लोकमान्य टिळक पुण्यतिथी माहिती मराठी
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध उद्गार सर्वांनाच माहीत आहेत. १९१६मधली ही गोष्ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. सरकारविरोधी काहीही बोलले, लिहिले तर कडक शिक्षा होई, असा तो काळ होता. त्या काळात लोकमान्य टिळकांनी ही सिंहगर्जना केली. आपल्या या पुढार्यावर लोकांनी फार प्रेम केले आणि त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिली.
२६ जुलै १८५६ या दिवशी लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीला झाला. त्यांचे पाळण्यातले नाव केशव होते पण पुढे ‘बाळ’ हेच नाव रूढ झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वतीबाई.
टिळक लहानपणापासून अभ्यासात फार हुशार होते. त्यांची स्मरणशक्ती फार उत्तम होती. टिळकांची प्रकृती मात्र अतिशय अशक्त होती परंतु मॅट्रिक होऊन कॉलेजात गेल्यावर त्यांना या गोष्टीची शरम वाटली आणि त्यांनी व्यायाम करून आपले आरोग्य चांगले सुधारले.
टिळक बी. ए., एल. एल. बी. झाले पण सरकारी नोकरी करायची नाही, असे त्यांनी ठरवले होते. तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक या समविचारी मंडळींनी राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढायचे ठरवले. प्रथम न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा व नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन करून पुढे फर्ग्युसन कॉलेजही काढले.
आपले विचार लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ‘केसरी’ हे मराठी वर्तमानपत्र व ‘मराठा’ हे इंग्रजी वर्तमानपत्र चालू केले. केसरी म्हणजे सिंह. ‘जनतारूपी सिंह आता जागा झाला आहे, तेव्हा हे नोकरशाहीरूपी गोर्या हत्ती सावध हो’, असा इशारा देण्याचा हेतू केसरी या नावामागे होता.
लोकांत एकी निर्माण व्हावी म्हणून टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तसेच स्वातंत्र्याची इच्छा लोकांच्या मनात जागी व्हावी म्हणून १८९५ साली शिवजयंतीचा उत्सव सुरू केला.
स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण अशी चतुःसूत्री लोकमान्य टिळकांनी जनतेला दिली.
स्वराज्य म्हणजे लोकांनी स्वतः चालवलेले राज्य. स्वराज्य मिळायचे साधन म्हणून स्वदेशीच माल वापरायचा, परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा आणि आपला देश, आपला धर्म, आपली भाषा यांबद्दल अभिमान उत्पन्न होण्यासाठी राष्ट्रीय शाळांतून शिक्षण द्यायचे, अशी ही चतुःसूत्री होती.
लोकमान्यांच्या या कार्यामुळे चिरोल नावाच्या इंग्रजाने त्यांना ‘हिंदुस्थानच्या असंतोषाचे जनक’ असे म्हटले.
१८९७ साली केसरीतील एका लेखाच्या व कवितेच्या आधारे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. रँड व आयर्स्ट खून खटल्यात त्यांना गोवण्याचा प्रयत्न सरकारने केला परंतु तो यशस्वी झाला नाही.
इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना १८८५ साली झाली. सुरुवातीला संमेलने भरवणे, ठराव पास करणे हेच मुख्य काम काँग्रेसमध्ये होत असे. टिळकांनी काँग्रेसमधील या नेमस्त धोरणांना विरोध केला. टिळक काँग्रेसमध्ये जहालवादी गटाचे नेते म्हणून ओळखले जात. १९०७ साली सुरत काँग्रेस उधळल्यानंतर संध्याकाळी अरविंदबाबूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जहाल मतांच्या मंडळींच्या सभेत त्यांनी आपले विचार मांडले. काँग्रेसला नवी दिशा देण्याचे त्यांचे हे कार्य निश्चितच मोलाचे आहे.
१९०८ साली केसरीत आलेल्या दोन लेखांच्या आधारे त्यांच्यावर पुन्हा राजद्रोहाचा खटला भरला गेला व त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. यावेळी त्यांना मंडाले येथे पाठवण्यात आले.
लोकमान्य टिळक अतिशय विद्वान व उत्तम गणिती होते. राजकारणात पडलो नसतो तर आपणाला गणिताचे प्राध्यापक होऊन अध्यापन-संशोधन करायला आवडले असते, अशा अर्थाचे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत.
‘ओरायन’, ‘वेदांचा काळ’, ‘आर्यांचे मूळ वसतिस्थान’, ‘गीतारहस्य’ ही त्यांची पुस्तके विद्वानांनी नावाजली. तुरुंगात असताना टिळकांची प्रकृती खालावली पण हा काळ त्यांनी लेखनासाठी वापरला. ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ त्यांनी तुरुंगातच लिहिला.
१ ऑगस्ट १९२०ला टिळकांचे निधन झाले. दरवर्षी या दिवशी या प्रखर देशभक्त व लोकांच्या आवडत्या पुढार्याचे पुण्यस्मरण केले जाते. शाळांमधून वक्तृत्वस्पर्धा घेण्यात येतात. ठिकठिकाणी लोकमान्यांच्या पुतळ्यांना व प्रतिमेला हार घालून लोक त्यांना वंदन करतात.
पुढे वाचा:
- 1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती
- गुड फ्रायडे मराठी माहिती
- ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
- रमजान ईद माहिती मराठी
- बकरी ईद माहिती मराठी
- मोहरमची संपूर्ण माहिती
- पतेती सण माहिती मराठी
- गुरू नानक जयंती विषयी माहिती
- बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी
- भगवान महावीर जयंती माहिती
- दत्तजयंती माहिती मराठी
- धनत्रयोदशी माहिती मराठी
- नवरात्र – दसरा माहिती मराठी
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- बैल पोळा सणाची माहिती
- नारळी पौर्णिमा माहिती मराठी
- नागपंचमी माहिती मराठी
- गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी
- आषाढी एकादशी माहिती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती
- हनुमान जयंती माहिती
- गुढीपाडवा माहिती
- होळी सणाची माहिती
- दिवाळी सणाची माहिती
- रामनवमी माहिती मराठी