माझा गाजलेला छंद निबंध मराठी

लहानपणी मला माझ्या आजोबांचा सहवास खूप लाभला. मला आठवते, आजोबा नेहमी कोणता ना कोणता तरी अभंग गुणगुणत असायचे. त्यांतल्या एका अभंगाचा एक चरण असा होता,’ असा धरी छंद, जाई तुटोनिया भवबंध’. मी आजोबांना विचारले, “आजोबा, छंद म्हणजे काय हो?” त्यावर आजोबा म्हणाले, “बाळकोबा, छंद म्हणजे काय ते कळेल हं तुम्हांला मोठे झाल्यावर ! पण छंद असा धरा की, ज्यामुळे सर्वत्र तुमचे नाव गाजेल.”

आज राष्ट्रपतींच्या हातून ‘सुवर्णपदक’ स्वीकारताना मला आजोबांची खूप खूप आठवण झाली. आज माझे आजोबा असते तर म्हणाले असते, “बाळकोबा, तुम्ही खरोखरीच आपल्या घराण्याचे नाव गाजवलेत हं!” लहानपणापासून मला पाण्यात डुंबण्याच विलक्षण छंद, त्यापायी मी कित्येकदा आईची बोलणी खाल्ली आहेत. पण माझे बाबा मात्र माझे नेहमी हसून कौतुक करायचे.

मी जेमतेम पाच वर्षांचा असताना माझ्या बाबांनी मला प्रथम विहिरीत उतरवले. सुरवातीला मी घाबरत घाबरत पोहत असे. पण बाबांनी मला उंचावरून उड्या मारण्यास शिकवले. त्यामुळे माझा हुरूप वाढला. मी तासन्तास विहिरीत डुंबत असे. पोहताना मी स्वत:ला व भोवतालच्या जगाला विसरत असे.

मी मोठा झालो तेव्हा बाबांनी माझे नाव तरण-तलावात नोंदवले. तेथे मला आपुलकीने मार्गदर्शन करणारे गुरुजी भेटले. त्यांनी मला पोहण्यातील विविध प्रकार शिकवले. त्यामुळे मी न भिता स्वत:ला पाण्यात झोकून देऊ लागलो. गुरुजींनी मला आंतरशालेय स्पर्धेसाठी पाठवले आणि त्या स्पर्धेत मला पहिले बक्षीस मिळाले. तेव्हापासून आजवर मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि बक्षिसेही मिळवली आहेत. अभ्यास व्यवस्थित सांभाळूनच मी माझा छंद जोपासल्यामुळे आईही नाराज नव्हती. बाबांचे तर नेहमी प्रोत्साहन होतेच.

शालेय पातळीवर मी यशस्वी ठरल्यावर राज्यपातळीवरील स्पर्धांत उतरलो व तेथून राष्ट्रपातळीवरील स्पर्धा गाठली. तेथेही अजिंक्य ठरलो. म्हणून तर आज राष्ट्रपतींकडून माझा गौरव झाला. आता ऑलिम्पिकसाठी माझी निवड झाली आहे.

आज राष्ट्रपतींकडून मिळालेल्या या पदकापेक्षा या छंदाचा अभिमान मला केव्हा वाटला होता सांगू? जेव्हा मी एका बुडणाऱ्या मुलाला वाचवू शकलो होतो तेव्हा.

पुढे वाचा:

Leave a Reply