Handball Information in Marathi: हँडबॉल हा फुटबॉल आणि बास्केटबॉल सारखा खेळला जात फक्त भारतातच नाही तर जगभरात. जरी समान नावांमुळे लोक सहसा गोंधळून जातात, तर हा खेळ एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यांचे नियम देखील खूप भिन्न आहेत. हँडबॉल खेळाचा उगम 19 व्या शतकात डेन्मार्क, स्वीडन आणि जर्मनीमध्ये झाला असे मानले जाते.
हँडबॉलचा एक प्रात्यक्षिक सामना 1928 च्या एम्सटर्डम ऑलिम्पिक खेळांमध्ये खेळला गेला, ज्यात जगातील 11 देशांनी भाग घेतला. 1936 मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हँडबॉलचा समावेश करण्यात आला. जरी हा खेळ भारतात 1970 मध्ये सुरू झाला होता. येथे आपण हँडबॉल कसा खेळला जातो आणि हँडबॉलचे नियम तपशीलवार कसे आहेत याची संपूर्ण माहिती देत आहात.
हँडबॉल खेळाची माहिती मराठी – Handball Information in Marathi
Table of Contents
हँडबॉल खेळाचा इतिहास
डेन्मार्कला आधुनिक हँडबॉलचा प्रवर्तक मानले जाते, जरी आधुनिक हँडबॉलचे नियम 1898 मध्ये जिम शिक्षक, होल्गर नेल्सन यांनी तयार केले होते, जे 1906 मध्ये प्रकाशित झाले होते. यानंतर, वर्ष 1917 मध्ये, जर्मनीच्या मॅक्स हेगर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी हँडबॉलच्या नियमांचा आणखी एक संग्रह प्रकाशित केला. या खेळाच्या नियमांवर आधारित, 1925 मध्ये जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात हँडबॉलचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आणि 1926 मध्ये आंतरराष्ट्रीय हँडबॉल महासंघाची स्थापना झाली.
भारतात हँडबॉलची सुरुवात 1970 साली झाली आणि भारतात हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी ‘हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया’ ची स्थापना 1970 साली झाली. या असोसिएशनच्या माध्यमातून देशातील विविध स्तरांवर हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. भारतातील पहिली राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धा 1981 साली आयोजित करण्यात आली होती आणि 1982 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ती समाविष्ट करण्यात आली होती.
हँडबॉल विषयी माहिती
हँडबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे जो दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात एकूण खेळाडू असतात, त्यापैकी 1 गोलकीपर असतो. खेळाची वेळ रेफरीच्या शिटी वाजवण्यापासून सुरू होते. या खेळातील खेळाडूंचा मुख्य उद्देश चेंडू त्यांच्या विरोधी संघाच्या गोलमध्ये फेकणे आहे आणि ही प्रक्रिया वेळ संपेपर्यंत चालू राहते.
हा खेळ प्रत्येकी 30-30 च्या दोन डावांमध्ये खेळला जातो आणि या दोन जत्रांमध्ये 10 मिनिटांचा ब्रेक दिला जातो. जर दोन्ही संघांचे गुण समान असतील, तर 5 मिनिटांच्या अंतरानंतर, 5-5 मिनिटांचे दोन अर्ध-खेळ खेळले जातात. त्यांच्यामध्ये 1 मिनिटांचा अंतर घेतला जातो. यामध्ये देखील, सामना झाल्यास, निर्णय 7 मीटर थ्रोद्वारे सुनिश्चित केला जातो.
हँडबॉल नियम
- खेळाच्या दरम्यान, खेळाडूंना गोल करण्याची मर्यादा निश्चित केली जाते, म्हणजेच ते फक्त एका विशिष्ट अंतरावरून गोल करू शकतात. या दरम्यान, जर त्याने सीमारेषा ओलांडली, तर ती एक चुकीची मानली जाते.
- या खेळाच्या नियमानुसार, प्रत्येक खेळाडू 3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ चेंडू त्याच्यासोबत ठेवू शकत नाही, जर त्याने तसे केले तर ते फॉल मानले जाते.
- गोल स्कोअर गोल पॉईंटपासून 3 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या खेळाडूने त्याच्या विरोधी संघाच्या बॉल पासिंगमध्ये व्यत्यय आणला तर तो खेळाडू 2 मिनिटांसाठी खेळाबाहेर असतो.
- 7-मीटर थ्रो रेफरीच्या शिट्टीच्या 3 सेकंदात घेणे आवश्यक आहे आणि चेंडू हातातून बाहेर पडण्यापूर्वी फेकणाऱ्याने 7-मीटर ओळीला स्पर्श करू नये.
हँडबॉल क्रीडांगण
- लांबी ४० मी.
- रुंदी २० मी. (क्रीडांगणाच्या बाहेर १ मी. ते २ मी. मोकळी जागा असावी.)
हँडबॉल मध्यरेषा
क्रीडांगणाचे दोन समान भाग करणारी आणि गोलरेषांशी समांतर असणारी रेषा. (जाडी ५ सें.मी.)
हँडबॉल गोलरेषा
क्रीडांगणाच्या रुंदीच्या बाजूच्या अंतिम रेषा. गोलरेषेची जाडी ८ सें.मी. असते.
हँडबॉल स्पर्शरेषा
क्रीडांगणाच्या लांबीच्या बाजूच्या अंतिम रेषा. (जाडी ५ सें.मी.)
हँडबॉल गोलक्षेत्र व गोलक्षेत्र रेषा
क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूंना गोलरेषेच्या मध्यबिंदूतून ६ मी. आत क्रीडांगणावर गोलरेषेशी समांतर अशी ३ मी. लांबीची सरळ रेषा काढली जाते. गोलखांबाच्या आतील बाजूच्या मागील कोपऱ्यापासून (Back inside corner of the goal post) ६ मी. त्रिज्येने गोलरेषा आणि ३ मी.ची सरळ रेषा यांना जोडणारी पाव वर्तुळे काढली जातात. अशा प्रकारे गोलाच्या पुढे क्रीडांगणावर जे क्षेत्र तयार होते‚ त्याला गोलक्षेत्र म्हणतात. हे क्षेत्र ज्या साधारण अर्धवर्तुळाकृती रेषेने तयार होते‚ त्या रेषेला गोलक्षेत्र रेषा म्हणतात.
हँडबॉल खेळाचे मैदान
हँडबॉल फ्री थ्रो रेषा
गोलरेषेच्या मध्यबिंदूपासून ९ मी. अंतरावर क्रीडांगणात गोलरेषेशी समांतर अशी ३ मी. लांबीची तुटक रेषा काढतात. गोलखांबाच्या आतील बाजूच्या मागील कोपऱ्यापासून ९ मी. त्रिज्येने ३ मी. लांबीच्या रेषेची टोके व स्पर्शरेषा यांना जोडणारी पाव वर्तुळे तुटक रेषांनी काढतात. अशा तऱ्हेने काढलेल्या साधारणपणे अर्धवर्तुळाच्या तुटक रेषेला फ्री थ्रो रेषा म्हणतात.
हँडबॉल पेनल्टी रेषा
गोलरेषेच्या मध्यबिंदूपासून ७ मी. अंतरावर क्रीडांगणात गोलरेषेशी समांतर अशी काढलेली १ मी. लांबीची रेषा.
हँडबॉल गोल
गोलरेषेवर मध्यभागी गोल असतो. दोन उभे खांब व त्यावर एक आडवा खांब मिळून गोल तयार होतो. दोन खांबांमधील अंतर ३ मी. असते.
आडव्या खांबाच्या खालच्या बाजूची जमिनीपासून उंची २ मी. असते. खांब चौकोनी (८ सें.मी × ८ सें.मी.) आणि लाकडाचे असावेत. त्यांना सर्व बाजूंनी दोन रंगांत रंगवलेले असावे. गोलखांबांमधील गोलरेषा ८ सें.मी. जाडीची असते.
गोलाच्या मागे जाळे असे बांधलेले असावे की‚ त्यात फेकलेला चेंडू झटकन परत येऊ नये.
हँडबॉल चेंडू
चेंडूचे वजन –
पुरुषांसाठी – ४२५ ते ४७५ ग्रॅम
महिलांसाठी – ३२५ ते ३७५ ग्रॅम
चेंडूचा आकार –
चेंडूचा आकार गोल असून‚ रबरी ब्लॅडरवर एकरंगी कातडी किंवा सिंथेटिकचे आवरण असते.
चेंडूचा परीघ –
पुरुषांसाठी – ५८ ते ६० सें.मी.
महिलांसाठी – ५४ ते ५६ सें.मी.
हँडबॉल संघ व खेळाडू
संघात दोन गोलरक्षकांसह चौदा खेळाडू असतात. त्यांपैकी सात खेळाडू प्रत्यक्ष खेळण्यासाठी मैदानात उतरतात. त्यांमध्ये एक गोलरक्षक व सहा मैदान खेळाडू (Court players) असतात.
राखीव खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून कितीही वेळा घेता येईल. क्रीडांगणावरील खेळाडू निर्धारित क्षेत्रातून बाहेर आल्यावर बदली खेळाडू त्याच क्षेत्रातून ताबडतोब आत जाईल.
गरज भासली‚ तर मैदान खेळाडू गोलरक्षक म्हणून खेळू शकेल; परंतु गोलरक्षकाला मैदान खेळाडू म्हणून खेळवता येणार नाही. गोलरक्षकाच्या जागेवर खेळणाऱ्या मैदान खेळाडूस पुन्हा आपल्या जागी मैदान खेळाडू म्हणून खेळता येईल.
संघात किमान पाच खेळाडू असल्याशिवाय सामना सुरू होणार नाही. सामना सुरू झाल्यावर संघात पाचपेक्षा कमी खेळाडू खेळत असले‚ तरी खेळ सुरू राहील.
हँडबॉल खेळाडूंचा गणवेश
गोलरक्षकांचा अपवाद वगळता‚ संघातील मैदान खेळाडूंचा गणवेश सारखा असतो. गोलरक्षकाचा पोशाख वेगळा असावा. दोन्ही संघांतील खेळाडूंचे गणवेश वेगवेगळ्या रंगांचे असावेत.
प्रत्येक खेळाडूच्या शर्टच्या छातीवर आणि पाठीवर (शक्यतो पॅन्टवरसुद्धा) २० सें.मी. उंचीचे १ ते १४ असे क्रमांक असावेत. गोलरक्षकांसाठी १ आणि १४ हे क्रमांक असतात.
खेळाडूंच्या पायांत स्पोर्ट्स शूज असावेत. टोकदार बूट वापरता येणार नाहीत.
हँडबॉल खेळाचा कालावधी
ज्यूनिअर‚ पुरुष व महिलांसाठी प्रत्यक्ष खेळासाठी ६० मिनिटांचा कालावधी असतो. ३०-३० मिनिटांचे दोन डाव खेळले जातात. दोन डावांमध्ये १० मिनिटांची विश्रांती असते. (सरपंच व संघनायक सहमत असतील‚ तर विश्रांतीचा कालावधी कमी करता येईल.)
कुमार गटांसाठी २५-२५ मिनिटांचे दोन डाव आणि दोन डावांमध्ये १० मिनिटांची विश्रांती असते. ८ ते १२ वर्षे वयोगटासाठी २०-२० मिनिटांचे दोन डाव आणि दोन डावांमध्ये १० मिनिटांची विश्रांती असते.
मध्यंतरानंतर संघ आपले गोलक्षेत्र बदलतात.
हँडबॉल खेळाची सुरुवात
नाणेफेक जिंकणारा संघ मैदान किंवा थ्रो-ऑफ (Throw-off) याची निवड करतो.
खेळाची सुरुवात थ्रो-ऑफ करून केली जाते. थ्रो-ऑफ करणारा खेळाडू क्रीडांगणावर मध्यभागी उभा राहतो. पंचांचा इशारा होताच तो आपल्या संघाच्या खेळाडूकडे चेंडू फेकतो. पंचांचा इशारा होताच तीन सेकंदांच्या आत त्याने चेंडू फेकला पाहिजे.
थ्रो-ऑफ केला जातो‚ त्या वेळी इतर खेळाडू आपापल्या मैदानावर उभे असतात. थ्रो-ऑफचा चेंडू हातातून सुटेपर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडू थ्रो-ऑफ करणाऱ्यापासून किमान ३ मी. दूर असतील. थ्रो-ऑफ होईपर्यंत ते आपली जागा सोडणार नाहीत.
खेळ सुरू होताना ज्या संघाने थ्रो-ऑफ केला होता‚ त्याच्या प्रतिस्पर्धी संघाने मध्यंतरानंतर खेळ सुरू होताना थ्रो-ऑफ करावा.
गोल झाल्यानंतर ज्या संघावर गोल झाला असेल‚ त्या संघाचा खेळाडू थ्रो-ऑफ करतो.
थ्रो-ऑफ करून सरळ गोल करता येणार नाही.
हँडबॉल चेंडू कसा खेळला जातो?
खेळ सुरू असताना मैदान खेळाडू पुढीलप्रमाणे चेंडू खेळू शकतो :
- चेंडू हाताने कोणत्याही दिशेस फेकता येतो‚ टप्पी-टप्पी (Bouncing) खेळता येतो.
- चेंडू हात‚ डोके‚ गुडघा‚ मांड्या‚ धड यांनी थोपवता येतो.
- चेंडू हात‚ पंजा‚ मूठ‚ डोके‚ गुडघा यांनी मारता येतो.
- चेंडू एका किंवा दोन्ही हातांनी थोपवून पकडू शकतो‚ परंतु त्या वेळी त्याला हालचाल करता येणार नाही.
- चेंडू एका हातातून दुसऱ्या हातात घेता येतो.
- चेंडू तीन सेकंदांपेक्षा अधिक वेळ हातात ठेवता येणार नाही.
- बसलेल्या‚ गुडघ्यावर बसलेल्या किंवा जमिनीवर आडवे झालेल्या स्थितीत खेळाडू चेंडू पास करू शकतो.
- चेंडू एका हाताने जमिनीबरोबर सरपटत (Rolling) सोडता येतो.
चेंडू खेळताना पुढील बाबींना मनाई आहे :
- गुडघ्याच्या खालील पायाच्या भागाने चेंडूला स्पर्श करता येणार नाही किंवा चेंडू खेळता येणार नाही. (अपवाद – गोलरक्षक)
- चेंडूकडे सूर मारून चेंडू ताब्यात घेता येणार नाही. (अपवाद – गोलरक्षक)
- मैदान खेळाडूला गोलक्षेत्रात प्रवेश करता येणार नाही.
- चेंडू गोलरेषा किंवा स्पर्शरेषा यांच्या बाहेर हेतुपुरस्सर घालवता येणार नाही.
- एकदा चेंडूला स्पर्श केलेला खेळाडू त्या चेंडूला जमीन‚ गोलखांब किंवा दुसरा खेळाडू यांचा स्पर्श झाल्याशिवाय पुन्हा स्पर्श करणार नाही.
चेंडूसह हालचाल (Moving with the ball) करीत असताना तो खेळाडू फक्त तीन पावले पुढे जाऊ शकतो. त्यानंतर एका हाताने चेंडूचा टप्पा (Bouncing) टाकून तो पुन्हा तीन पावले पुढे जाऊ शकतो.
चेंडू एका हाताने बाउन्स करीत तो कितीही पुढे जाऊ शकतो किंवा एका हाताने उभ्या स्थितीत बाउन्स करू शकतो.
धावत असताना किंवा उडी मारून चेंडू पकडला‚ तर त्याच्या दोन्ही पायांचा जमिनीस स्पर्श झाल्यावर तो तीन पावले पुढे जाऊ शकतो.
चेंडू एका हाताने जमिनीलगत घरंगळत सोडता येतो.
प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर खेळत असताना (Tackling) चेंडूचा ताबा घेण्यासाठी आपल्या हाताचा वापर करू शकतो. तसेच प्रतिस्पर्ध्याकडून चेंडू घेण्यासाठी हाताच्या पंजाचा वापर करू शकतो. प्रतिस्पर्ध्याकडे चेंडू असो अगर नसो‚ तो प्रतिस्पर्ध्यासमोर आपल्या शरीराचा – धडाचा अडथळा उभा करू शकतो.
परंतु प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळत असताना पुढील बाबींना मनाई आहे :
- प्रतिस्पर्धी खेळाडूस धक्का मारणे.
- प्रतिस्पर्ध्याच्या ताब्यातील चेंडू एका किंवा दोन्ही हातांनी हिसकावून घेणे.
- हातांनी‚ पायांनी प्रतिस्पर्ध्यास प्रतिबंध करणे.
- जोरात फटका मारून त्याच्या हातातील चेंडू पाडणे.
- एका किंवा दोन्ही हातांनी प्रतिस्पर्ध्यास पकडून ठेवणे.
- प्रतिस्पर्ध्याशी दांडगाईचा खेळ करणे‚ त्याच्यावर उडी मारणे.
- पायात पाय अडकवून प्रतिस्पर्ध्यास पाडणे.
- प्रतिस्पर्ध्यापुढे शरीर झोकून देऊन अडथळा निर्माण करणे.
- प्रतिस्पर्ध्यास ढकलणे‚ गोलक्षेत्रात ढकलणे.
- चेंडू हेतुपुरस्सर प्रतिस्पर्ध्याला फेकून मारणे.
- प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर धावून जाणे.
हँडबॉल त्रुटित काळ (Time Out)
प्रत्येक संघाला प्रत्येक सत्रात एकदा त्रुटित काळाची मागणी करता येईल. प्रत्येक त्रुटित काळ एक मिनिटाचा असेल. चेंडू आपल्या ताब्यात असलेल्या संघालाच त्रुटित काळाची मागणी करता येईल. (संघाचे मार्गदर्शक त्रुटित काळाची वेळाधिकाऱ्याकडे मागणी करतात.)
हँडबॉल गोलक्षेत्र व गोलरक्षक
गोलक्षेत्रात फक्त गोलरक्षकच खेळू शकतो. अन्य मैदान खेळाडूंना गोलक्षेत्रात प्रवेश करता येणार नाही. गोलरेषेला स्पर्श केलेला किंवा गोलक्षेत्र रेषा पार करून आत आलेला चेंडू गोलरक्षक खेळू शकतो.
गोलक्षेत्र रेषा पार करून गोलक्षेत्रात आलेल्या चेंडूला गोलरक्षकाचा स्पर्श न होता चेंडू गोलक्षेत्राच्या बाहेर गेला‚ तर तो चेंडू खेळात राहील.
संरक्षक खेळाडूने सहेतुकपणे चेंडू आपल्याच गोलक्षेत्रात फेकला किंवा खेळला आणि त्या चेंडूला कोणाचाही स्पर्श न होता तो चेंडू गोलात गेला‚ तर त्या गोलाची नोंद होईल; गोलरक्षकाने गोल होण्यास अवैधरीत्या प्रतिबंध केला तर प्रतिपक्षास पेनल्टी थ्रो दिला जाईल; अन्य बाबतीत प्रतिपक्षास फ्री थ्रो दिला जाईल. (चेंडू सहेतुकपणे खेळला नसेल‚ तर चेंडू खेळात राहील.)
गोलरक्षक आपल्या गोलक्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीने आपल्या गोलाचे संरक्षण करू शकतो. (चेंडू गोलमुखाकडे किंवा गोलरेषेकडे जात असेल‚ तर तो आपल्या गुडघ्याखालील पायाचा वापर करून बचाव करू शकतो.)
आपल्या हातात चेंडू असताना गोलक्षेत्रात तो कितीही पावले टाकू शकतो व मैदान खेळाडूपेक्षा थोडा अधिक वेळ चेंडू हातात ठेवू शकतो. (त्याने वेळेचा अपव्यय करू नये.) गोलरक्षक गोलक्षेत्राच्या बाहेर आला‚ तर इतर मैदान खेळाडूसाठी असलेल्या नियमांचे त्याला पालन करावे लागते.
गोलक्षेत्रात पडून किंवा लोळण घेऊन त्याला गोलक्षेत्राबाहेरच्या चेंडूला स्पर्श करता येणार नाही‚ बाहेरचा चेंडू आत घेता येणार नाही किंवा चेंडू खेळता येणार नाही.
गोलक्षेत्र रेषा ही गोलक्षेत्रातच समाविष्ट आहे‚ असे मानले जाते. गोलरक्षकाने चेंडू फेकल्यावर इतर खेळाडूंचा चेंडूस स्पर्श झाल्याशिवाय गोलरक्षकाला तो चेंडू पुन्हा खेळता येणार नाही.
हँडबॉल फ्री थ्रो (Free throw)
पुढील प्रसंगी प्रतिस्पर्धी संघास फ्री थ्रो दिला जातो :
- खेळाडू अवैधरीत्या क्रीडांगणावर आला किंवा क्रीडांगणातून बाहेर गेला.
- अवैधरीत्या थ्रो-इन् केला.
- प्रतिस्पर्धी खेळाडूस प्रतिबंध केला‚ धक्का मारला; अडथळा आणला.
- चेंडू आपल्याच गोलक्षेत्रामध्ये ढकलला.
- चेंडू हेतुपुरस्सर क्रीडांगणाबाहेर काढला.
- गोलरक्षकाकडून नियमभंग झाला. (अपवाद – पेनल्टी थ्रो)
- चेंडू खेळताना मैदान खेळाडूचा नियमभंग झाला.
- मैदान खेळाडूचा गोलक्षेत्रात नियमभंग झाला.
- पेनल्टी थ्रो करणाऱ्याचा नियमभंग झाला.
- अशोभनीय वर्तन घडले.
ज्या ठिकाणी प्रमाद घडला असेल‚ त्या ठिकाणाहून ताबडतोब फ्री थ्रो केला जातो. पंचांचा इशारा होऊनही ३ सेकंदांत फ्री थ्रो केला नाही‚ तर प्रतिपक्षास फ्री थ्रो दिला जातो.
गोलक्षेत्र रेषा आणि फ्री थ्रो रेषा यांच्यामध्ये संरक्षक संघाच्या खेळाडूचा प्रमाद घडला असेल‚ तर फ्री थ्रो रेषेच्या थोडा बाहेरून फ्री थ्रो घेतला जातो. त्या वेळी संरक्षक संघाचे खेळाडू थ्रो करणाऱ्यापासून किमान ३ मी. दूर‚ गोलक्षेत्र रेषेवर उभे असतील. थ्रो करणाऱ्याच्या हातातून चेंडू सुटेपर्यंत आक्रमक खेळाडू फ्री थ्रो रेषेला स्पर्श करणार नाहीत किंवा ती ओलांडणार नाहीत.
फ्री थ्रो करताना थ्रो करणाऱ्याच्या किमान एका पायाचा जमिनीशी संपर्क पाहिजे. त्याने फेकलेल्या चेंडूचा गोलखांबाला किंवा अन्य खेळाडूला स्पर्श झाल्याशिवाय त्याला चेंडूस पुन्हा स्पर्श करता येणार नाही.
फ्री थ्रो करून सरळ गोल करता येतो.
हँडबॉल थ्रो-इन्
खेळात असलेला चेंडू स्पर्शरेषा पूर्णपणे ओलांडून बाहेर जातो‚ त्या वेळी थ्रो-इन् केला जातो. स्पर्शरेषा ओलांडण्यापूर्वी ज्या खेळाडूचा शेवटी चेंडूला स्पर्श झाला होता‚ त्याच्या प्रतिस्पर्धी संघास थ्रो-इन् मिळतो.
जेथून स्पर्शरेषा पार करून चेंडू बाहेर गेला‚ तेथून थ्रो-इन केला जातो. थ्रो-इन् करताना थ्रो-इन् करणाऱ्याने चेंडू फेकला पाहिजे‚ तो घरंगळत सोडता येणार नाही किंवा चेंडूचा टप्पा पाडून आपल्या साथीदाराकडे देता येणार नाही.
थ्रो-इन् करणाऱ्याचे तोंड क्रीडांगणाकडे पाहिजे. चेंडू हातातून सुटताना त्याचे दोन्ही पाय स्पर्शरेषेच्या बाहेर असतील. त्याचा एक पाय स्पर्शरेषेच्या बाहेर पाहिजे (त्या पायाचा स्पर्शरेषेला स्पर्श असला तरी तो नियमभंग मानू नये.) दुसरा पाय कोठे असावा याबाबत बंधन नाही. थ्रो-इन् केल्यानंतर इतर खेळाडूंचा चेंडूला स्पर्श झाल्याशिवाय त्याला चेंडूस स्पर्श करता येणार नाही.
थ्रो-इन् केला जातो‚ त्या वेळी प्रतिस्पर्धी खेळाडू किमान ३ मी. दूर असतात.
संरक्षक खेळाडूला स्पर्श होऊन चेंडू गोलरेषा ओलांडून (गोलक्षेत्राच्या बाहेरून) क्रीडांगणाच्या बाहेर गेला तर आक्रमक संघास थ्रो-इन् मिळतो.
हँडबॉल गोल थ्रो
आक्रमक संघाच्या खेळाडूने फेकलेला किंवा त्याला स्पर्श होऊन चेंडू गोलमुखाऐवजी बाजूने किंवा आडव्या खांबाच्या वरून गोलरेषा पार करून क्रीडांगणाच्या बाहेर गेला‚ तर संरक्षक संघाला गोल थ्रो मिळतो.
संरक्षक संघाच्या गोलरक्षकाला स्पर्श होऊन चेंडू गोलमुखाऐवजी बाजूने किंवा वरून गोलरेषा पार करून बाहेर गेला‚ तर संरक्षक संघाला गोल थ्रो मिळतो.
थ्रो-ऑफ‚ थ्रो-इन् किंवा गोल थ्रो केलेला चेंडू सरळ‚ कोणत्याही खेळाडूचा स्पर्श न होता गोलात गेला; तर गोल थ्रो दिला जातो. (गोलाची नोंद होत नाही.)
गोलक्षेत्रातून गोलरक्षक गोल थ्रो करतो.
हँडबॉल पेनल्टी थ्रो (Penalty throw)
पुढील नियमबाह्य कृती घडल्यास प्रतिस्पर्धी संघास पेनल्टी थ्रो दिला जातो :
- क्रीडांगणावर कोणत्याही ठिकाणी व्यक्तिगत खोडसाळपणा करून आक्रमक संघाची नक्की गोल करण्याची संधी (A clear chance of a goal) घालवली.
- क्रीडांगणाच्या आपल्या अर्ध्या भागात वैयक्तिक धोकादायक खेळ करून नियमभंग केला.
- संरक्षक संघाचा खेळाडू बचाव करण्यासाठी गोलक्षेत्रात गेला.
- संरक्षक संघाच्या खेळाडूने चेंडू आपल्याच गोलक्षेत्रात हेतुपुरस्सर खेळला आणि त्या चेंडूचा गोलरक्षकास स्पर्श झाला.
- गोलरक्षकाने हेतुपुरस्सर चेंडू आपल्या गोलक्षेत्रात नेला.
- सरपंचाला पूर्वसूचना न देता एखादा मैदान खेळाडू गोलरक्षकाच्या जागी काम करण्यास गेला.
आक्रमक संघाच्या खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानातील पेनल्टी रेषेमागून गोलाच्या दिशेने थ्रो करावयाचा असतो. पेनल्टी थ्रो करणाऱ्याच्या हातातून चेंडू सुटताना त्याच्या पायाचा पेनल्टी रेषेला स्पर्श होऊ नये किंवा त्याने ती रेषा ओलांडू नये. थ्रो करताना त्याच्या किमान एका पायाचा जमिनीशी संपर्क पाहिजे. पेनल्टी थ्रो करण्यासाठी पंचाचा इशारा होताच ३ सेकंदांत पेनल्टी थ्रो केला पाहिजे.
पेनल्टी थ्रो केला जातो‚ त्या वेळी गोलरक्षक थ्रो करणाऱ्यापासून किमान ३ मी. दूर असेल. तो आपल्या क्षेत्रात हलू शकतो. गोलरक्षकाचा नियमभंग झाला‚ तर पुन्हा पेनल्टी थ्रो घेतला जातो.
पेनल्टी थ्रो केला जातो‚ त्या वेळी इतर मैदान खेळाडू फ्री थ्रो रेषेच्या बाहेर उभे असतील. प्रतिस्पर्धी खेळाडू थ्रो करणाऱ्यापासून किमान ३ मी. दूर असतील. ते थ्रो करणाऱ्याचे अवधान विचलित होईल अशी कृती करणार नाहीत.
पेनल्टी थ्रो करणाऱ्याच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी आक्रमक संघाच्या अन्य खेळाडूंचा फ्री थ्रो रेषेला स्पर्श झाला किंवा त्यांनी ती रेषा ओलांडली आणि त्या वेळी गोल झाला असेल‚ तर त्याची नोंद होणार नाही. पुन्हा पेनल्टी थ्रो घेतला जाईल.
पेनल्टी थ्रो करणाऱ्याच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी संरक्षक खेळाडूंचा फ्री थ्रो रेषेला स्पर्श झाला किंवा त्यांनी ती रेषा ओलांडली आणि त्या वेळी गोल झाला असेल‚ तर त्याची नोंद होईल. गोल झाला नसेल‚ तर पेनल्टी थ्रो पुन्हा घेतला जाईल.
पेनल्टी थ्रो केलेला चेंडू गोलखांबाला किंवा गोलरक्षकाला तटून गोलक्षेत्राच्या बाहेर आला‚ तर संरक्षक संघाला फ्री थ्रो मिळतो. चेंडू गोलरक्षकाने अडवला किंवा पकडला‚ तर खेळ पुढे सुरू राहील.
निलंबनाची शिक्षा म्हणून क्रीडांगणाबाहेर घालवलेल्या खेळाडूस पेनल्टी थ्रो करता येणार नाही.
पेनल्टी थ्रो घेत असताना खेळाची वेळ संपली असली तरी पेनल्टी थ्रो पूर्ण होईपर्यंत खेळ सुरू राहील.
हँडबॉल सरपंचाचा थ्रो (Referee’s throw)
पुढील प्रसंगी सरपंच चेंडू उभा आपटून खेळास पुन्हा सुरुवात करतात :
- एकाच वेळी दोन्ही संघांतील खेळाडूंचा नियमभंग झाला.
- नियमभंग न होता खेळ तात्पुरता थांबला.
- अनवधानाने खेळाडू चेंडूवर पडला.
सरपंच ज्या वेळी थ्रो करतात‚ त्या वेळी दोन्ही संघांतील खेळाडू चेंडूपासून किमान ३ मी. दूर असतात. चेंडूचा जमिनीस स्पर्श झाल्याशिवाय खेळाडू चेंडूस स्पर्श करू शकणार नाहीत.
गोलक्षेत्र रेषा आणि फ्री थ्रो रेषा यांच्यामध्ये खेळ थांबला असेल‚ तर त्या ठिकाणापासून फ्री थ्रो रेषेच्या बाहेरच्या बाजूस फ्री थ्रो रेषेजवळ थ्रो घेतला जातो. सर्व खेळाडू त्या वेळी चेंडूपासून किमान ३ मी. दूर असतील. चेंडूचा जमिनीस स्पर्श होईपर्यंत कोणताही आक्रमक खेळाडू फ्री थ्रो रेषेस स्पर्श करणार नाही किंवा ती रेषा ओलांडणार नाही.
हँडबॉल गोल होणे व सामन्याचा निर्णय
आक्रमकाने फेकलेला चेंडू गोलमुखातून (दोन गोलखांब आणि वरील आडवा खांब यामधून) गोलरेषा पूर्णपणे पार करून आत गेला‚ तर गोल होतो.
गोल मारतेवेळी संरक्षक संघाचा नियमभंग असेल व गोल झाला असेल‚ तर त्याची नोंद होईल.
संरक्षक खेळाडूकडून खेळलेला चेंडू जर त्यांच्याच गोलमुखातून पार झाला‚ तर गोलाची नोंद होईल.
सामना मध्यंतरासाठी थांबण्याची किंवा सामना संपण्यासाठी पंचाने शिट्टी दिल्यानंतर चेंडूने गोलमुखातून गोलरेषा पार केली‚ तर त्या गोलाची नोंद होणार नाही.
खेळाच्या कालावधीत जो संघ अधिक गोल करतो‚ तो संघ विजयी होतो.
पूर्ण वेळ खेळ होऊन बरोबरी होत असेल‚ तर पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाच-पाच मिनिटांचे (कुमार गटांसाठी ३.५ – ३.५ मिनिटांचे) दोन जादा डाव खेळवावेत. दोन जादा डावांत संघ बाजू बदलतील‚ परंतु मध्ये विश्रांती काळ नसेल. अजूनही निकाल लागत नसेल‚ तर पुन्हा दोन जादा डाव खेळवावेत. अजूनही निकाल लागला नाही‚ तर सामना समितीने ठरविले असेल त्याप्रमाणे कार्यवाही करून निर्णय घ्यावा.
हँडबॉल खेळाडू निलंबन
नियमभंग करणाऱ्या खेळाडूच्या संघाला संबंधित नियमभंगामुळे फायदा होणार नसेल आणि प्रतिस्पर्धी संघास प्रतिबंध होणार नसेल‚ तर सरपंच खेळात शक्यतो हस्तक्षेप करणार नाहीत.
अखिलाडूवृत्तीने‚ अशोभनीय दांडगाईने किंवा धोकादायक पद्धतीने खेळणाऱ्या खेळाडूस प्रथम ताकीद दिली जाईल. संबंधित खेळाडूचा पुन्हा प्रमाद घडल्यास त्याला २ मिनिटांसाठी निलंबित करून क्रीडांगणाबाहेर घालवले जाईल. प्रमादाची पुनरावृत्ती घडल्यास त्याला ४ मिनिटांसाठी निलंबित केले जाईल. तिसऱ्या वेळी गंभीर प्रमाद घडल्यास त्याला बाद (Disqualified) केले जाईल.
बाद केलेल्या खेळाडूच्या जागी बदली खेळाडू घेता येणार नाही.
गोलरक्षक निलंबित झाला असेल‚ तर त्याच्या जागी बदली खेळाडू घेता येईल; परंतु त्या वेळी संघातील एक मैदान खेळाडू मैदानाबाहेर जाईल. मैदानाबाहेर निर्धारित क्षेत्रात असलेल्या मार्गदर्शकाकडून अखिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडले तर तोही दंडात्मक कारवाईस पात्र ठरतो.
हँडबॉल सामना अधिकारी
सामन्यासाठी दोन सरपंच (Referees) असतात. दोन्ही सरपंचांना सारखेच अधिकार असतात. सरपंचांना मदत करण्यासाठी गुणलेखक आणि वेळाधिकारी यांची नेमणूक केलेली असते.
एक सरपंच संरक्षकांच्या मागे‚ गोलरेषेजवळ असतो. (Goal line referee)‚ दुसरा सरपंच आक्रमकांच्या मागील बाजूस असतो. (Court referee) खेळाचे पारडे जसे झुकेल तशा सरपंचांना आपल्या जागा बदलाव्या लागतात. (मध्यंतरानंतर त्यांनी बाजू बदलण्याची आवश्यकता नाही.)
सामान्यपणे गोल-लाइन सरपंचाने गोल‚ पेनल्टी थ्रो‚ फ्री थ्रो‚ पेनल्टी रेषेसंबंधीचे प्रमाद‚ गोलरक्षकाचा खेळ इ. बाबींबाबतचे निर्णय द्यावेत; कोर्ट-रेफरीने मध्यरेषेपासून गोलक्षेत्र रेषेपर्यंत होणाऱ्या खेळाचे निर्णय द्यावेत‚ असा संकेत आहे.
येथे तुम्हाला हँडबॉलबद्दल माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला यासंबंधी इतर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही www.marathime.com ला भेट देऊ शकता. यासह, आपण आपले विचार किंवा सूचना किंवा प्रश्न टिप्पणी बॉक्सद्वारे विचारू शकता. आम्ही तुमच्या सूचनांची वाट पाहत आहोत.
पुढे वाचा:
- कुस्ती खेळाची माहिती
- व्हॉलीबॉल माहिती
- टेबल टेनिस खेळाची माहिती
- रिंग टेनिस खेळाची माहिती
- खो खो खेळाची माहिती मराठी
- हॉकी खेळाची माहिती
- बास्केटबॉल खेळाची माहिती
- बॅडमिंटन खेळाची माहिती
- क्रिकेट मराठी माहिती
- कबड्डी माहिती मराठी
- फुटबॉल खेळाची माहिती
- हातोडा फेक माहिती मराठी
- भालाफेक माहिती मराठी
- थाळी फेक माहिती मराठी
- गोळा फेक माहिती मराठी
- बांबूची उडी माहिती मराठी
- उंच उडी माहिती मराठी
- लांब उडी खेळाची माहिती
- चालण्याची शर्यत माहिती
- रिले खेळाची माहिती मराठी
- हर्डल्स शर्यत माहिती मराठी