लेखकाची जबाबदारी मराठी निबंध
लेखक आपल्या लेखणीनं साहित्य निर्माण करतो कारण त्याला प्रतिभेची देणगी मिळालेली असते. प्रतिभेमुळेच त्याला विवेक, संवेदना आणि बुद्धी ह्या तिन्ही गोष्टी प्राप्त होतात.
लेखक ज्या काळात जन्म घेतो, ज्या देशात जन्म घेतो, ज्या समाजात राहातो त्या सर्वांचं प्रतिबिंब त्याच्या लेखनात पडतं. कुठलाही लेखक पूर्णपणे काल्पनिक लिहू शकत नाही. लहानपणापासून त्याला जे स्वतःला अनुभव येतात किंवा तो इतरांच्या जीवनात आलेल्या अनुभवांतून त्याला जे काही ज्ञात होते, त्यातून त्याच्या मनात लेखनाची उर्मी निर्माण होते. एखाद्या प्रसंगामुळे किंवा विचारामुळे त्याच्या मनात लेखनाचं बीज निर्माण होते. परंतु लेखन म्हणजे काही एखादा खरा घडलेला प्रसंग तसाच्या तसा सांगणं नसतं. त्या बीजाची चांगली मशागत करून, त्यावर आपल्या कल्पनेचा साज चढवून वैयक्तिक अनुभवाला सार्वत्रिक अनुभवाच्या पातळीवर नेण्यातच ख-या लेखकाचे कसब आणि यश असते.
साहित्य म्हणजे लेखकाच्या विचारांची अभिव्यक्ती असते. आपले जीवन आणि आपला समाज ह्यांचा आरसाच जणू काही वाङ्मयातून वाचकांना दिसतो. ह. ना आपटे ह्यांनी ‘पण लक्षात कोण घेतो? ह्या कादंबरीतून त्या काळातील विधवांच्या दुःखाला वाचा फोडली. विभावरी शिरूरकरांनी ‘कळ्यांचे निःश्वास” लिहून दुस-या महायुद्धानंतरच्या भारतीय स्त्रीचे वास्तव समाजापुढे मांडले. चिं. वि. जोशींनी त्याच काळातील मध्यमवर्गीय मराठी जीवनावर नर्म विनोदी कथा लिहिल्या. त्यांची खुमारी आजही तेवढीच आहे. वि. स खांडेकर, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे इत्यादी लेखकांचं लेखन आजही आपल्याला तेवढेच ताजेतवाने वाटते.
हल्लीचा काळ सामाजिक उत्थापनाचा आहे. त्यामुळे नव्याने शिकू लागलेल्या पददलित आणि गावकुसावरील समाजातील लेखक आता लिहिते झाले आहेत. त्यांच्या व्यथा, त्यांची दुःखं आता ते लेखनातून व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळं एकुणच सामाजिक घुसळण सुरू झाली आहे. नामदेव ढसाळ, दया पवार, उर्मिला पवार, प्रज्ञा पवार आदी बरेच लेखक ह्या दलित साहित्याच्या चळवळीने पुढे आणले आहेत.
लेखक ह्या समाजातच राहातो. समाजातील सुखदुःखांचा आणि तेथील समस्यांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे त्या समाजाचे उन्नयन व्हावे ह्या दृष्टीने त्याचे लेखन असले पाहिजे. समाजात दुही पेरली जाईल, समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये परस्परांबद्दल संशयाचे विष पेरले जाईल असे लेखन त्याने करता कामा नये. एक जबाबदार लेखक म्हणून त्याची जबाबदारी आहेच त्याबद्दल काहीच शंका नाही.
पुढे वाचा:
- लाल किल्ला निबंध मराठी
- लहान मुलांनी काम करावे काय
- मराठी कथा लेखन लबाड कोल्हा
- रेल्वे स्टेशनचे दृश्य मराठी निबंध
- रेडिओ मराठी निबंध
- रुपयाची आत्मकथा मराठी निबंध
- रिक्षावाला निबंध मराठी
- राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी
- राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध
- रात्र रागावली तर निबंध मराठी
- राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
- राजभाषा मराठी निबंध
- रस्त्यावरील भटक्या कुत्र्याची कैफियत
- रवींद्रनाथ टागोर निबंध मराठी