मोगल उद्यानात फेरफटका निबंध मराठी

राष्ट्रपती भवन हे भारतातील राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. इंडिया गेटच्या समोर राजपथाच्या पश्चिमेकडे हे भवन स्थित आहे. रायसिना डोंगरावरील हे भव्य स्मारक १९२९ मध्ये बांधण्यात आले. प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ एडवर्ड ल्युमिटन्स व हर्बर्ट बेकर यांनी हे तयार केले. राष्ट्रपतीभवनातील मोगल उद्यानाचे एक खास महत्त्व आणि आकर्षण आहे. हे एक अतिशय सुरेख उद्यान आहे. श्रीनगर येथील शालीमार, निशांत व चश्मेशाही या उद्यानांची यावर छाप आहे.

या वर्षी मला मोगल उद्यान बघण्याची संधी मिळाली. वसंतु ऋतूत हे उद्यान काही दिवस जनतेसाठी खुले केले जाते. यावेळी त्याची शोभा पाहण्यासारखी असते. तिथे किती तरी प्रकारची रंगीबेरंगी सुवासिक फुलझाडे, वृक्ष, रोपे आहेत. मोठेमोठे कारंजे पाहून मन मुग्ध होते. चोहीकडे पसरलेल्या दाट मऊ हिरवळीवर चालण्याचा आनंद वेगळाच आहे. असे वाटते जसे आपण मखमलीच्याच गालिच्यावर चालत आहोत. या सर्वांची देखभाल चांगली केली जाते. अनेक कुशल माळी आणि बागवान या कामी नेमले आहेत.

ज्यादिवशी मी मोगल उद्यान पाहण्यास गेलो त्या दिवशी वातावरण खूपच छान होते. खूप लोक तिथे आले होते. प्रेक्षकांची खूप मोठी रांग होती. अनेक विदेशी पर्यटक पण होते. तिथे काही पाळलेले मोर आणि कबुतरे होती. हौदात बदके होती. सारे काही स्वर्गासारखे भासत होते. गुलाबांचा मंद सुगंध मनाला गुदगुल्या करीत होता. रंगांचे अलौकिक प्रदर्शन होते. त्यामुळे डोळे सुखावले.

तिथे निरनिराळ्या जातींचे किती तरी देखणे वृक्ष आहेत. फुलांच्या रोपांच्या वाफ्यांना सुंदर. वर्तुळाकार, चौकोनी, षटकोनी, अंडाकार असे वेगवेगळे आकार दिलेले आहेत. वृक्षांची छाटणी करून त्यांना प्राण्यांचे आकार दिले आहेत. हे उद्यान पायऱ्यांचे आहे. मध्येच एक छोटासा हौद असून त्यात सुंदर कारंजे आहे. हौदाच्या स्थिर स्वच्छ पाण्यात चहुकडचे प्रतिबिंब पडते. हे दृश्य जादूचे असल्यासारखे वाटते. मी मंत्रमुग्ध होऊन सारे काही पाहत होतो. आज पण त्याची आठवण ताजी आहे. असे वाटते जणू मी एक स्वप्नच पाहिले होते. पुन्हा एकदा मोगल उद्यान पहाण्याची मला इच्छा आहे.

मोगल उद्यानास भेट निबंध मराठी

हल्लीच मे महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या आईबाबांसोबत काश्मीरला गेले होते. तिथे निशात आणि शालिमार ही मोगलांनी बांधलेली उद्याने बघण्याची संधी मला मिळाली. ह्या दोन्ही बागा दाल सरोवराच्या काठावर आणि एकमेकींच्या बाजूलाच बांधलेल्या आहेत. दाल सरोवराच्या काठाशी असल्यामुळे त्यांना पाणी देणे कधीच कठीण गेले नाही.

ह्या बागांत आम्ही गेलो तेव्हा हवा अगदी आल्हाददायक होती त्यामुळे मन प्रसन्न झाले. तिथे कितीतरी प्रकारची रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलझाडे, वृक्षवेली आणि रोपटी आहेत. गुलाब तर सगळीकडे अगदी रानफुले उगवावीत तसा उगवला होता. ते पाहून काश्मिरी गुलाब एवढा सुप्रसिद्ध का आहे ते समजले. तिथेच एक मोठे कारंजेही होते. त्यातील पाण्याचा नाच पाहून आम्हा मुलांनाही नाचावेसे आणि बागडावेसे वाटत होते. चोहीकडे मऊ आणि हिरवीगार हिरवळ पसरली होती. त्या हिरव्या गालिचावरून अनवाणी चालताना पायांना अगदी सुखद गुदगुल्या होऊ लागल्या. ह्या दोन्ही बागांची देखभाल खूप चांगली केली जाते. तिथे कुशल बागवान आणि माळी नेमण्यात आलेले आहेत. ज्या दिवशी आम्ही ह्या बागा पाहाण्यास गेलो त्या दिवशी तिथे पुष्कळ लोक आले होते. मे महिना असल्यामुळे देशी आणि विदेशी पर्यटकांची खूप गर्दी होती. तिथे पाळलेले मोर होते, सरोवरात हंस विहार करीत होते, कबुतरे होती. सारे काही अगदी स्वर्गात असल्यासारखेच वाटत होते. त्यामुळेच तर मोगल बादशहा जहांगीर असे म्हणाला होता की पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो फक्त ह्याच ठिकाणी असेल. त्याने शालिमार ही बाग आपली पत्नी नूरजहान हिच्यासाठी बांधून घेतली होती.

ह्या बागांत पूर्वीच्या काळी ब-याच हिंदी चित्रपटांचे शुटिंग होत असे. परंतु पुढे पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणे सुरू केल्यावर ते बंद झाले. काही काळापूर्वी तर पर्यटकसुद्धा इथे येत नव्हते. परंतु आता तेही येऊ लागले आहेत.

ह्या बागांत सूचिपर्णी जातीचे पाईन आणि फरचे कितीतरी घनदाट वृक्ष आहेत. फुलांच्या रोपांच्या वाफ्यांना षट्कोनी, चौकोनी, अंडाकृती असे आकार दिलेले आहेत. त्यावरून भुंगे आणि फुलपाखरं भिरभिरत होती. डोक्यावर तुरे असलेले बुलबुल पक्षी किलबिल करीत सगळीकडे बागडत होते. आम्ही तर दंग होऊन सारे दृश्य पाहातच राहिलो. सा-या वातावरणात जादूच भरून आल्यासारखी वाटत होती. ते दृश्य माझ्या मनोपटलावरून कधीही पुसले जाणार नाही. पुन्हा मी काश्मीरला केवळ ते दृश्य पाहाण्यासाठीच जाईन असे मला वाटते.

पुढे वाचा:

Leave a Reply