जाहिरातबाजी किंवा जाहिरात एक कला मराठी निबंध – Jahirat Ek Kala Marathi Nibandh

दूरचित्रवाणी, व्हिडिओवरील चित्रपटांच्या कॅसेट, आकाशवाणी या विविध माध्यमांतून जाहिरातकला आता आपल्या घरात घुसली आहे. किंबहुना आपण प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की, जाहिरात ही आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनली आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे काही करत असतो, त्यात जाहिरात ही आपली मार्गदर्शक ठरते.

जाहिरातींमध्ये जास्तीत जास्त जाहिराती असतात त्या टूथपेस्ट, साबण, सौदर्यप्रसाधाने आणि पोशाख यांच्या. माणसांच्या नित्य नैमित्तिक गरजा लक्षात घेऊनच या जाहिराती केलेल्या असतात. जाहिरात ही एक कला आहे आणि ही कला इतर अनेक कलांचा व शास्त्रांचा आधार घेऊनच मूर्त स्वरूपात येते. या जाहिरातींचेही आता एक शास्त्र तयार झाले आहे.

जाहिरात ज्या माणसांसाठी असते, त्या माणसांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन ती केली जाते. जाहिरात केल्याशिवाय कोणत्याही वस्तूला उठाव येणार नाही हे आता सर्वांनी जाणले आहे. त्यामुळे अगदी पेन्सिलीसारख्या लहान, कमी किमतीच्या वस्तूंपासून टी. व्ही, वॉशिंगमशीन अशा अगदी हजारो रुपये किमतीच्या वस्तूंपर्यंत सर्वांची जाहिरात केली जाते. अशी ही चिमुकली जाहिरात अर्थशास्त्राशीही निगडित आहे. उत्तम जाहिरातींमुळे वस्तूचा खप करोडो रुपयांनी वाढल्याचे अनेक उत्पादकांनी आजवर मान्य केले आहे.

आज जाहिरात ही विविध स्वरूपांत आढळते. संगीत, अभिनय, चित्रकला, छायाचित्रकला अशा नानाविध कलांचा ती आधार घेत असते; म्हणून छोटीशी जाहिरातही की अनेकांची पोशिंदी ठरते. जाहिरातीचे हे अचाट सामर्थ्य जाणून काही काही जाहिरातदार वैयक्तिक फायदयासाठी सत्यापासून दूर सरकतात. तसे पाहता जाहिरातीमध्ये अतिशयोक्तीचा भाग असतोच. या अतिशयोक्तीमुळे अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते.

काही ठिकाणी अशी जाहिरात ही घातकसुद्धा ठरू शकते. म्हणून जाहिरात पाहून व्यवहार करणाऱ्यांनी या जाहिरातबाजीपासून सावध राहिले पाहिजे. जाहिरातीतील हा धोका लक्षात घेऊन व्यवहार केला, तर खरोखरच जाहिरात ही ग्राहकाची सखीच ठरेल, कारण ती एकाच वेळी त्याला आवश्यक माहिती देते व मनोरंजनही करते.

पुढे वाचा:

Leave a Reply