१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माहिती मराठी – Independence day Information in Marathi

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचे पारतंत्र्य संपले आणि भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी सोसलेल्या हाल-अपेष्टांचे, केलेल्या बलिदानांचे सार्थक झाले.

व्यापारी म्हणून हिंदुस्थानात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू सारा राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला आणि हिंदुस्थान हा इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटातला तेजस्वी हिरा बनला.

indian flag

१८५७ साली नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बादशहा बहादुरशहा जफर इत्यादींनी इंग्रजांविरुद्ध देशव्यापी उठाव करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. हा इंग्रजांविरुद्धचा पहिला मोठा लढा.

राणीच्या जाहीरनाम्यानंतर भारतातील ब्रिटिश राजवटीला अधिकृतपणे सुरुवात झाली. तोपर्यंत कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती होता.

इंग्रजी राजवटीत हिंदुस्थानातल्या उद्योगधंद्यांना उत्तेजन नव्हते. उलट इथला उत्तम कच्चा माल आपल्याला मिळावा, इथले व्यवसाय बंद पडून इथल्या लोकांनी इंग्लंडमध्ये बनलेला माल वापरावा व तेथील व्यापाराला उत्तेजन मिळावे, अशी सरकारची योजना होती. याविरुद्ध हळूहळू जागृती होत होती. समाजाला ब्रिटिशांच्या कुटिल कारस्थानाची जाणीव करून देण्याचे कार्य आर्य समाज, सार्वजनिक सभा इत्यादी संस्था करू लागल्या होत्या. यानंतर १८८५ साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली.

काँग्रेसच्या सुरुवातीला सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा इत्यादी नेते मंडळी नेमस्त विचारसरणीची होती. सनदशीर मार्गाने, अर्ज-विनंत्यांनी ब्रिटिशांकडून आपले हक्क मिळवावे, अशी त्यांची कल्पना होती. न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले हेही याच विचारसरणीचे होते.

त्याचवेळी सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळेल असे मानणारे वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू यांच्यासारखे क्रांतिकारक जिवावर उदार होऊन इंग्रज सत्तेला आव्हान देत होते. त्यांच्या स्फूर्ती-प्रेरणेनेच महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर, बंगालमध्ये अरविंद घोष अशी क्रांतिकारकांची मालिकाही निर्माण होत होती.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे शेकडो क्रांतिकारक फासावर चढले. अनेकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा घाट घातला असता, वंग-भंगाविरुद्ध जोरदार चळवळ सुरू झाली. हळूहळू नेमस्त विचारधारा सोडून काँग्रेसही जहाल विचारांकडे सरकू लागली. याला प्रामुख्याने लोकमान्य टिळक कारणीभूत होते.

१९०६ साली कलकत्ता काँग्रेसमध्ये स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य अशी चतुःसूत्री टिळकांच्या सांगण्यावरून काँग्रेसने संमत केली. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. पुढच्याच वर्षी म्हणजे १९०७ साली नेमस्तांचा विरोध असतानाही बाबू अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली या जहाल मार्गावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसचे नेतृत्व आता लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल या ‘लाल-बाल-पाल’ त्रयीकडे होते.

लोकमान्य टिळक, आगरकरांसारख्या पुढार्‍यांनी जनतेत देशप्रेम जागृत होण्यासाठी राष्ट्रीय शाळा काढल्या. केसरी व मराठा या आपल्या वर्तमानपत्रांतून लोकमान्य टिळक सरकारला जाब विचारू लागले.

बहिष्कार, परदेशी मालांच्या होळ्या, बाँम्बस्फोट, धरपकड अशा प्रक्षुब्ध वातावरणात १९०८ साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना ६ वर्षांसाठी मंडाले येथे काळ्या पाण्यावर पाठवण्यात आले.

लंडन येथे अटक करून बॅरिस्टर सावरकरांना भारतात आणण्यात आले. १९१० मध्ये त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यात त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली. असे दमनयंत्र चालू असले तरी जनतेतील स्वातंत्र्याची उर्मी मावळली नव्हती. सुटकेनंतर टिळकांनी अ‍ॅनी बेझंटबाईंबरोबर होमरूल लीग चळवळ चालवली.

१९२० साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती आली. महात्मा गांधींनी असहकार, सत्याग्रह व निःशस्त्र प्रतिकार या नव्या मार्गांनी आंदोलन पुढे चालवले.

१९२३ साली स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. त्यात पंडित मोतीलाल नेहरू, न. चिं. केळकर असे नेते होते. मोतीलालजींप्रमाणेच त्यांचे चिरंजीव जवाहरलाल हेही स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते. १९२९ साली त्यांच्याच अध्यक्षतेखाली लाहोर येथील अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला.

१९३० साली महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाच्या सत्याग्रहाने सरकारविरोधी भावना पुन्हा प्रज्वलित केली.

१९३९ साली दुसरे महायुद्ध चालू झाले. प्रारंभी युद्धसहकार्य करूनही भारतीयांच्या स्वातंत्र्यविषयक इच्छेला सरकार मान देत नाही, हे पाहून १९४२ साली गांधीजींनी ‘चले जाव’ची घोषणा करून लढा अधिक तीव्र केला.

१९४५ साली महायुद्ध संपण्याच्या आधी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली. जपानच्या सहकार्याने या सेनेने भारताच्या पूर्व सीमेवर मोठी मजल मारली होती.

सैन्याच्या स्वामिनिष्ठेची शाश्वती नाही याची आणखी एक चुणूक १९४५ साली मुंबई बंदरात झालेल्या नाविकांच्या बंडाने ब्रिटिशांना आली.

अशा अनेक कारणांमुळे महायुद्ध संपताच इंग्लंडमध्ये निवडून आलेल्या नवीन सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले.

मात्र हिंदुस्थानाला जे स्वातंत्र्य मिळाले ते अखंड स्वरूपात मिळाले नाही. देशाचे दोन भाग झाले. भारता बरोबरच पूर्व व पश्चिम अशा दोन भागांत पाकिस्तान निर्माण झाले.

चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री भारत स्वतंत्र झाला. तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून पहिले भाषण केले. रोषणाई करून लोकांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.

तेंव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो व पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. सार्‍या देशभर ठिकठिकाणी लोक ध्वजाला वंदन करतात. प्रत्येक शाळेत ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात.

स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या अनेक वीरांचे या दिवशी आपण स्मरण केले पाहिजे आणि आपले राष्ट्र अधिकाधिक सामर्थ्यशाली व वैभवशाली करण्याचा निश्चयही या दिवशी केला पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply