रम्य संध्याकाळ मराठी निंबध – Ramya Saynkal Essay Marathi
मी गावी गेलो की रोज संध्याकाळी अंगणात बसते. संध्याकाळी गावात वातावरण खूप छान असते. संध्याकाळी गुरे गोठ्यांत परततात. पाखरे झाडांवर गोळा होतात. त्यांचा किलबिलाट चालू असतो. एक-एक शेतकरी घरी परततो. सूर्य पश्चिम क्षितिजावर पोहोचतो. मावळणारा सूर्य सौम्य दिसतो.
त्याचे बिंब नारिंगी असते. पश्चिमेकडे सोनेरी प्रकाश पसरतो. घरांची छपरे, झाडांची पाने, डोंगराचे शिखर सोनेरी दिसू लागते. शांत गार वारे वाहू लागतात. हे वातावरण मनाला प्रसन्न करते.
शहरातील पावसाळ्यातील सायंकाळ मला खूप आवडते. संध्याकाळी शाळेतून घरी आले की, मी आमच्या गॅलरीत बसते. आकाश ढगांनी व्यापलेले असते. पश्चिम क्षितिजाकडे जाणारा सूर्य मध्येच प्रकट होतो; मध्येच ढगाआड जातो.
सूर्याचे बिंब पिवळा, लाल, नारिंगी या रंगांनी भरून जाते. ढग रंगीबेरंगी दिसू लागतात. पश्चिम दिशा रंगांनी न्हाऊन निघते. गार वारे हळूहळू वेगाने वाहू लागतात. अशी ही रमणीय सायंकाळ संपूच नये असे वाटते.
एक निसर्गरम्य संध्याकाळ मराठी निबंध – Ek Nisargramya Sayankal Nibandh Marathi
मुंबईहून पुण्याकडे आम्ही परतत होतो. आमची गाडी खंडाळ्याचा अवघड घाट ऐटीत चढून आली आणि मग एकाएकी ती रुसून बसली. मेकॅनिक गाडीचा रुसवा काढत असताना जरा पाय मोकळे करावे, या विचाराने गाडीतले आम्ही सर्वजण बाहेर पडलो. भोवतालचा सारा परिसर अत्यंत रमणीय होता. निसर्ग त्या परिसरावर फिदा होता. भटकत भटकत आम्ही डोंगरावर गेलो.
सूर्य मावळतीकडे झुकला होता, पण मावळतीच्या डोंगराआड जाण्यापूर्वी त्या रविराजाने नीलांगणात विविध रंगांची नुसती उधळण केली होती. दिवसभराच्या श्रमाने तो सोन्याचा गोळा स्वत:ही लालबुंद झाला होता. मनात आले, भरदुपारी या सूर्यमहाशयांकडे नजरसुद्धा टाकवत नव्हती आणि आता मात्र आम्ही त्याला सहज न्याहाळू शकत होतो. सूर्याचे ते तेजस्वी बिंब अस्ताला जाण्यापूर्वी खूप मोठे आणि लालबुंदही झाले. ते पाहून शाळेत वाचलेल्या सुभाषिताची आठवण झाली-‘उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमाने तथा.’
पाहता पाहता सूर्य डोंगराआड गेला, पण त्याची प्रभा मात्र मागे रेंगाळत राहिली. त्या संधिप्रकाशात भोवतालच्या आसमंताला आगळे सौदर्य प्राप्त झाले होते. ओकेबोके डोंगरही सोनेरी वस्त्रे धारण केलेल्या सम्राटांसारखे भासत होते. दरीत गूढतेचा गहिरा रंग भरल्यासारखे वाटत होते. डोंगरावरची झाडेझुडपे या सांध्यतेजाने न्हाऊन निघाल्याने प्रसन्न दिसत होती. आकाशात पक्ष्यांच्या मालिका घरट्यांकडे परतत होत्या. झाडांचे ते सवंगडी आता झाडांना दिवसभराच्या गोष्टी ऐकवणार होते.
गाडी बिघडल्याने झालेला विरस केव्हाच मावळला होता. किंबहुना गाडी रुसून बसल्याने आम्हांला निसर्गातील सौंदर्याचा आगळा अनुभव घेता आला होता. इतक्यात गाडीचा रुसवा दूर झाल्याचे समजले. सुखावलेल्या मनाने गाडीत बसून आम्ही घराच्या दिशेने निघालो होतो.
संध्याकाळचा फेरफटका मराठी निंबध – Sandhyakal Cha Ferfatka Nibandh Marathi
संध्याकाळची वेळ किती रमणीय असते ना? सूर्य पश्चिमेला सागरात बुडी मारायला निघालेला असतो. आकाशात लाल, केशरी रंगांची उधळण झालेली असते. पोपट, चिमण्या आणि इतर अनेक पक्षी आपापल्या घरांकडे निघालेले असतात. वायाची थंडगार झुळुक येत असते. अशा हवेवर फिरायला किती छान वाटते ना?
आमच्या मुंबईत ही अशी संध्याकाळ हरवूनच गेली आहे. कारण दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन आम्ही मुले बसने घरी परत येईपर्यंत बाहेर अंधारच झालेला असतो. परंतु उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीच्या वेळेस मात्र हा संध्याकाळच्या फेरफटक्याचा आनंद मी भरपूर घेतो बरे का.
बहुदा सुट्टीत मी गावालाच जातो. आमच्या गावाचे नाव चौल आहे. तिथे दत्ताची एक छान टेकडी आहे. रोज संध्याकाळी आम्ही मुले फिरायला बाहेर पडतो तेव्हा आपोआपच आमचे पाय दत्ताच्या टेकडीकडे वळतात. टेकडीवर चढायचे म्हणजे सोप्पे काम नाही. परंतु आम्ही लहान मुले टणाटण उड्या मारत चढतो. जाताना वाटेत करवंदाच्या जाळ्या लागतात.
तिथली करवंदे वेचून खाणे हा आमचा आवडता उद्योग असतो. टेकडीच्या शिखरावर गेले की तिथे एक दत्तमंदिर आहे. मंदिरातल्या थंडगार फरशीवर पाय ठेवला तरी खूप छान वाटते. दत्ताला नमस्कार करून आम्ही मंदिराबाहेर येतो तेव्हा उंचावरून सगळा गाव केवढा सुंदर दिसतो म्हणून सांगू? सगळीकडे हिरव्यागार वाड्या दिसतात, त्यातच झुलणारे माड आणि पोफळी दिसतात. चौलचा समुद्रकिनारा आणि त्यावरले सुरूचे बनही टेकडीवरून दिसते. जरा वेळाने अंधार पडू लागला की आमचा संध्याकाळचा फेरफटका आम्हाला आवरता घ्यावा लागतो.
कधीकधी आम्ही समुद्रावरही फिरायला जातो. ओल्या वाळूत फिरणे, सायकल चालवणे, चेंडूने खेळणे हे उद्योग आम्ही तेव्हा करतो. त्याशिवाय सुरूच्या बनात जाऊन ‘खांब खांब खांबोली’ हा खेळसुद्धा खेळतो.
समुद्रामध्ये सूर्य बुडाला की मात्र थोड्याच वेळात अंधार दाटू लागतो. तेव्हा माझ्या मनाला कसलीतरी हुरहुरच लागते. अंधाराच्या लाटा धावून येत आहेत असे वाटण्यापूर्वीच आम्ही तिथून निघतो.
असा होतो आमचा संध्याकाळचा फेरफटका.
पुढे वाचा:
- संत ज्ञानेश्वर मराठी निबंध
- संगणक शाप की वरदान मराठी निबंध
- संगणक वर मराठी निबंध
- श्रावणातील गमती जमती निबंध मराठी
- शेतातील कणीस बोलू लागले तेव्हा मराठी निबंध
- शेत मळ्याला भेट मराठी निबंध
- शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध
- शेकरू प्राणी निबंध मराठी
- शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी
- शिष्टाचार मराठी निबंध
- शिंपी मराठी निबंध
- आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी
- शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध