माझा विमान प्रवास निबंध मराठी – Maza Viman Pravas Marathi Nibandh

विमानाने प्रवास करत होते. आयुष्यात प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव, तोही भारताच्या उत्तरेकडील काश्मीर या थंडप्रदेशात जाण्यासाठी. खुपच रोमांचपूर्ण अनुभव. लहानपणी वाचलेल्या परीकथेतील ढगांच्या कापसावरुन गेल्याचा आभास कि सत्य माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तीन तासांचा संलग्न प्रवास परंतु दोन वेळा विमान खाली उतरुन पुन्हा दोन वेळा उड्डाण. किती आनंद होता ! शब्दांतून साकारताच येत नाही. पहाटे सहाला निघालेले विमान सकाळी ११.१५ ला श्रीनगर विमानतळावर स्थिर झाले आणि हुडहूडी भरणाऱ्या थंडीने दातांवर दात आपटू लागले. स्वेटर, स्कार्फ, हातमोजे यांची शोधाशोध. दुसरा गट रात्री येणार होता. जेवण घेऊन थोडा आराम करुन फ्लोएटींग मार्केट पाहण्यासाठी शिकाऱ्यातून निघालो. माझ्याबरोबर मुंबईतील तीन-चार जण उत्सुक अवस्थेत.

कालपर्यंत भारताचे नंदनवन म्हणून पुस्तकांतून व चित्रातून पाहिलेले काश्मीर प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून ओढयुक्त हुरहुर लागुन राहिली होती. थोडेसे मार्केटिंग करुन रात्री परत येईपर्यंत बाकी मंडळी आम्हाला सामील झाली. थंडीतील रोमांचक हुडहूडी, टीमलीडरचे उठायचे व निघायचे वेळापत्रक ठरलेले. रोज नवीन विश्व पहायला जाताना गोड, गुलाबी, गुदगुल्या करणारी थंडी तनामनाला सुखावून जात होती.

मला सर्वात आवडलेले ठिकाण म्हणजे पहेलगाम (valley of shepherds). वय विसरुन बर्फात खेळणारी आम्ही थोराड मुले बर्फाचे गोळे एकमेकांवर टाकत, घसरत होतो. बर्फाचे डोंगर रचत होतो. व हुडहूडी भरली की चहाकॉफी पित होतो. चार दिवस नंदनवन पाहून ‘जयमातादी’ चा गजर करत जाणारी टीम अथक ६५०० फूट अंतर नव्या व ताज्या दमाने मातादीच्य दर्शनासाठी चढत होती. रात्र असुनही दिवस असल्याप्रमाणे ताजे टवटवीत आम्ही एकमेकाला प्रोत्साहन देत चढलो व दिवस उगवण्याच्या आत हॉटेलवरही पोहोचलो. .

उंच उंच हिमगिरीच्या रांगा, पर्वतउतारावर हिरवीगार सूचीपर्णी वृक्षांची अरण्यं, त्यावर साचलेला बर्फ आणि उन्हांत ते चांदीप्रमाणे चमकणारे वृक्षांचे शेंडे, पर्वताच्या कुशीत उगम पावून आपला खळाळता, अवखळपणा घेऊन धावणाऱ्या उत्साही नद्या, विविधरंगी फुलांनी सजलेल्या ऐतिहासिक काळापासून, प्रसिद्ध असणाऱ्या बागा, विस्तीर्ण सरोवरं, त्यात उभारलेल्या आलिशान हाऊसबोट्स, संथ जळावर हलकेच तरंग उमटवीत विहरणारे रंगीबेरंगी शिकारे आणि पर्यटकांना शीळ घालून बोलवणारे काश्मिरी यजमान, निरनिराळ्या पुरातन वास्तू आणि आतिथ्यशील स्थानिक अशीच व्याख्या काश्मीरची करता येईल.

15 नैसर्गिक सौंदर्याचा वैविध्यपूर्ण वारसा लाभलेल्या अनेक वेशांनी आणि भाषांनी संपन्न असणाऱ्या आपल्या भारत देशाचा मुकुटमणी म्हणजेच काश्मीर. राजधानी श्रीनगर असणारा हा प्रदेश. ईश्वराने मुक्तहस्ताने उधळण केलेला संपन्न असा भूतलावरील स्वर्गच होय. दल सरोवर, नगीन सरोवर अशी विशाल सरोवरे पाहून थक्क होऊन जाणारे पर्यटक जाण्यापूर्वीच पुन्हा येण्याची ग्वाही देतात. दल लेकच्या तीरावरील उंच टेकडीवर वसलेले शिवालय प्राचीन मंदिर आहे. जगत्गुरु श्री आदि शंकराचार्यांनी या मंदिरात वास्तव्य केले होते. म्हणून त्या टेकडीला शंकराचार्य हिल म्हणूनच ओळखतात.

दल लेकमधील ‘चार चिनार’ हे बेट चित्रपटात पाहूनही निसर्गरम्य असल्याचे जाणवते. नितांत सुंदर असे ‘गुलमर्ग’ उन्हाळ्यात गवताच्या कुरणांनी, वाऱ्याच्या झोताने डोलणारे असे हिवाळ्यात मात्र बर्फाची मऊ शाल पांघरुण पहूडलेले असते. ‘गोंडोला’ इथे केबलकारमधून, हवाई सफर करताना हिमाच्छादित जमीन मनाला मोहवते. येथील पाम्पूर या ठिकाणी दुर्मीळ असे केशर पिकते. याच रस्त्यावर ‘संगम’ या गावात क्रिकेटच्या बॅटस् मिळतात. बॅटस्ची खरेदी आटोपताच अमर यात्रेचा आरंभबिंदू असणारे ‘पेहलगाम’ गावाचा इतिहास विचारत ‘लिडर’ नदीच्या ‘ खोऱ्याचे अपूर्व दर्शन घडते. काश्मिर खोऱ्यात हिंदू-मुस्लीम दोन्ही समाज बरोबरीने नांदताना दिसतात. कटरा येथील वैष्णोदेवी बरोबरच महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशी देवीमाँची तिन्ही रुपे पहायला मिळतात.

मस्जिद व मंदिर शेजारी-शेजारी असणारी भारताची सीमा असणारी ही नगरी पहाताना सौंदर्याचा परिपूर्ण आविष्कार प्राप्त होतो व हा अनुभव पुन्हा पुन्हा घेता यावा अशी इच्छा प्राप्त होते. घरी आल्यावर पाहिलेल्या निसर्गाचे वर्णन करताना मध्यरात्र कधी होते हेही समजत नाही.

पुढे वाचा:

Leave a Reply