माझ्या प्रिय गोष्टी मराठी निबंध – Mazya Priya Gosti Nibandh Marathi

प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची आवड निवड असते. माझ्या पण खास काही आवडी आहेत. माझी सर्वात आवडती गोष्ट आहे निसर्गाचे निरीक्षण करणे. निसर्ग खूप सुंदर, मनोरम आणि आश्चर्यजनक आहे. त्याच्या निरीक्षणामुळे खूप ज्ञान मिळते. जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी निसर्गाकडे लक्ष देऊन पाहतो. यात माझे मन खूप रमते. पक्ष्याना गाताना, उडताना, दाणे टिपताना, घरटे बनविताना पाहणे मला फार आवडते. रात्री तारे पाहणे, पावसात भिजणे, जंगली जनावरांना जंगलात पाहणे. नदी डोंगर, समुद्र, पहाणे माझे आवडते छंद आहेत.

पुस्तके वाचणेही मला आवडते. क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त सामान्यज्ञानाची पुस्तके, चरित्रे वाचणे आवडते. त्यांच्याकडून मला प्रेरणा, धैर्य मिळते. गोष्टीची पुस्तके, कादंबऱ्या मला वाचायला आवडतात. माझ्याजवळ निरनिराळया विषयांची किती तरी पुस्तके आहेत. ग्रंथालयातून पुस्तके, मासिके आणूनही मी वाचतो. मासिकातील हलके, फुलके लेख, कथा, विनोद, कविता मला छान वाटतात. कधी-कधी छोट्या सोप्या कविता माझ्या अभ्यासाचा विषय बनतात.

संगीत हा माझा आणखी एक आवडता विषय आहे. मी स्वतः गाऊ शकत नाही किंवा वाद्य वाजवू शकत नाही. तरी संगीतावर माझे प्रेम आहे. सिने संगीत, भजने, शास्त्रीय संगीत मी फार रस घेऊन ऐकतो. संगीत ऐकून मला शांती मिळते, मनाची एकाग्रता वाढते, आनंद मिळतो.

प्रवासास जाणे मला आवडते. नैनिताल, सिमला, मनाली येथे निसर्ग जवळून पाहण्याची संधी मिळाली. भारतातील बरीच मोठी शहरे मी पाहिली आहेत. पर्यटन ज्ञान प्राप्तीचे फार सुंदर साधन आहे. मी सारा भारत पाहू इच्छितो. प्रवासामुळे आपल्याला देशाची माहिती होते. वेगवेगळे लोक, त्यांचे रहाणीमान कळते.

आई-वडील, मित्र, मैत्रिणी यांच्याशी गप्पा मारणे मला आवडते. रिकाम्या वेळात आम्ही अनेक विषयांवर बोलतो. शाळेतील गमती, झाडे, पशु-पक्षी, सामान्यज्ञान हे हे आमच्या बोलण्याचे विषय असतात. आम्ही एकमेकांना नवीन नवीन माहिती देतो, प्रश्न विचारतो, कोडी विचारतो, विनोद ऐकवितो आणि हसणे-खिदळणे पण करतो. माझ्या एका मित्राला बागकामाचा छंद आहे तर दुसऱ्या एकाला पोस्टाची तिकिटे जमा करण्याचा. आम्ही त्याबद्दल गप्पा मारतो. मला वाचन, निसर्ग-निरीक्षण व पर्यटन हे सर्वच छंद पुढे जोपासायचे आहेत. परंतु मी त्यांचा परिणाम माझ्या अभ्यासावर होऊ देत नाही. या छंदांमुळे मी नेहमी आनंदी असतो. कंटाळा कधी येतच नाही.

पुढे वाचा:

Leave a Reply