माझा छंद बागकाम निबंध मराठी

आनंद मनोरंजन, ज्ञानप्राप्तीचे सर्वात चांगले साधन म्हणजे छंद किंवा आवड. यामुळे वेळेचा सदुपयोग होतो. रिकामा वेळ चांगला जातो. जीवनातील कंटाळवाणेपणा जाऊन स्फूर्ती येते. छंद आनंद व मनोरंजनासाठी असतो. छंद अनेक प्रकारचे असतात. वाचन करणे, लेखन करणे, एखादा खास खेळ खेळणे, तिकिटे व नाण्यांचा संग्रह करणे, गाणे बजावणे, बागकाम इ. छंदामुळे जीवनाला नवा अर्थ मिळतो. छंदामुळे ताण दूर होतो, मन ताजेतवाने राहते.

बागकाम माझा आवडता छंद आहे. तो मला वारसाहक्काने मिळाला आहे. माझ्या बाबांना हाच छंद आहे. ते फार चांगले ‘माळी’ आहेत. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. माझ्या आईला पण बागकामात रस आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूला एक छोटीशी बाग आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे आम्ही लावली आहेत. उदा. आंबा, लिंबू, कदंब, गुलाब, मोगरा इ. थोडा भाजीपाला पण लावला आहे. झाडांना खत पाणी देणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, त्यांना फुलत फळत असताना पाहणे हे सारे करण्यात खूप आनंद मिळतो. जेव्हा मी बागेत असतो तेव्हा मला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते.

अभ्यास आणि खेळणे झाल्यावर जो वेळ मिळतो तो मी बागेत घालवितो. तिथे अनेक प्रकारचे पक्षी येतात. तिथेच झाडावर त्यांनी आपली घरटी बनविली आहेत. त्यांची किलबिल ऐकणे, त्यांचे निरीक्षण करणे आदी मुळे मला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. जेव्हा झाडांना फुले येतात तेव्हा वेगळाच आनंद मिळतो. त्याच्या सुगंधाने सारे घर दरवळते. एप्रिल-मे मध्ये आंब्याला मोहोर येतो. त्याच्या सुवासाने मन धुंद होते. आंब्याच्या झाडाला आंबे लागल्यावर आनंद द्विगुणित होतो.

माझा सर्व पॉकेटमनी मी माझ्या बागकामाच्या छंदावर खर्च करतो. खत, बियाणे, अवजारे विकत घेतो. नवीन रोपे लावतो. माझ्याजवळ बागकामासंबंधीची पुस्तके पण आहेत. माझ्या काही मित्रांना पण बागकामाचा छंद आहे. आम्ही सगळे बागकामावर गप्पा मारतो. रोपांची देवाण घेवाण करतो. त्यात खूप आनंद मिळतो. जेव्हा गावात रोपांचे/फुलांचे प्रदर्शन भरते तेव्हा आम्ही ते पाहण्यास जातो. माझा झाडांशी, रोपांशी घनिष्ठ संबंध आहे. मी त्यांच्याशी बोलतो. ते ही माझ्याशी बोलतात. असा हा माझा छंद मला खूप आनंद देऊन जातो.

माझा छंद बागकाम निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply