वक्तृत्व कला निबंध मराठी – Vaktrutva Kala Nibandh Marathi

शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषु च पण्डितः, ‘वक्ता दशसहस्तेषु, दाता भवति वा न वा’ संस्कृतमध्ये म्हटले आहे की शंभरात एखादा माणूस शूरवीर निपजतो, हजारातील एखादा माणूस हुशार निपजतो, दहा हजारातील एखादा माणूस उत्तम वक्ता निपजतो आणि दानशूर माणूस निपजणे तर फारच अवघड आहे.

ह्याचाच अर्थ असा की चांगले वक्तृत्व करणारी माणसे फार दुर्मिळ असतात. चांगले वक्तृत्व अंगी असण्यासाठी बरेच गुण लागतात. सर्वात पहिले म्हणजे आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, त्या विषयाचा चांगला अभ्यास असावा लागतो. त्यानंतर सभेत सर्वांसमोर, सगळ्यांचे डोळे आपल्यावरच खिळलेले असताना बोलायचे ह्यासाठी धैर्य आणि सभाधीटपणा लागतो. आपली वाणी आणि शब्दोच्चार स्वच्छ हवेत, बोलण्यात मुद्देसूदपणा आणि नेमकेपणा हवा, आपण जे बोलतो आहोत ते श्रोत्यांना पटवून देण्याची ताकद हवी, मधूनमधून विनोदाची पखरण हवी, हजरजबाबीपणा तर हवाच हवा. हा सगळ्या गोष्टी ज्याच्या ठायी असतात असा वक्ता श्रोत्यांना खूपच आवडतो.ते त्याला अक्षरशः डोक्यावर घेतात. आचार्य अत्रे तसे होते.

जुन्या काळी जेव्हा रेडिओ, टीव्ही, चित्रपट इत्यादी माध्यमेच नव्हती तेव्हा वक्त्याचे भाषण प्रत्यक्ष जाऊन ऐकणे ह्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. अशा वेळेस राजकारणातील थोर थोर नेत्यांची भाषणे ऐकायला जनता गर्दी करीत असे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा नेत्यांची भाषणे ऐकायला लाखोंनी लोक येत असत. स्वातंत्र्यानंतरही पंडित नेहरूंची भाषणे ऐकायला अमापगर्दी लोटत असे.

आजही वसंत व्याख्यानमाला, मॅजेस्टिक गप्पा, पार्ले कट्टासारखे , वेगवेगळे कट्टे अशा ठिकाणी अनेक दिग्गज लोकांना भाषण देण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळते.

वक्तृत्व कला काही काही व्यवसायांसाठी अत्यंत आवश्यक आहे. वस्तूंची विक्री करणारा सेल्समन, नाटकासिनेमात काम करणारे कलाकार, कोर्टात युक्तिवाद करणारे वकील, शाळा कॉलेजात शिकवणारे शिक्षक आणि प्राध्यापक, रेडियो जॉकी, क्रिकेट समालोचक, डबिंग करणारे कलाकार, टीव्हीवरील संवादक, मुलाखतकार, लोकसभेत आणि राज्यसभेत बोलणारे आमदार आणि खासदार ह्या सर्वांनाच वक्तृत्वकला आलीच पाहिजे असे असते.

वक्तृत्वकला मुळात अंगी असली तरी तिला अभ्यासाने आणि सरावाने पैलू पाडावे लागतात. श्वास कुठे घ्यावा आणि कुठे सोडावा, शब्दोच्चाराची लय कशी असावी ह्याचेही शास्त्र असते. ह्या शास्त्राला ‘ व्हॉईस कल्चर’ असे नाव आहे. नाटयशिक्षणाच्या अभ्यास करताना ते शिकवले जाते आणि एरवीही त्याचे वेगळे अभ्यासक्रम शिकतायेतात.

थोडक्यात काय तर जिथे जिथे माणसांशी संबंध येतो अशा ठिकाणी वक्तृत्वकला लागते. म्हणजेच वक्तृत्वकला ही तुम्हाला घरीदारी सगळीकडेच लागते असे म्हणायला हरकत नाही.

वक्तृत्व कला निबंध मराठी – Vaktrutva Kala Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply