लाल किल्ला निबंध मराठी – Marathi Essay on Red Fort

लाल किल्ला ही दिल्लीची शान आहे. मोगल सम्राटांनी दिल्लीवर ४०० वर्षे राज्य केले. ह्या काळात कलाकौशल्यांमध्ये खूप वाढ झाली. दिल्ली आणि आग्रा येथे मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या कारण त्या मोगल साम्राज्याच्या राजधान्या होत्या. दिल्ली येथील लाल किल्ला त्या इमारतींपैकी एक आहे.

जगप्रसिद्ध, ऐतिहासिक स्मारक म्हणून गणला जाणारा हा किल्ला यमुना नदीच्या पश्चिम काठावर मोठ्या दिमाखात उभा आहे. इ.स १६४८ मध्ये शहाजहानने ह्याची निर्मिती केली.

हा किल्ला संपूर्ण लाल दगडात बांधून काढला गेला आहे आणि सुरक्षिततेसाठी त्याच्या भोवताली खंदक बांधण्यात आले आहेत. लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मीना बाजार लागतो. तिथे अगदी आजही आपल्याला कलाकुसरीच्या वस्तू मिळतील. शिवाय लाल किल्ल्याच्या आत पुष्कळ भव्य इमारती आहेत. सुंदर सुंदर बागा आणि कारंजी आहेत. कित्येक लोक आणि मुख्यत्वेकरून विदेशी पर्यटक इथे भेट द्यायला येत असतात.

दिवाण-ए- आम आणि दिवाण-ए-खास ह्या दोन्हींसमोर मोठमोठी मैदाने आहेत. दिवाण-ए-आम हा सर्वसामान्य जनतेसाठी होता ते त्याची भव्यता पाहून लक्षात येते. तिथेच ते जगप्रसिद्ध मयुर सिंहासन होते. ते नंतर इराणच्या नादीरशहाने लुटून नेले. सम्राटाचा खास दरबार इथेच भरत असे. इथल्या छतावर सुंदर नक्षीकाम आहे. इस्लाममध्ये मानवी शिल्पे चालत नाहीत म्हणून फुलापानांची नक्षी ही इस्लामची मुख्य खूण आहे. इथे असलेल्या जनानखान्यात राण्यांची वस्ती होती. तिथे वाहात्या पाण्याची सुंदर सोय केली होती. एके काळी इथल्या भिंतीही रत्नजडित होत्या. इथल्या शाह बूर्ज आणि वास्तुसंग्रहालयात शेवटचा मोगल सम्राट बहादुरशहा जफर आणि त्याच्या राणीची शाही वस्त्रे, तसेच प्राचीन काळातील अनेक वस्तू नाणी, शिलालेख, हत्यारे, चिलखते आदी आहेत.

लाल किल्ला हे आपल्या देशाच्या गौरवाचे प्रतिक आहे. ह्याच किल्ल्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता. ह्याच किल्ल्यात त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांवर खटले चालवले होते आणि त्यांचा छळ केला होता. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे १५ ऑगस्ट, १९४७ ह्या दिवसापासून तिथे आपला तिरंगा ध्वज फडकू लागला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पहिले भाषण आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी त्याच किल्ल्यावरून केले होते. आजतागायत आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरूनच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा लोकांना देत असतात.

असा हा लाल किल्ला आपल्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतिक आहे

लाल किल्ला वर मराठी निबंध – Essay On Red Fort In Marathi

मोगल सम्राटांनी भारतावर ४०० वर्षे एकछत्री राज्य केले. सम्राट अकबरापासून जहांगीरपर्यंतच्या सम्राटांनी आपले साम्राज्य समृद्ध केले. या काळात कलाकौशल्यांत खूप वाढ झाली. दिल्ली, आग्रा येथे भव्य इमारतींची उभारणी झाली. आग्रा येथील ताजमहाल आणि दिल्लीचा लाल किल्ला ही जगप्रसिद्ध, ऐतिहासिक स्मारके आहेत.

दिल्लीचा लाल किल्ला यमुना नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे. इ. स. १६४८ मध्ये शहाजहानने याची निर्मिती केली. हा किल्ला संपूर्णपणे लाल दगडांत बांधण्यात आला असल्यामुळेच याला लाल किल्ला म्हणतात. सुरक्षिततेसाठी किल्ल्याच्या चारी बाजूस खंदक खोदले आहेत.

लाल किल्ल्याच्या मुख्यप्रवेशद्वारातून आत शिरल्याबरोबर मीना बाजार लागतो. तिथे आजही कलाकुसरीच्या वस्तू मिळतात. लाल किल्ल्यात अनेक भव्य इमारती आहेत. उदाहरणार्थ, दिवाने आम, दिवाने खास. दोन्हीच्या समोर विस्तृत मैदाने आहेत. सम्राटाचा दिवाने आममधील दरबार प्रजेसाठी भरत असे. दिवाने खासची भव्यता पाहिल्याबरोबर लक्षात येते. यातच अमूल्य मयूर सिंहासन होते. ते नंतर इराणच्या नादिरशहाने लुटून नेले. सम्राटाचा विशेष दरबार इथेच भरत असे. छतावर सुंदर नक्षीकाम केलेले होते. इथे असलेल्या रंगमहालात सम्राट राण्यासह राहत असे. याच्या छतावरही नक्षीकाम केलेले होत. वाहत्या पाण्याची सुंदर व्यवस्था इथे केली होती. शुभ्र संगमरवराच्या बनलेल्या या रंगमहालाच्या भिंती मोगलकाळात रत्नजडित होत्या. औरंगजेबाने उभारलेली मोती मशीद पण प्रेक्षणीय आहे. इथेच तो जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा होता, जो आज ब्रिटनच्या राणीच्या राजमुकुटाची शोभा वाढवीत आहे.

येथील संग्रहालयात अंतिम मोगल सम्राट बहादुरशहा जफर आणि त्याच्या राणीची शाही वस्त्रे आहेत. येथे असलेल्या प्राचीन काळातील अनेक वस्तू, नाणी, शिलालेख तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकतात. आजही लाल किल्ला आमच्या राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक आहे. याच किल्ल्यात इंग्रजांनी स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध खटले चालविले होते. त्यांचा छळ केला होता. आज आपला तिरंगा किल्ल्यावर डौलाने फडकतो. लाल किल्ला आमच्या गौरवाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.

लाल किल्ला निबंध मराठी – Marathi Essay on Red Fort

पुढे वाचा:

Leave a Reply