वन्यपशू आणि आम्ही मानव

‘नेमेचि येतो मग पावसाळा‘ या नियमानुसार आमच्या देशात ‘नेमेचि येतो वन्यपशू सप्ताह’ मग त्या सप्ताहाच्या मागेपुढे या वन्यपशुंची चित्रे सर्वत्र झळकतात. नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांतून या वन्यपशृंविषयींच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. पण हे सारे चालते फक्त एक आठवडाभर. वन्यपशू सप्ताह संपतो आणि माणूस आपले व या वनचरांचे मित्रत्वाचे नाते पार विसरतो. मग माणसांत उरतो फक्त पशू !

खरोखर मानवप्राणी हा आपल्यातील हे प्राणित्व विसरायला तयार नसतो. त्यामुळे अनेकदा आपल्या रानटी, क्रूर आचरणाने तो हिंस्र श्वापदांनाही लाजवील असे वागतो. माणसाच्या या अविवेकी वागण्याने माणूस आपले किती नुकसान करून घेतो! एकेकाळी भारताच्या जंगलात हजारोंनी आढळणारे अतिशय सुंदर चित्ते आज पूर्णपणे नाहीसे झाले आहेत. जगातील या वन्यपशुधनांपैकी जवळजवळ १२० जाती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि या दुर्दशेला मोठ्या प्रमाणावर माणूसच जबाबदार आहे.

माणूस या जंगली वैभवाच्या मागे हात धुवून का लागला आहे? भीतीपोटी? नाही. मुळीच नाही. मध्यंतरी एका पाहणीत असे सिद्ध झाले की, माणूस केवळ चैनीसाठी या वन्यपशुंचा बळी घेतो. केवळ पूर्व आफ्रिकेत दरवर्षी पन्नास हजार बिबळ्यांची कातडी कमावली जाते. का? कशासाठी? तर स्त्रियांना म्हणे बिबळ्याच्या कातडीचा कोट फार आवडतो.

हातातील सुंदर पर्सेस बनवण्यासाठी साप, नाग यांना मारले जाते. तर गृहसजावटीसाठी वाघसिंहांची हत्या केली जाते. फरची ऐटदार टोपी बनवण्यासाठी प्राण्यांच्या कित्येक कोवळ्या पिल्लांना जन्म होण्यापूर्वीच मारले जाते. खरोखर जंगलात मुक्तपणे संचार करणारे हे वन्यपशू म्हणत असतील, “किती हा क्रूर माणूस !”

वन्यपशू आणि आम्ही मानव

पुढे वाचा:

Leave a Reply