Set 1: पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी – Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.

पंडितजींचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. गांधीजींच्या चळवळींचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला. म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. १९३०च्या दांडीयात्रेत ते सहभागी झाले. १९४२च्या ‘चले जाव’ लढ्यातही ते आघाडीवर होते. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

पंडितजी स्वत: श्रीमंत कुटुंबात जन्मले. पण त्यांनी भारतातील दारिद्रय नष्ट करण्याचा ध्यास घेतला. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी भारतातील शेतीचा विकास केला. त्यांनी भारतात मोठमोठे कारखाने काढण्यास मदत केली.

पंडितजींना मुले खूप आवडत. म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘बालदिन‘ म्हणून साजरा करतात. असे हे भारताचे भाग्यविधाते पंडित नेहरू १९६४ साली निधन पावले.

पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी-Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi
पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी-Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

Set 2: पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी – Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.१४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे मोतीलाल नेहरू आणि स्वरूपराणी ह्या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मोतीलालजी खूप मोठे वकील होते. त्यामुळे जवाहरलालजींचे बालपण मोठ्या वैभवात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यांना शिकवायला खास इंग्रजी शिक्षक नेमलेले होते.

वयाच्या पंधराव्या वर्षीच शिक्षणासाठी त्यांना मोतीलालजींनी लंडनला पाठवले. आपला मुलगा खूप मोठा व्हावा अशीच त्यांची इच्छा होती. ही त्यांची इच्छा जवाहरलालजींनी वेगळ्या अर्थाने पूर्ण केली.

१९१२ साली वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतात परतल्यावर त्यांनी अलाहाबाद येथे पित्यासोबत वकिली सुरू केली. त्यांचा विवाह कमला कौल ह्यांच्याशी झाला होता. पत्नीपासून त्यांना इंदिरा नावाची कन्या प्राप्त झाली.

त्या काळात स्वातंत्र्याच्या चळवळीचे वारे वाहू लागले होते. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या जवाहरलालजींना खरा भारत कसा आहे ह्याचे ज्ञान हळूहळू होऊ लागले होते. त्यातच त्यांची गांधीजींशी गाठ पडली. गांधीजींच्या व्यक्तिमत्वामुळे जवाहरलालजी भारून गेले.

गांधीजींनाही जवाहरलालजींच्या रूपात शिष्य आणि वारस गवसला. मोतीलालजींनीही आपल्या मुलाला देशकार्यात भाग घेण्यापासून रोखले नाही.

अशा त-हेने नेहरू स्वातंत्र्य चळवळीत उतरले. गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास झाला. १९३० साली भरलेल्या कॉन्ग्रेसच्या अधिवेशनात त्यांनाच कॉन्ग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतरही स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला.

१५ ऑगस्ट, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधान म्हणून सर्वानुमते त्यांचेच नाव घेण्यात आले.

पंडितजींची गणना जगातील दूरदर्शी आणि लोककल्याणकारी नेत्यात केली जाते. ते दिवसाचे वीसवीस तास काम करीत. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पायाभूत सुविधा काहीही नव्हत्या. त्या निर्माण व्हाव्या म्हणून त्यांनी पंचवार्षिक योजना आखल्या. देशाला प्रगतीपथावर न्यायचा त्यांनी जणू चंगच बांधला होता.

आयआयटीसारख्या उच्च शिक्षण देणा-या संस्थांची, सार्वजनिक क्षेत्रातील पायाभूत कंपन्यांची पायाभरणी नेहरूंच्याच कार्यकाळात झाली. जमीनदारी पद्धतीचे निर्मूलन अशासारखी कठोर पावले त्यांनीच उचलली. वीजनिर्मितीवर भर दिला. मोठमोठी धरणे बांधली. आज आपला भारत प्रगतीपथावर आहे त्याचा पाया नेहरूंनीच रचला असे म्हणायला हरकत नाही.

ते सहृदय होते, उत्कृष्ट राजकारणी आणि धोरणी, मुत्सद्दी होते, विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी पुष्कळ पुस्तकेही लिहिली. त्यांना लहान मुले खूप आवडत असत. लहान मुलांचे ते चाचा नेहरू होते.

अशा ह्या थोर नेत्याचे २७ मे, १९६४ वृद्धापकाळामुळे निधन झाले.

Set 3: पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी – Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

पंडित नेहरूंचे नाव जवाहरलाल असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल तर आईचे नाव स्वरूपराणी असे होते. नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.

त्यांचे वडील मोतीलाल हे अलाहाबाद येथे खूप मोठे वकील होते. आपल्या मुलाने खूप मोठे बनावे ह्या इच्छेने वयाच्या सोळाव्या वर्षीच जवाहरलालना इंग्लंड येथे त्यांनी शिकायला पाठवले.

इंग्लंडहून शिकून आल्यावर जवाहरलालजी अलाहाबादमध्येच वकिली करू लागले. थोड्याच काळात कामाच्या निमित्ताने काही गरीब शेतक-यांशी त्यांची भेट झाली. त्यांची दशा पाहून जवाहरलाल अस्वस्थ झाले. त्यातच १९२० साली त्यांची महात्मा गांधी ह्यांच्याशी भेट झाली. तेव्हा गांधीजींच्या विचारांनी भारून जाऊन जवाहरलाल आणि मोतीलाल ह्या दोघांनी वकिली सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

गांधीजींनी जवाहरलाल ह्यांच्यातील गुण ओळखून आपले शिष्य म्हणून तयार केले. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचे नाव सा-या जनतेने मान्य केले.

नेहरू हे बुद्धिवादी होते, विज्ञानवादी होते. भारताचे गमावलेले वैभव पुन्हा आणण्यासाठी ते झटले. लहान मुले त्यांची फार लाडकी होती. अशा ह्या महामानवाचा मृत्यू २७ मे, १९६४ रोजी झाला.

Set 4: पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी – Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये झाला. वडील मोतीलाल नेहरु व आई स्वरुपराणी. घरच्या श्रीमंतीमुळे त्यांचे बालपण खूप लाडात गेले. उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. केंब्रिज येथे त्यांनी तीन वर्षे अभ्यास केला.

मुले नेहरुंना प्रेमाने ‘चाचा नेहरु’ म्हणत असत. मुलांना चाचा नेहरु खूप आवडायचे. ते मुलांच्यात खूप रमायचे. चौदा नोव्हेंबर हा नेहरुंचा वाढदिव मुलांना या दिवशी खूप आनंद व्हायचा. त्या दिवशी चाचा नेहरु मुलांना मेवामिठाई देत. मुले त्यांच्याभोवती आनंदाने नाचत बागडत. त्यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून आजही साजरा केला जातो. मुलांप्रमाणे गुलाबाचे फूलही चाचा नेहरुंना खूप आवडायचे.

चाचा नेहरुंचे भारतभूमीवर जसे प्रेम होते, तसे नद्यांवर, झाडाझुडपांवर खूप प्रेम होते. भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. कित्येकवेळा तुरुंगवास भोगला. त्यांनी तरुणांना संघटित केले. त्यांना स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली. स्वतः खूप हालअपेष्टा सहन करुन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरुंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. देशाच्या आणि जगाच्या शांततेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जग त्यांना ‘शांतिदूत’ म्हणून ओळखू लागले. २७ मे १९६४ मध्ये चाचा नेहरुंचा मृत्यू झाला.

चाचा नेहरु सच्चे देशभक्त होते. त्यांचे मायभूमीवर अलोट प्रेम होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या त्यांच्या अखेरच्या इच्छेतून मातृभूमीबद्द्ल असलेली तळमळ व्यक्त होते. ती इच्छा पुढील प्रमाणे.

“माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी. उरलेली रक्षा उंच विमानातून आकाशात न्यावी. ती मातृभूमीवर पसरुन टाकावी. ज्या ठिकाणी शेतकरी काबाडकष्ट करतो तेथे ती पडावी.”

Set 5: पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी – Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे फार मोठे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूपाराणी होते. त्यांचे लहानपण एखाद्या राजकुमारासारखे ऐश्वर्यात, लाडात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यांना शिकविण्यासाठी इंग्रज शिक्षक नेमले होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले. तिथे ते हैरो स्कूलमध्ये शिकले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी केंब्रिज विद्यापीठात घेतले. तिथून बॅरिस्टर बनून इ.स. १९१२ मध्ये ते भारतात परत आले.

भारतात आल्यावर अलाहाबाद हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली. १९१९ मध्ये त्यांचा विवाह कमला कौल या मुलीशी झाला. नेहरू आपल्या वडिलांबरोबरच वकिली करीत होते. त्यावेळी भारतीय स्वातंत्र्याची चळवळ खूप जोरात होती. काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांशी मोतीलाल नेहरूंचा संबंध होता. तेव्हाच नेहरू गांधीजींच्या संपर्कात आले. लवकरच नेहरूंनी गांधीजींच्या असहकार चळवळीत सक्रिय भाग घेतला, परिणामी त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला.

१९३० मध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. यावेळी पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. भारत छोडो चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. शेवटी इंग्रज सरकार भारतीय चळवळींना घाबरले व त्यांनी १९४६ मध्ये भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. एक हंगामी सरकार बनविण्यात आले, ज्याचे नेहरू पंतप्रधान होते. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला व जवाहरलाल त्याचे पहिले पंतप्रधान बनले. मरेपर्यंत ते याच पदावर राहिले.

पं. नेहरू सतत २० तास काम करीत. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. जगातील उच्च कोटीच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना तयार केल्या. जमीनदारी प्रथा नष्ट केली. शेती, उद्योग, वाढावेत म्हणून वीज निर्मितीवर भर दिला. देशात मोठी धरणे बांधली; शिक्षण व्यवस्थेत सुधारणा केली. त्यामुळे त्यांना भारत भाग्यविधाता म्हटले जाते. त्यांच्या शासनकाळात देश विकसनशील राष्ट्रांच्या श्रेणीत आला. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तटस्थतेची नीती अवलंबिली. जगातील समस्या सोडविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. म्हणून त्यांना शांतिदूत’ म्हणतात.

पं. नेहरू हसतमुख, सहृदय, व्यक्ती होते. मुत्सद्दी राजकारणी, लेखक होते. त्यांना मुले फार आवडत. लहान मुलांचे ते ‘चाचा नेहरू’ होते. २७ में १९६४ रोजी त्यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान दिला.

पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी – Pandit Jawaharlal Nehru Sort Essay Marathi

पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ या दिवशी प्रयाग येथे झाला. हा दिवस देशभर ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. हा पंडित नेहरूंचा जन्म दिन आहे. यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरु होय. त्यांच्या आईचे नाव स्वरुपराणी होते. त्यांना मुले व गुलाबाची फुले अतिशय आवडत असत. त्यांना पांढरे कबूतरे आवडतात. मुले त्यांना चाचा नेहरु या नावाने ओळखतात. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. पुढे त्यांची मुलगी इंदिरा गांधी याही भारताच्या पंतप्रधान झाल्या. पंडित नेहरूंनी जगाला शांततेचा संदेश दिला.

पंडित जवाहरलाल नेहरू निबंध मराठी-Pandit Jawaharlal Nehru Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply