ (Volleyball Time out)

१) चेंडू खेळात नसताना कोच किंवा संघनायक विश्रांतीसाठी सरपंचाकडे त्रुटित काळाची मागणी करू शकतो.

२) त्रुटित काळ ३० सेकंदांचा राहील.

३) प्रत्येक सेटमध्ये प्रत्येक संघाला दोन वेळा त्रुटित काळाची मागणी करता येते. दोन्ही त्रुटित काळांचा एकाच वेळी फायदा घेता येईल.

४) बदली खेळाडू घेण्यासाठी खेळ थांबला असेल‚ तर त्याला जोडूनच त्रुटित काळाची मागणी करता येते. तसेच त्रुटित काळ संपताच बदली खेळाडू घेण्याची मागणी करता येईल.

५) त्रुटित काळाची मागणी केलेल्या संघाच्या कोचच्या किंवा संघनायकाच्या विनंतीनुसार त्रुटित काळ संपण्यापूर्वी खेळ सुरू करता येईल.

६) ३० सेकंदांपेक्षा अधिक वेळ त्रुटित काळ घेतला‚ तर त्या संघाच्या नावे दुसऱ्या त्रुटित काळाची नोंद केली जाईल. त्या संघाने दुसऱ्या त्रुटित काळापेक्षाही अधिक वेळ घेतला‚ तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण बहाल केला जाईल.

७) एकाच सेटमध्ये संघाने तिसऱ्या वेळी त्रुटित काळाची मागणी केली‚ तर सरपंच त्रुटित काळाची मागणी मान्य करणार नाही. त्या संघाला पुन्हा त्रुटित काळाची मागणी न करण्याबाबत सूचना दिली जाईल. त्याच सेटमध्ये पुन्हा त्रुटित काळाची त्यांनी मागणी केली‚ तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण बहाल करावा.

८) त्रुटित काळाची मागणी करताना ती मागणी विश्रांतीसाठी आहे की बदली खेळाडू घेण्यासाठी आहे हे सांगितले पाहिजे. तसे सांगितले नाही‚ तर ती मागणी विश्रांतीसाठी आहे असे मानून संबंधित संघाच्या नावे त्रुटित काळाची नोंद केली जाईल.

९) त्रुटित काळात चेंडू पंचाजवळ राहील.

१०) त्रुटित काळात क्रीडांगणाच्या बाहेर राहून कोच आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करू शकतो. खेळाडूंना मैदानाबाहेर त्यांच्या बेंचकडे जाता येईल.

११) खेळाडू जखमी झाला‚ तर खेळ थांबेल. जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडू खेळणार नसेल‚ तर खेळ ३ मिनिटे थांबेल. हा वेळ त्रुटित काळ म्हणून कोणत्याही संघाच्या नावे नोंदला जाणार नाही. ज्या गुणांवर सामना थांबला असेल‚ त्या गुणांवर खेळ पुढे सुरू होईल.

व्हॉलीबॉल रोटेशन ऑर्डर (Volleyball Rotation order)

१) सामन्याची सुरुवात होताना खेळाडूंनी मैदानावर उभे राहावे. पंच विशिष्ट जागांवर उभे राहणाऱ्या खेळाडूंच्या क्रमांकांची नोंद घेतील.

२) सेटमध्ये ठरलेला क्रम बदलता येणार नाही. नवीन सेटमध्ये खेळाडूंचा उभे राहण्याचा क्रम बदलता येईल. (नवीन सेट सुरू होण्यापूर्वी कोचने गुणलेखकाकडे बदलाची नोंद करावी. बदलाची नोंद केली नाही‚ तर पूर्वीचाच क्रम आहे‚ असे मानले जाईल.)

३) सर्व्हिसच्या वेळी दोन्ही संघांतील मागील ओळीतील खेळाडू (Back line players) हे पुढील ओळीतील खेळाडूंच्या (Front line players) थोडे मागे असतील. सर्व्हिस केल्यानंतर आपल्या अंगणात ते कोणत्याही जागी हलू शकतील. (एका संघाने सेटमधील पहिली सर्व्हिस केली आणि ती रॅली प्रतिस्पर्ध्याने जिंकली‚ तर प्रतिस्पर्धी संघाकडे सर्व्हिस जाते. त्या सेटमध्ये त्या संघाची पहिली सर्व्हिस करण्यासाठी खेळाडू रोटेट होतात.)

४) सर्व्हिस बदल होताच ज्या संघाकडे सर्व्हिस आली असेल‚ त्या संघातील खेळाडू क्रम बदलतील. (Clockwise rotation)

५) रोटेशन ऑर्डर अवैधरीत्या बदलल्याचे लक्षात येताच खेळ थांबवावा. रोटेशन ऑर्डर बदलल्यापासून त्या संघाने मिळविलेले गुण कमी करावेत. प्रतिस्पर्धी संघाने मिळविलेले गुण तसेच राहतील. (रोटेशन ऑर्डर कधी बदलली‚ हे सापडत नसेल; तर त्या संघाचे खेळाडू योग्य क्रमाने उभे करावेत. त्या संघाकडे सर्व्हिस असेल‚ तर प्रतिस्पर्धी संघाकडे सर्व्हिस द्यावी. प्रतिस्पर्धी संघाकडे सर्व्हिस असेल‚ तर त्या संघाला एक गुण द्यावा.)

व्हॉलीबॉल सर्व्हिस नियम ( Volleyball Service)

प्रत्यक्ष सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघाला सरावासाठी पाच मिनिटे मैदानावर खेळता येईल. सामन्यात प्रथम सर्व्हिस करणारा संघ सरावासाठी प्रथम खेळेल.

१) खेळाडूने सर्व्हिस एरियातूनच (Service area) सर्व्हिस केली पाहिजे. सर्व्हिस केली जाते त्या वेळी इतर सर्व खेळाडू आपल्या क्रीडांगणात योग्य जागी पाहिजेत.

२) सर्व्हिस करताना खेळाडूने चेंडू हवेत उडवून त्याला हाताने टोला मारून तो नेटवरून प्रतिपक्षाच्या अंगणात घालवावा. चेंडू हवेत न उडविता टोलविला‚ तर तो फाउल आहे.

३) सर्व्हिस करताना चेंडूला ज्या वेळी टोला (Hit) मारला जातो‚ त्या वेळी सर्व्हिस करणारा अंतिम रेषेच्या पाठीमागे पाहिजे. चेंडूला टोला मारल्यानंतर अंतिम रेषेला किंवा अंगणाला स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही.

४) सरपंचाने शिट्टी वाजवून सर्व्हिस करण्याचा इशारा करताच ८ सेकंदांच्या आत सर्व्हिस केली पाहिजे.

५) सर्व्हिस करण्यासाठी सरपंचाचा इशारा मिळण्यापूर्वीच सर्व्हिस केली असेल‚ तर पुन्हा सर्व्हिस करण्यास सांगावे.

६) सर्व्हिस करण्यासाठी उडविलेला चेंडू एका हातानेच मारावा.

७) सर्व्हिस करण्यासाठी उडविलेला चेंडू सर्व्हिस करणाऱ्याचा स्पर्श न होता खाली पडला‚ तर पुन्हा सर्व्हिस करण्यास सांगावे. चेंडू खाली पडताना चेंडूचा खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाला‚ तर तो सर्व्हिस करणाऱ्याचा नियमभंग समजावा.

८) सर्व्हिसचा चेंडू जाळ्यात अडकला‚ जाळ्याखालून पलीकडे गेला किंवा चेंडू जाळ्यापलीकडे जाण्यापूर्वी सर्व्हिस करणाऱ्या संघाच्या अन्य खेळाडूचा चेंडूला स्पर्श होऊन चेंडू जाळ्याच्या पलीकडे गेला‚ तर तो सर्व्हिस करणाऱ्या संघाचा नियमभंग असतो.

९) सर्व्हिस करणाऱ्याचा कोणताही फाउल नसताना चेंडू जाळ्यास (नेट) स्पर्श होऊन पलीकडे गेला व प्रतिस्पर्धी खेळाडूचा त्यास स्पर्श झाला किंवा तो प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात पडला‚ तर ती सर्व्हिस योग्य आहे. परंतु चेंडू जाळ्यास स्पर्श होऊन चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूस स्पर्श न होता मैदानाबाहेर पडला‚ तर तो सर्व्हिस करणाऱ्याचा फाउल आहे.

१०) सर्व्हिसच्या चेंडूचा अँटेनाला स्पर्श झाला किंवा अँटेनाच्या बाहेरील बाजूने चेंडू पलीकडे गेला‚ तर तो नियमभंग आहे.

११) चुकीच्या क्रमांकाच्या खेळाडूने सर्व्हिस करणे नियमभंग आहे.

१२) सर्व्हिस करणाऱ्या संघातील खेळाडूंनी उड्या मारून‚ हात हलवून‚ दोन किंवा तीन खेळाडूंचा घोळका करून सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूची कृती प्रतिस्पर्धी संघास दिसणार नाही‚ असे वर्तन करू नये.

१३) सर्व्हिस केली जात असताना मागील ओळीतील खेळाडू पुढील ओळीतील खेळाडूंपेक्षा थोडे मागे असतील (The back line players must be atleast a little behind their corresponding front line players.) खेळाडूच्या पायांच्या स्थितीवरून खेळाडूची स्थिती ठरवावी. तसेच मागील व पुढील ओळींतील डाव्या आणि उजव्या बाजूच्या अंतिम रेषेलगत (Side lines) खेळणाऱ्या खेळाडूंच्या पायांचा भाग हा त्यांच्या ओळीत मध्यभागी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पायांपेक्षा थोडा तरी बाजूच्या रेषेकडे पाहिजे. (अपवाद – सर्व्हिस करणारा खेळाडू)

सर्व्हिस करणाऱ्याचा नियमभंग न होता तो चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या मैदानाच्या बाहेर पडला व सर्व्हिस केली जाते त्या वेळी प्रतिस्पर्धी आपल्या योग्य जागी उभे नसतील‚ तर तो सर्व्हिस स्वीकारणाऱ्याचा फाउल आहे. मात्र‚ अशा वेळी सर्व्हिस करणाऱ्याचा सर्व्हिस करताना अंतिम रेषेला किंवा अंगणाला स्पर्श असेल‚ सर्व्हिस एरियाच्या बाहेरून सर्व्हिस केली असेल किंवा हातातून न उडविता चेंडू टोलविला असेल‚ तर सर्व्हिस करणाऱ्याचा नियमभंग मानला जातो.

१४) रॅली सुरू असताना जाळ्यात मारला गेलेला चेंडू जाळ्यात अडकून बसला किंवा जाळ्यातून पलीकडे गेला‚ तर ती खेळी थांबवून ज्या संघाने सर्व्हिस केलेली होती‚ त्या संघास पुन्हा सर्व्हिस करावयास सांगितले जाते.

१५) पहिल्या सेटमध्ये ज्या संघाने प्रथम सर्व्हिस केली नव्हती‚ तो संघ दुसऱ्या सेटमध्ये प्रथम सर्व्हिस करील.

१६) अंतिम सेटमध्ये कोणत्या संघाने सर्व्हिस करावयाची‚ ते नाणेफेक करून ठरवावे.

१७) एका संघाने सर्व्हिस केलेला चेंडू नेटवरून आपल्या अंगणात येत असताना प्रतिस्पर्ध्याला त्या चेंडूला अॅटॅकहिट करता येणार नाही किंवा ब्लॉक करता येणार नाही.

१८) चेंडू खेळात असताना सर्व्हिस करणाऱ्या संघाच्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूकडून नियमभंग झाला‚ तर सर्व्हिस करणाऱ्या संघाला एक गुण मिळतो आणि पुढील सर्व्हिस त्यांच्याकडेच राहते. खेळी सुरू असताना सर्व्हिस करणाऱ्या  संघाच्या खेळाडूकडून नियमभंग झाला‚ तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण मिळतो आणि सर्व्हिस त्याच्याकडे जाते. या पद्धतीने सर्व सेट्समध्ये खेळ सुरू राहतो.

व्हॉलीबॉल ब्लॉक (Volleyball Block)

१) प्रतिस्पर्ध्याने मारलेला चेंडू अडविण्यासाठी नेटजवळच्या खेळाडूचा एक वा दोन्ही हात नेटच्या वर गेले असतील‚ तर त्याने ब्लॉकमध्ये भाग घेतला‚ असे मानले जाते.

२) पुढील ओळीतील एक‚ दोन किंवा तीन खेळाडू एका वेळी ब्लॉकमध्ये भाग घेऊ शकतात. मागील ओळीतील खेळाडूंना ब्लॉकमध्ये भाग घेता येणार नाही.

३) ब्लॉकिंग करताना पुढील ओळीतील जवळजवळ उभ्या असणाऱ्या (Composite block) दोन किंवा तीन खेळाडूंचा चेंडूला स्पर्श झाला तरी तो एकच स्पर्श मानला जाईल.

४) ब्लॉकिंगनंतर चेंडू आपल्या अंगणात येत असेल‚ तर ब्लॉकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूला तो चेंडू खेळता येईल. ब्लॉकिंगनंतर त्याच्या संघाने करावयाच्या तीन स्पर्शांपैकी तो पहिला स्पर्श मानला जाईल.

५) ब्लॉकिंगमुळे चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात गेला‚ तर त्यांना पुन्हा चेंडूला तीन वेळा स्पर्श करून चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात घालविता येईल.

६) ब्लॉकिंगनंतर चेंडू ज्या अंगणातील जमिनीवर पडेल‚ त्या अंगणातील संघाचा तो फाउल मानला जाईल.

७) ब्लॉकिंगच्या वेळी दोन्ही संघांचा नियमभंग असेल‚ तर तो दुहेरी नियमभंग (Double fault) समजून पूर्वी सर्व्हिस केलेल्या संघास पुन्हा सर्व्हिस करावयास सांगावे.

८) स्मॅश (Smash) मारल्यानंतर जाळ्यास स्पर्श न होता हात जाळ्याच्या पलीकडे गेला‚ तर तो फाऊल नाही.

९) वर उडविलेल्या चेंडूला स्मॅश मारण्याची कृती (Action) पूर्ण झाल्याशिवाय ब्लॉक करणाऱ्या खेळाडूने चेंडूला जाळ्याच्या पलीकडे स्पर्श केला‚ तर तो ब्लॉक करणाऱ्या खेळाडूचा नियमभंग आहे. स्मॅशिंगची कृती पूर्ण झाल्यावर चेंडूला स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही.

१०) ब्लॉकिंगनंतर चेंडू क्रीडांगणाच्या बाहेर पडला‚ तर तो ब्लॉकिंग करणाऱ्याचा नियमभंग आहे.

११) जाळ्याच्या वर दोन प्रतिस्पर्धी खेळाडूंचा चेंडूला एकाच वेळी स्पर्श झाला (Simultaneous touch) आणि चेंडू जाळ्याच्या एका बाजूच्या अंगणाबाहेर पडला‚ तर तो दुसऱ्या बाजूच्या संघाचा नियमभंग मानला जातो.

व्हॉलीबॉल जाळ्यातील खेळ नियम

१) दोन्ही अँटेनांच्या आतील जाळ्याला चेंडूचा स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही.

२) खेळाडूचा जाळ्याला‚ अँटेनाला स्पर्श झाला तर तो नियमभंग आहे; परंतु जाळ्यात जोरात मारलेल्या चेंडूमुळे जाळ्याचा प्रतिस्पर्धी खेळाडूस स्पर्श झाला किंवा चेंडू खेळत नसलेल्या खेळाडूचा चुकून जाळ्यास स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही.

३) दोन्ही संघांच्या खेळाडूंचा एकाच वेळी जाळ्यास स्पर्श झाला‚ तर तो दुहेरी नियमभंग समजावा.

४) अँटेनाच्या बाहेरून चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात गेला‚ तर चेंडू मारणाऱ्या संघाचा तो नियमभंग होतो.

५) जाळ्याच्या पलीकडील चेंडूला स्पर्श करणे‚ हा नियमभंग आहे. (अपवादात्मक परिस्थितीतील ब्लॉकिंग)

६) खेळाडूच्या पायाचा किंवा हाताचा मध्यरेषेला स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही. जोपर्यंत पाय मध्यरेषेवर (On or above) आहे तोपर्यंत तो नियमभंग नाही. पाय किंवा हात मध्यरेषेच्या पूर्ण पलीकडे असेल‚ तरच तो नियमभंग मानावा.

७) खेळ सुरू असताना शरीराचा भाग जाळ्याखालून प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात नेऊन प्रतिस्पर्ध्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला‚ तर तो नियमभंग मानावा. एका संघाचा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या खेळात खेळाडूला व्यत्यय आणत नसेल‚ तर तो नियमभंग नाही.

८) ज्याच्याकडून नियमभंग होण्याचा संभव आहे‚ अशा खेळाडूला मागे ओढले‚ तर तो नियमभंग मानू नये.

९) चेंडू खेळल्यानंतर त्या खेळाडूचा खांबाला किंवा जाळ्याच्या ९.५० मीटरच्या बाहेर स्पर्श झाला आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या खेळावर अनिष्ट परिणाम होत नसेल‚ तर त्या खेळाडूचा तो नियमभंग मानू नये. प्रतिस्पर्ध्याच्या खेळात व्यत्यय न आणता एखाद्या खेळाडूचा प्रतिस्पर्ध्याच्या अंगणाच्या बाहेरील मोकळ्या जागेस स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग मानू नये.

१०) नेटजवळ खेळणाऱ्या खेळाडूचा खालील प्रसंगी नियमभंग होतो. अ) प्रतिस्पर्ध्याच्या अंगणातील चेंडू प्रतिस्पर्धी हिट करणार असतो त्यापूर्वी त्या चेंडूला अगर खेळाडूला स्पर्श करणे.
ब) जाळ्याजवळील खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात जाणे.
क) चेंडू खेळत असताना जाळ्याला अगर अँटेनाला स्पर्श करणे.

व्हॉलीबॉल मागील रांगेतील खेळाडू नियम

१) मागील रांगेतील खेळाडूंना (Back line players) ब्लॉकमध्ये भाग घेता येणार नाही.

२) ब्लॉक करताना पुढील रांगेतील खेळाडूंबरोबरच मागील रांगेतील खेळाडूने भाग घेतला आणि त्या वेळी त्याला अगर ब्लॉक करणाऱ्या पुढील रांगेतील खेळाडूला चेंडूचा स्पर्श झाला‚ तर ब्लॉक करणाऱ्यांचा नियमभंग होतो. चेंडूचा कोणालाच स्पर्श झाला नाही‚ तर तो नियमभंग मानू नये. लिबरो खेळाडूने ब्लॉक करण्यामध्ये सहभागी होणे नियमबाह्य आहे.

३) मागील रांगेतील खेळाडू हल्ला रेषेच्या पुढे येऊन खेळू शकतात. मात्र‚ त्या वेळी त्यांना जाळ्याच्या उंचीपेक्षा वर असलेला चेंडू पलीकडे टोलविता येणार नाही.

४) मागील रांगेतील खेळाडू हल्ला रेषेच्या मागून स्मॅशिंग करू शकतो; परंतु त्या वेळी त्याचा टेक-ऑफ (Take-off) हल्ला रेषेच्या पाठीमागे पाहिजे. स्मॅशिंगनंतर त्याचा हल्ला रेषेला किंवा त्यापुढील जमिनीस स्पर्श झाला तरी चालतो. (अपवाद लिबरो)

व्हॉलीबॉल चेंडूशी स्पर्श नियम

१) आपल्या अंगणात आलेला चेंडू संघातील खेळाडूंनी जास्तीतजास्त सलग तीन वेळा त्याला स्पर्श करून जाळ्याच्या पलीकडे प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात टोलविला पाहिजे.

२) एका खेळाडूला सलग दोन वेळा चेंडूला स्पर्श करता येणार नाही. (अपवाद – ब्लॉकिंग)

३) शरीराच्या कोणत्याही भागाला चेंडूचा स्पर्श झाला आणि चेंडू रिबाउंड झाला तरी चालतो.

४) चेंडू टोलविताना खेळाडूच्या शरीराच्या अनेक भागांचा एकाच वेळी स्पर्श (Simultaneous touch) होऊन चेंडू टोलविला‚ तर तो नियमभंग नाही.

५) एकाच वेळी दोन खेळाडूंनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला एकाचाच स्पर्श झाला‚ तर तो एकच स्पर्श मानला जाईल. परंतु एकाच संघाच्या दोन खेळाडूंचा एकाच वेळी चेंडूला स्पर्श झाला‚ तर त्या वेळी दोन स्पर्श (Two touches) मानले जातील. (अपवाद – ब्लॉकिंग)

६) खेळाडूच्या बोटांच्या टोकांना चेंडूचा स्पर्श झाला व चेंडू झटकन रिबाउंड (Rebound) होऊन त्याच्या मागे गेला‚ तर तो नियमभंग मानू नये.

७) आपल्या संघातील दुसऱ्या खेळाडूशी शरीराचा संपर्क असताना चेंडू खेळता येईल. मात्र‚ चेंडू मारण्यासाठी खेळाडूचा आधार म्हणून उपयोग करता येणार नाही.

८) प्रत्येक सेटमध्ये रॅली (खेळी) जिंकणाऱ्या संघास एक गुण मिळतो व त्या संघाकडे सर्व्हिस जाते / राहते.

व्हॉलीबॉल सेट्स व सामना

१) सामन्यामध्ये पाच सेट्स असतात. पाचपैकी तीन सेट्स जिंकणारा संघ विजयी होतो. पहिले चार सेट्स प्रत्येकी २५ गुणांचे असतात‚ तर पाचवा निर्णायक सेट १५ गुणांचा असतो.

२) सरपंच नाणेफेक करतील आणि नाणेफेक जिंकणारा संघ सर्व्हिस किंवा क्रीडांगणाची बाजू याची निवड करील.

३) प्रत्येक सेटनंतर दोन्ही संघ क्रीडांगणाच्या बाजू बदलतील.

४) दोन सेटमध्ये तीन मिनिटांची विश्रांती राहील. विश्रांतीच्या काळात पुढील सेटसाठी रोटेशन ऑर्डरमध्ये करावयाच्या बदलाची नोंद करावी.

५) २५ गुणांच्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा किमान दोन गुणांच्या आधिक्याने प्रथम २५ गुण मिळविणारा संघ त्या सेटमध्ये विजयी होतो. (सेटमध्ये दोन्ही संघांचे २४-२४ गुण झालेले असतील‚ तर कोणत्याही एका संघाला दुसऱ्या संघापेक्षा दोन गुणांची आघाडी मिळेपर्यंत सेट सुरू राहील. उदा. २६-२४‚ २७-२५‚ २८-२६.

६) दोन्ही संघांनी २-२ सेट जिंकले असतील‚ तर पाचवा निर्णायक सेट खेळविला जातो. हा सेट ‘टायब्रेकर’ सेट म्हणून ओळखला जातो. पाचव्या सेटसाठी सरपंच नाणेफेक करतील आणि नाणेफेक जिंकणारा संघ सर्व्हिस किंवा बाजू याची निवड करील. कोणत्याही एका संघाचे आठ गुण झाल्यानंतर बाजू बदलतात. बाजू बदलताना ज्या संघाकडे सर्व्हिस होती‚ त्याच संघाकडे सर्व्हिस राहील. आठ गुणांनंतर बाजू बदलण्याचे लक्षात आले नाही‚ तर लक्षात येताच बाजू बदलाव्यात. त्या वेळी असणारे गुणही तसेच राहतील.

जो संघ प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा किमान दोन गुणांच्या फरकाने प्रथम १५ गुण मिळवील‚ तो संघ विजयी होईल. दोन्ही संघांचे १४-१४ गुण झाले‚ तर कोणत्याही एका संघाला दुसऱ्या संघापेक्षा दोन गुणांची आघाडी मिळेपर्यंत सेट सुरू राहील (१६-१४‚ १७-१५‚ १८-१६)

७) अपरिहार्य कारणामुळे सामन्यात व्यत्यय (एकदा किंवा अनेकदा) आल्यामुळे सामना अपुरा राहिला आणि तो पुरा करण्यासाठी पुन्हा खेळविला तर –

 • चार तासांच्या आत त्याच मैदानावर सामना सुरू झाला‚ तर ज्या गुणांवर सेट थांबविला होता‚ तेथून पुढे सामना सुरू होईल.
 • चार तासांच्या आत परंतु दुसऱ्या मैदानावर सामना घेतला‚ तर पूर्ण खेळलेल्या सेट्सचा निकाल तसाच राहील आणि अपुरा राहिलेला सेट पुन्हा पहिल्यापासून सुरू केला जाईल. (संघातील खेळाडू व लाइन अप यांत बदल होणार नाही.)
 • चार तासांपेक्षा अधिक वेळ गेला असेल‚ तर पूर्ण सामना कोणत्याही मैदानावर खेळविला जाईल.

व्हॉलीबॉल सामना अधिकारी

सामन्यासाठी एक सरपंच (First referee)‚ एक पंच (Second referee)‚ चार रेषापंच (Line judges) आणि एक गुणलेखक असे अधिकारी असतील. त्यांची कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत :

व्हॉलीबॉल सरपंच

१) सरपंच हा सामन्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी असतो. तो मैदानाबाहेर नेटच्या एका बाजूस असा उभा (किंवा बसलेला) असतो की‚ त्याची दृष्टी जाळ्याच्या पट्टीच्या वर किमान ५० सें.मी. राहील.

२) खेळाच्या मैदानाची स्थिती‚ साहित्य या बाबी समाधानकारक आहेत याची तो खात्री करून घेईल.

३) सरपंच संघनायकांच्या उपस्थितीत नाणेफेक करतो.

४) सरपंच आपल्या निर्णयाबाबत चर्चा करण्यास कोणासही परवानगी देणार नाही. खेळाडू‚ कोच किंवा व्यवस्थापक यांच्या नियमबाह्य वर्तनाबद्दल त्यांना शासन करण्याचा अधिकार सरपंचाला आहे. (संघनायक निर्णयाचे स्पष्टीकरण मागू शकतो. स्पष्टीकरणाने त्याचे समाधान झाले नाही‚ तर तो लेखी तक्रार देऊ शकतो. सामना संपल्यानंतर गुणपत्रकावर त्याची नोंद होईल. कोच स्पष्टीकरण मागू शकत नाही किंवा वादविवाद करू शकत नाही.)

५) पंचांचा किंवा रेषापंचांचा निर्णय चुकीचा असेल तर सरपंच तो निर्णय रद्द करून आपला निर्णय देतो.

६) पंच किंवा रेषापंच यांचे काम समाधानकारक होत नसेल‚ तर सरपंच त्यांना बदलू शकतो.

७) सर्व्हिस करणाऱ्याचा नियमभंग आणि त्या संघाचे खेळाडू यांच्या जागा याबाबतचे निर्णय देतो.

८) चेंडू खेळताना होणारे नियमभंग‚ नेटच्या खाली आणि वर होणारे नियमभंग याबाबत सरपंच निर्णय देतो.

९) सामना संपल्यानंतर गुणपत्रकावर स्वाक्षरी करतो.

खेळाडूच्या किरकोळ चुकांबद्दल सरपंच संघनायकाला तोंडी सूचना देतील आणि पुन्हा अशा चुका घडणार नाहीत याबाबत सूचना करतील.

सामना अधिकारी व प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू यांच्याविषयी अपशब्द वापरणे‚ गैर हावभाव करणे‚ अंगावर धावून जाणे इ. बाबी गैरवर्तन म्हणून शिक्षेस पात्र ठरतात व गैरवर्तनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच शिक्षा देतात. उदा. – खेळाडूकडून प्रथमच गुन्हा घडला असेल‚ तर त्या संघाची सर्व्हिस जाईल / प्रतिस्पर्धी संघास एक गुण दिला जाईल.

खेळाडूकडून असभ्य व गंभीर गैरवर्तनाची पुनरावृत्ती होत असेल‚ तर अशा खेळाडूस मैदानाबाहेर काढण्याचा सरपंचास अधिकार आहे. मैदानाबाहेर काढलेल्या खेळाडूला त्या सामन्यात पुढे खेळता येणार नाही.

व्हॉलीबॉल पंच

 1. सरपंचाच्या विरुद्ध बाजूला उभे राहून सामन्यामध्ये सरपंचाला मदत करणे.
 2. काही अपरिहार्य कारणामुळे सरपंच‚ सामन्यामध्ये सरपंच म्हणून पुढे काम करण्यास असमर्थ असेल; तर पंच त्याच्या जागी सरपंच म्हणून काम करेल.
 3. प्रत्येक सेट सुरू होताना दिलेल्या क्रमानुसार खेळाडू उभे आहेत काय‚ ते पाहणे.
 4. सर्व्हिसच्या वेळी खेळाडू आपापल्या जागी आहेत काय‚ ते पाहणे.
 5. मध्यरेषेवर खेळाडूचा होणारा नियमभंग पाहणे.
 6. खेळाडूचा जाळ्यास स्पर्श होऊन होणारा नियमभंग पाहणे.
 7. आपल्या बाजूकडील साइड-मार्कर व अँटेनाजवळ होणारा नियमभंग पाहणे.
 8. संघनायक किंवा कोच यांच्या विनंतीनुसार बदली खेळाडू घेण्यास परवानगी देणे.
 9. राखीव खेळाडू व कोच यांच्यावर लक्ष ठेवणे.
 10. अवैध कृतीकडे सरपंचाचे लक्ष वेधणे.
 11. त्रुटित काळात चेंडू आपल्याजवळ ठेवणे.
 12. त्रुटित काळाची नोंद ठेवणे व संबंधित संघाने सेटमध्ये किती वेळा त्रुटित काळ घेतला‚ हे कोच आणि संघनायक यांना सांगणे.
 13. खेळाडू जखमी झाल्यास त्यासाठी लागणारा ३ मिनिटांचा त्रुटित काळ व जखमी खेळाडूबद्दल बदली खेळाडू घेण्यास परवानगी देण्याचा अधिकार आहे.
 14. लिबरो व बॅककोर्टमधील खेळाडूंच्या अॅटॅक हिटकडे त्याचे लक्ष असते.
 15. गुणलेखकाच्या कामावर पंचाचे नियंत्रण असते. १६) सामना संपल्यानंतर गुणपत्रकावर स्वाक्षरी करतील.

व्हॉलीबॉल रेषापंच

 1. किमान दोन रेषापंच असतील.
 2. रेषापंच हे सरपंच आणि पंच यांच्या उजव्या हाताकडील क्रीडांगणाच्या कोपऱ्यापासून तीन मीटर अंतरावर असतील.
 3. पाठीमागील व त्याच्या बाजूची रेषा यावर होणारे नियमभंग सरपंचाच्या निदर्शनास आणून देतील.
 4. सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूच्या नियमभंगाकडे सरपंचाचे लक्ष वेधतील.
 5. सर्व्हिस केली जाते त्या वेळी सर्व्हिस करणारा सोडून इतर खेळाडू आपल्या अंगणात असतील याकडे लक्ष देतील.

व्हॉलीबॉल गुणलेखक

गुणलेखक खालील जबाबदाऱ्या पार पाडील.

 1. पंचांच्या पाठीमागे बसून गुणांची नोंद करणे.
 2. खेळाडूंच्या खेळण्याच्या क्रमाची (Rotation order) नोंद करणे. तसेच बदली खेळाडूंच्या नावांची नोंद करणे.
 3. लिबरो खेळाडूचा नंबर व नावाची नोंद करणे.
 4. बदली खेळाडू घेतल्याची नोंद करणे.
 5. सेटमध्ये प्रत्येक संघाने किती वेळा त्रुटित काळ घेतला याची नोंद करणे.
 6. सेट संपल्यावर व अंतिम सेटमध्ये आठ गुणांनंतर अंगण बदलण्यास सांगणे.
 7. खेळणाऱ्या खेळाडूंच्या उभे राहण्याच्या क्रमावर लक्ष ठेवणे.
 8. खेळाडू बाद केला असेल‚ तर त्याबाबतच्या कारणांची व शेऱ्यांची नोंद करणे.
 9. सामना संपल्यावर गुणपत्रकावर पंच व सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या घेणे.
 10. संघनायकाची तक्रार असेल‚ तर ती सरपंचाच्या परवानगीने गुणपत्रकावर नोंदवणे.

पुढे वाचा:

Leave a Reply