वर्तमानपत्राचे महत्व मराठी निबंध – Importance Of Newspaper Essay in Marathi

सकाळचे वृत्तपत्र हे आमच्या घरी रोज वादाला कारण होते. कारण बाबा, ताई आणि मी अशा आम्हा तिघांनाही वृत्तपत्र वाचण्याची अति उत्सुकता असते. वर्तमानपत्राचे महत्त्व आज सुशिक्षित समाजात मान्य झालेले आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकीच दैनिक वृत्तपत्रे ही आता आवश्यक होऊन बसली आहेत. जर एखादया सुशिक्षित माणसाला एकांतवासात ठेवले, तर तो म्हणेल,”बाकी काही नको, पण रोजची दैनिके तरी माझ्याकडे पाठवा.”

कुतूहल हे मानवी स्वभावाचे एक खास वैशिष्ट्य आहे. या जिज्ञासेपोटीच वर्तमानपत्राचा जन्म झाला. ‘युद्ध्यस्य वार्ता रम्या’ असे म्हणतात. पण वर्तमानपत्रातील कोणत्याही बातम्या या वाचताना ‘रम्य’च भासतात. वर्तमानपत्र आपल्याला स्थानिक बातम्या तर देतेच, पण ते आपल्याला साऱ्या विश्वाच्या बातम्याही देते.

आज ‘बातम्या पुरवणे’ एवढेच वृत्तपत्रांचे काम राहिलेले नाही. तर समाजमन घडवण्याचे कार्यही वृत्तपत्रे करत असतात. आपल्या देशाचा गेल्या दीडशे-दोनशे वर्षांचा इतिहास पाहिला, तर या छोट्या वृत्तपत्रांनी केवढी मोठी कामगिरी केली आहे, ते लक्षात येईल. बर्फाच्या गोळ्याप्रमाणे थंडगार पडलेल्या समाजाला गुलामगिरीतून जागे करण्यासाठी लोकमान्यांना ‘केसरी’, ‘मराठा’ ही दैनिके काढावी लागली.

समाजातील दोष दाखवून समाजाची सुधारणा करण्यासाठी आगरकरांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. ‘संदेश’, ‘लोकमान्य’, ‘काळ’, नवाकाळ‘ अशा कित्येक वर्तमानपत्रांनी हा लोकजागृतीचा वसा कायम ठेवला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी व त्यासाठी घडलेले महाभारत, यांमध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक ‘मराठा’ या वृत्तपत्राचा सिंहाचा वाटा होता, हे सर्वांनाच ठाऊक आहे. .

आजही वृत्तपत्रे लोकजागृतीचे काम करत असतात. त्यामुळे आणीबाणीत जेव्हा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आली, तेव्हा त्यांचे स्वत्वच हरवल्यासारखे झाले होते. समाजातील तत्कालीन ज्वलंत प्रश्न वृत्तपत्रात अग्रलेखांतून वा इतर सदरांतून अवतरतात आणि त्यावरील वाचकांच्या प्रतिक्रिया व जनमानसाचे दर्शन वाचकांच्या पत्रांतून घडते.

सर्वसामान्य माणसाच्या जीवनात वर्तमानपत्राला फार महत्त्व आहे. ‘नोकरी पाहिजे’ पासून ‘नवरी पाहिजे’ पर्यंतच्या सर्व वार्ता वर्तमानपत्र त्याला देते. भाजीपाला, सोनेनाणे यांचे भाव घरबसल्या वर्तमानपत्र सांगते. वर्तमानपत्र नसेल तर ‘हरवलेल्यांची हकीकत’ कशी कळेल? वर्तमानपत्र नसेल तर नवीन चित्रपट, नाटके आणि पुस्तके यांची ओळख कशी होईल?

तेव्हा आजच्या या युगात वर्तमानपत्र हवे, हवे आणि हवेच !

वर्तमानपत्राचे महत्व मराठी निबंध – Importance Of Newspaper Essay In Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply