मी पहिल्यांदा आगगाडीने गेलो तेव्हा निबंध मराठी

माझी शुभामावशी इंदूरला राहाते. तिच्याकडे मी तीनचार वर्षांपूर्वी पहिल्यांदा गेलो तो होता माझा आगगाडीचा पहिला मोठा प्रवास. आम्ही मुंबईहून अवंतिका एक्स्प्रेसने इंदूरला गेलो. पहिल्या दिवशी सकाळी मुंबई सेंट्रलहून ती आगगाडी निघाली ती दुस-या दिवशी सकाळी इंदूरला पोचली.

खरोखर आगगाडीचा प्रवास अगदी रंगतदार होतो आणि आरामाचाही होतो. रात्रीच्या वेळेस बाकावर आडवे होऊन झोप घेता येते. मध्येच आसनावरून उठून पाय मोकळे करता येतात. शिवाय प्रसाधनगृहाचीही सोय डब्यात असल्याने गैरसोय होत नाही. आमची बोगी वातानुकुलित तीन टियर होती. त्यामुळे आम्हाला झोपताना चादरी, उशा आणि ब्लँकेटसुद्धा मिळाले.

शुभामावशीच्या विशालची मुंज होती म्हणून मी, आई, बाबा आणि ताई असे इंदुरला चाललो होतो. त्यासाठी आम्हाला तिकिटे आरक्षित करावी लागली. हल्ली रेल्वेच्या संकेतस्थळावरून घरच्या घरी प्रवासाच्या आधी चार महिने इंटरनेटने तिकिटे आरक्षित करता येतात. आम्ही आरक्षण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तिकिटे काढून ठेवली म्हणून बरे झाले. मला तर कधी एकदा मी आगगाडीत बसेन आणि माझा प्रवास सुरू होईल असे झाले होते. मी माझी सामानाची बॅग पुष्कळ आधीपासूनच भरून ठेवली होती. अखेर तो दिवस एकदाचा उजाडला. आम्ही गाडीच्या वेळेच्या तासभर आधीच रेल्वे स्थानकावर पोचलो. कुठली बोगी कुठे लागणार त्याचे फलाटावर फलक लावलेले होते. आम्ही योग्य त्या स्थळी उभे राहिलो. गाडी, आल्यावर डब्यात चढून सामान बाकाखाली नीट ठेवले. बाबांनी सामानाला बांधायला साखळी आणली होती कारण रात्रीच्या वेळेस चोरटे बॅगा उचलून घेऊन जाण्याची शक्यता असते. थोड्या वेळाने गाडी सुरू झाली. गाडीत साधारणपणे आमच्या वयाची दोन मुले होती. त्यामुळे मी आणि ताई त्यांच्याबरोबर पत्ते खेळू लागलो. गप्पागोष्टीत वेळ छान जाऊ लागला. थोड्या वेळाने चहा आणि नाश्ता विचारायला आगगाडीतील सेवक आले. आमच्या आईने घरून ठेपले, पुरणपोळ्या आणि दहीभात आणला होता. त्यामुळे आम्ही फक्त चहाच घेतला.

गाडी सुरूवातीला हळू चालत होती. मग तिने जोरदार वेग पकडला. मला खरे तर बाहेरची गंमत पाहायची होती. परंतु वातानुकुलित गाडीमध्ये खिडक्यांच्या काचा बंद असतात आणि त्यावर धूळ असल्यामुळे बाहेरचे नीट दिसत नाही. मला दरवाजात उभे राहून वारा खात बाहेर पाहायची इच्छा होती. परंतु आईबाबांनी तसे करू दिले नाही. जरा वेळाने तिकिटतपासनीस आले. बाबांनी त्यांना तिकिटे आणि स्वतःचे आधारकार्ड दाखवले. वरच्या वर्गातील प्रवासात काय होते की डब्यात अनारक्षित प्रवास करणारी अन्य माणसे, भिकारी, फेरीवाले घुसत नाहीत. एरवी मला दिवसभर कंटाळाच आला असता पण डब्यातच दोन मुलं होती म्हणून पत्ते खेळत वेळ कसा गेला ते समजले नाही. ती मुलं इंदुरला राहाणारीच होती. ती त्यांच्या काकांकडे मुंबईला आली होती आणि परत चालली होती. त्यांनी आम्हाला इंदूरच्या गंमतीजमती सांगितल्या. आमच्या मावशीच्या घराजवळच त्यांचे घर होते म्हणून आम्ही एकमेकांना परत भेटायचे ठरवले. त्या मुलांच्या आईबाबांची आणि आमच्या आईबाबांचीही दोस्ती झाली.

रात्री गाडी सारखी हलत होती त्यामुळे मला सुरूवातीला नीट झोप लागली नाही. पण नंतर जी झोप लागली ती एकदम सकाळीच जाग आली. थोड्याच वेळात इंदुरही आले आणि तो आमचा पहिला आगगाडीचा प्रवास सफळसंपूर्ण झाला.

पुढे वाचा:

Leave a Reply