लहान मुलांनी काम करावे काय?

लहान मुलांनी शिकले पाहिजे, खेळले बागडले पाहिजे. जीवनात एकदाच येणारे बालपण हिसकावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. लहान मुलांना कामाला जुंपणे ह्यासारखे दुसरे मोठे दुष्कर्म नाही. ज्या वयात त्यांनी खेळावे, बागडावे,शाळेत जाऊन शिकावे त्या वयात त्यांना काम करायला लावायचे, त्यांचे बाळपण करपून टाकायचे ह्यापेक्षा दुसरा मोठा अपराध नाही.

आपल्या भारतात त्याचे भयंकर स्वरूप पाहावयास मिळते. गरीब, मागासलेल्या आणि शोषित वर्गातील मुलांना कुठलीही सामाजिक सुरक्षितता लाभत नाही. त्यांचे आईवडील त्यांना शिक्षण देण्यासाठी एवढेच नव्हे तर मोकळेपणाने खेळू देण्यासाठीही आर्थिकदृष्ट्या समर्थ नसतात. नाईलाजाने त्यांना गिरणीत, कारखान्यात, लोकांच्या घरी, शेतावर किंवा दुकानात काम करावे लागते. काम करण्याची काही ठिकाणे वाईट स्थितीत असतातच त्याशिवाय ती धोकादायकही असतात. विड्या, लोखंड, कापूस, गालिचे, आगपेट्या, फटाके इत्यादींच्या कारखान्यात ह्या बालमजुरांना कामाला लावले जाते. बांधकामावरही त्यांना गवंड्याच्या हाताखाली काम करावे लागते. घरगडी म्हणूनही कित्येक मुले काम करतात.

बालपणात कष्टाची कामे करावी लागल्यामुळे ह्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर वाईट परिणाम होतो. १४ वर्षांखालील मुलांना ‘बाल’ समजले जाते. खरे तर राज्यघटनेने सर्वच मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. लहान मुले ही आपल्या देशाची भावी संपत्ती आहे. म्हणून त्यांना योग्य पालनपोषण मिळाले पाहिजे, सामाजिक सुरक्षितता आणि चांगले जीवन मिळाले पाहिजे. सरकार, नेते, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, शिक्षक इत्यादी सर्वांनी एकत्र येऊन बालमजुरी विरूद्ध मोठी चळवळ उभारली पाहिजे. गरीबी, कुटुंबनियोजनाचा अभाव, अशिक्षितपणा आणि मागासलेपणा ही ह्या समस्येची मुख्य कारणे आहेत. जोपर्यंत ह्या कारणांच्या मुळांवर आपण घाव घालीत नाही तोवर बालमजुरीची समस्या सुटणार नाही.

आज बालमजुरी हा कायद्याने गुन्हा मानला गेला आहे. ‘ आमच्या आस्थापनात बालमजूर काम करीत नाहीत,’ असे जाहीर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर ह्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समजले तर कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बालमजुरी रोखण्यासाठी आज सरकारच्या बरोबरीने अनेक सेवाभावी संस्थाही ह्या क्षेत्रात काम करीत आहेत. परंतु बालमजुरी खरोखरच कमी व्हायला हवी असेल तर गरीबी कमी व्हायला हवी. सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, ते आपण केले आहेच. रोजगाराच्या संधी वाढवणे, देशाचे वेगाने औद्योगीकरण करणे इत्यादी गोष्टी केल्याने आपण ही बालमजुरीची समस्या नक्कीच संपुष्टात आणू शकू ह्यात काहीच संशय नाही.

Learn Good Habits & Manners in Marathi – चांगल्या सवयी

पुढे वाचा:

Leave a Reply