Set 1: लोकमान्य टिळक मराठी निबंध – Essay on Lokmanya Tilak in Marathi

बाळ गंगाधर टिळक हे टिळकांचे नाव. ते भारताचे फार मोठे पुढारी होते. त्यांचा जन्म इ. स. १८५६ मध्ये रत्नागिरी येथे झाला. लहानपणापासून ते अतिशय बुद्धिमान, चतुर व निर्भय होते.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे त्यांचे घोषवाक्य होते. लोकांनी त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिली. कारण त्यांनी आपले सारे आयुष्य देशाच्या व देशबांधवांच्या सेवेत घालविले. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जनतेत तीव्र असंतोष निर्माण केला. त्यांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वर्तमानपत्रे चालविली. राष्ट्रीय शिक्षणासाठी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा काढली. लोकजागृतीसाठी . ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ व ‘शिवजयंती’ हे उत्सव सुरू केले.

अनेक वेळा तुरूंगवास भोगूनही ते आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्यांनी मंडाले तुरुंगात ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. इ. स. १९२० मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूने भारताची अपार हानी झाली.

Set 2: लोकमान्य टिळक मराठी निबंध – Lokmanya Tilak Nibandh in Marathi

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.’ असे सरकारला सिंहाच्या गर्जनेने ठणकावून सांगणारी व्यक्ति म्हणजे लोकमान्य टिळक होय.

टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. पण त्यांचे खरे नाव केशव होते. त्यांना लहानपणी बाळ असे म्हणत. पुढेही त्यांचे हेच नाव पडले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई होते. बाळ लहानपणापासूनच हुशार व जिद्दी होते. ते नेहमी खरे बोलत असत. ते अभ्यासात व खेळातही हुशार होते. त्यांनी लोकजागृतीसाठी आणि ब्रिटीशांच्या जुलमी राज्यकारभाराबाबत लिहिण्यासाठी केसरी व मराठा नावाची वृत्तपत्रे सुरू केली.

लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती सारखे उत्सवही सुरू केले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. लोकांनी त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिली.

Set 3: लोकमान्य टिळक मराठी निबंध – Essay on Lokmanya Tilak in Marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी- जवळच्या चिखली गावात झाला. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते.
त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी ह्या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली कारण त्यांना भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण द्यायचे होते. त्यांनी केसरी आणि मराठा ह्या नावाची दोन वृत्तपत्रेही काढली.

ते समाजसुधारक, स्वातंत्र्ययोद्धे, राष्ट्रीय नेते होतेच पण त्याच जोडीला ते संस्कृत, इतिहास, हिंदुत्व, गणित आणि खगोलशास्त्र ह्या विषयातही तज्ञ होते. त्यांना लोकांनी मोठ्या प्रेमाने ‘लोकमान्य’ अशी पदवी दिली होती.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ह्या त्यांच्या घोषणेने अनेक भारतीयांना प्रेरित केले. लहानपणापासूनच ते सरळ स्वभावाचे आणि सत्यवादी होते, त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे.

इंग्रजांविरूद्ध लोकांना संघटित करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्याची प्रथा निर्माण केली. त्यांनी ‘ आर्यांचे मूळ स्थान कुठले?’ ह्या विषयावर ग्रंथ लिहिला. तसेच ‘गीतारहस्य’ हासुद्धा ग्रंथ लिहिला. सरकारने त्यांना ब्रम्हदेशातील मंडाले येथे तुरूंगात ठेवले होते परंतु टिळक अजिबात डगमगले नाहीत.

असे हे लोकमान्य १ ऑगस्ट, १९२० रोजी मृत्यु पावले.

Set 4: एक आदर्श नेता लोकमान्य टिळक मराठी निबंध – Essay on Lokmanya Tilak in Marathi

भारतीय जनतेने ज्याचे नेतृत्व मान्य करून ज्याला ‘लोकमान्य’ केले, तो आदर्श भारतीय नेता म्हणजे बाळ गंगाधर टिळक होत. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या या नेत्याकडे नेतृत्वाचे देदीप्यमान गुण होते. त्यामुळेच हा नेता निद्रिस्त भारतीय समाजाला जागृत करू शकला. कारण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय समाजाला गुलामगिरीची जाणीवही झाली नव्हती. अशा या मृतवत समाजात लोकमान्यांनी प्रथम स्वातंत्र्यभावनेचे स्फुल्लिंग चेतवले.

लोकमान्यांना गणित, संस्कृत, ज्योतिष, खगोल अशा विविध विषयांत रस होता. पण याहीपेक्षा पारतंत्र्याची जाणीव त्यांना अधिक अस्वस्थ करत असे. आपल्या देशातील सामान्य जनतेची संपूर्ण साथ आपणाला लाभल्याशिवाय आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीला यश लाभणार नाही, हे ओळखून लोकमान्यांनी चिपळूणकर, आगरकर या सहकाऱ्यांच्या साहाय्याने शाळाकॉलेजे काढली. तसेच ‘केसरी‘ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली.

या वृत्तपत्रांतून लेखन करताना परक्या इंग्रजी सत्तेबद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. लोकमान्यांनी आपल्या जीवनातील क्षणन् क्षण लोकानुनयासाठी व लोकजागृतीसाठी वेचला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!’ अशी नुसती घोषणा करून ते थांबले नाहीत, तर त्या स्वराज्यप्राप्तीसाठी त्यांनी मंडालेचा कारावासही भोगला.

लोकमान्यांनी राजकीय सुधारणांवर भर दिला, तरी त्यांना सामाजिक सुधारणा व औदयोगिक प्रगती यांचेही महत्त्व पटलेले होते. औदयोगिक सुधारणा साधण्यासाठी त्यांनी ‘पैसा फंड’ योजनेला उत्तेजन दिले. अस्पृश्यता तर त्यांना बिलकूल मान्य नव्हती. ते म्हणत, “माणूस एका विशिष्ट जमातीत जन्मला आहे म्हणूनच तो अस्पृश्य असू शकतो असे खुद्द परमेश्वर सांगू लागला, तर त्याला मी परमेश्वर मानणार नाही.” लोकमान्यांनी जे अलौकिक कार्य केले त्यामुळे अनेक लोकोत्तर क्रांतिकारकांना व देशभक्तांना स्फूर्ती मिळाली.

राजकारणाच्या धकाधकीतही लोकमान्यांच्या उत्तुंग प्रतिभेतून ‘वेदांचे प्राचीनत्व’, वेदांतील आर्यांचे मूळ स्थान’ आणि ‘गीतारहस्य’ असे तेजस्वी ग्रंथ निर्माण झाले.

Set 5: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठी निबंध – Essay on Lokmanya Tilak in Marathi

२३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव ह्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्या महान स्वातंत्र्यसेनानीचा जन्म झाला. जुलमी इंग्रजी सत्तेविरूद्ध बंड करून उठण्याची भावना त्यांनीच भारतीय लोकांच्या मनात जागवली. म्हणूनच त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी पदवी मिळाली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली होती.

टिळकांनी वकिलीचे शिक्षण घेतले परंतु त्या व्यवसायात न उतरता ते शिक्षकी पेशात गेले. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस उदयाला आल्यावर त्यांनी तिचे सदस्यत्व घेतले आणि संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. भारतातील सामाजिक आणि राजकीय स्थितीची त्यांना चांगली जाण होती. परंतु ते म्हणत की आधी स्वराज्य आले पाहिजे, सामाजिक सुधारणा आपण नंतर करूच.

लोकजागृतीसाठी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे काढली होती. त्या वृत्तपत्रांतून त्यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत नेणारे ते पहिले नेते होते म्हणूनच त्यांना ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ अशीही पदवी मिळाली. त्यांनी स्वदेशी शिक्षणाचा पुरस्कार केला आणि इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार घातला.

त्यासाठी न्यू इंग्लिश स्कुल ही शाळासुद्धा काढली. गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक नेते त्यांचे चांगले मित्र आणि चळवळीतील सहकारी होते परंतु आधी स्वराज्य की आधी सामाजिक सुधारणा ह्यावरून त्यांच्यात मतभेद झाले आणि ह्या दोघांच्या मैत्रीत खंड पडला. त्यांनी देशासाठी अनेकदा तुरूंगवास भोगला. लोकांना एकत्र आणण्याचे निमित्त म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव करण्याची प्रथा पाडली ती आजतागायत चालू आहे. बालविवाहाचा त्यांनी निषेध केला.

टिळकांपासून आपल्या सत्तेला धोका आहे हे ब्रिटिश सरकारने ओळखले होते आणि म्हणूनच त्यांना बरेचदा तुरूंगातही टाकले होते. १९०८ साली त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली आणि ब्रम्हदेशातील मंडाले येथे पाठवण्यात आले. तेथील तुरूंगात बसून टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. १९१४ साली मंडाले येथून त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा राजकारणात उडी घेतली. त्या काळात कॉन्ग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन पक्ष पडले होते. टिळक जहाल मतवादी होते परंतु त्यांनी मवाळांशी समेट घडवून आणला.

अशा ह्या थोर नेत्याचा मृत्यू १ ऑगस्ट, १९२० रोजी मुंबई येथील सरदारगृह ह्या ठिकाणी झाला. त्या सुमारास महात्मा गांधी ह्यांचा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय होत होता. जणू टिळकांनी आपल्या हातातील सुत्रेच गांधीजींच्या हाती दिली असे म्हणायला हरकत नाही.

लोकमान्य टिळक मराठी निबंध – Essay on Lokmanya Tilak in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply