जल हेच जीवन निबंध मराठी – Jal Hech Jivan Nibandh in Marathi
जल हेच जीवन ही एक सत्य उक्ती आहे. यात यात्किंचितही अतिशयोक्ती नाही. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच अशक्य आहे. पृथ्वी हा असा एक ज्ञात ग्रह आहे जिथे जीवन त्याच्या संपूर्ण वैविध्यांसह उपस्थित आहे, कारण इथे पाणी आहे ते पण पुरेसे. पृथ्वीचा ३/४ भाग जलमय आहे. पाण्याचे हेच प्रमाण आपल्या शरीरात पण असते. शनी, गुरू, मंगळ यासारख्या ग्रहांवर जीवसृष्टीची कोणतीही लक्षणे नाहीत. कारण तेथे पाण्याचा अभाव आहे. चंद्रावर ही हीच स्थिती आहे. तो निर्मनुष्य उजाड आणि निर्जीव उपग्रह आहे. जिथे पाणी आहे तिथेच जीवसृष्टीसाठी आवश्यक असणारे तापमान, प्राणवायू, अन्न आदी घटक अस्तित्वात असतात. जीवसृष्टीसाठी पाणी हा प्रथम अनिवार्य घटक आहे.
मानव पशु, पक्षी, कीटक, वनस्पती इ. सर्वांनाच पाण्याशिवाय जगता येत नाही. पाणी हे अमृत आहे. अनेक रूपांमधे पाणी उपलब्ध आहे. वायुमंडळात वायुरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपण ते पाहू शकतो. समुद्र, महासागर, नद्या, झरे, तलाव, विहिरी, हिमखंड याद्वारे आपण आपली पाण्याची गरज भागवू शकतो. पाणी वाफेच्या रूपात वर निघून जाते आणि तीच वाफ थंड होऊन पाण्याच्या रूपात म्हणजे पावसाच्या रूपाने बरसते. हे जलचक्र निरंतर चालू असते. समुद्र पाण्याचे प्रचंड भांडार आहे परंतु त्याचा आपण जसाच्या तसा उपयोग करू शकत नाही कारण ते अत्यंत खारट असते. त्यात खूप क्षार असतात.
स्वच्छतेसाठी, आंघोळीसाठी, सिंचनासाठी, कारखाने चालविण्यासाठी, विद्युतनिर्मितीसाठी आपण पाण्याचा उपयोग करतो. समुद्र, नद्यांचा उपयोग जलवाहतुकीसाठी करतो. सामान्यपणे दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे होणाऱ्या विनाशाला आपणास नेहमीच तोंड द्यावे लागते. आपल्या देशातील हजारो गावांत पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पाणी असले तर ते प्रदूषित असल्यामुळे पिण्यास योग्य नाही. शहरांतही पिण्याच्या पाण्याची टंचाईच आहे. म्हणून शहरांत नळाद्वारे थोडा वेळच पाणी सोडतात. उन्हाळ्यात तर स्थिती आणखी वाईट होते. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगिकीकरण यामुळे सगळीकडेच पाण्याचा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी पिण्याचे पाणी भरण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. रेकॉर्डमध्ये तर ७०% लोकसंख्येसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याचा उल्लेख आहे. परंतु हे सत्य हे आहे की फक्त ३०% पाणी उपलब्ध आहे. जे पाणी सहज उपलब्ध होते ते प्रदूषित आहे. त्यात विषारी रसायने मिसळलेली आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळून कित्येक पाणी योजना तयार केल्या परंतु त्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात आली नाही. योजनेचा बराचसा पैसा अधिकारी व मध्यस्थच खाऊन टाकतात. पाणीपुरवठा योजनांवर दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु इच्छित परिणाम साध्य होत नाही. विशेषज्ञांच्या मते पुढील पाच वर्षांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देशाला वीस हजार कोटी रुपयांची गरज आहे. राजस्थान, गुजरात, ओरिसा, उत्तर प्रदेश इ. भागांत दुष्काळ पडणे ही सामान्य गोष्ट आहे. पाऊस आवश्यकतेपेक्षा खूपच कमी पडतो किंवा पडतच नाही. परिणामी दरवर्षी दुष्काळ पडतो. शेती पिकत नाही, जनावरे मरतात, माणसे पाण्यासाठी तरसतात. शेवटी लोक गाव सोडून पाण्याच्या शोधात जनावरांसह अन्यत्र जातात.
पावसाचे पाणी साठवून ठेवणे आज अनिवार्य झाले आहे. त्याशिवाय पाण्याची समस्या सुटू शकणार नाही. जगांत जास्त पाऊस पडणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. तरीही येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. म्हणून आपण पावसाच्या पाण्याचा संचय केला पाहिजे. यासाठी प्राचीन काळातील माहीत असलेले उपाय फारच चांगले आहेत. पाण्याची स्थानिक आवश्यकता आणि उपलब्ध साधने यानुसार जलसंचयासाठी या पारंपरिक पद्धतीत थोड़ा फार फरक केला जाऊ शकतो. त्यासाठी लहान बांध, तलाव, विहिरी, बारव आदींची ठिकठिकाणी निर्मिती केली पाहिजे. पाणी वाहून वाया जाऊ नये म्हणून चेक डेमोची व्यवस्था झाली पाहिजे.
अशा प्रकारे पाणी भूगर्भात जाईल आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. मग विहिरी आटणार नाहीत. पाण्याची पातळी कमी होणार नाही. पावसाचे पाणी अडविण्यासाठी वृक्षारोपणही खूप उपयोगी सिद्ध होते. कारण पाण्याचा वेगवान प्रवाह त्यामुळे अडतो आणि पाणी जमिनीत मुरते. जमिनीची धूपही कमी होते. प्रयोगांनी हे सिद्ध झाले आहे की आपली परंपरागत Water Harvesting ची पद्धत खूप यशस्वी झाली आहे. तिचे पुनरुज्जीवन करून व्यापक स्तरावर त्याचा अवलंब केला पाहिजे. माणसाने निसर्गाचा आदर करून त्याच्याशी समजूतदारपणे वागले पाहिजे. नैसर्गिक साधनांचा समजूतदारपणे उपयोग करावा ही काळाची मागणी आहे. आपण पाण्याचा साठा त्याची निगा आणि वितरणाच्या पद्धतींना अधिक चांगले रूप दिले पाहिजे. हे काम व्यक्तिगत, सामूहिल आणि शासकीय पातळीवर केले गेले पाहिजे.
पुढे वाचा: