मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी – Mi Shalechi Ghanta Bolte

रोज सकाळी ठणठणाट करून मुलांना पळापळ करायला लावणारी अशी मी कोण आहे बरे? चकचकीत पितळी शरीराची, भलीमोठी, शाळेच्या आवारात टांगलेली अशी मी कोण आहे बरे? अहो, मी आहे शाळेतली घंटा.

रोज सकाळी साडेसात वाजता मी नित्य नेमाने वाजते. तेव्हा सगळी मुले धावतपळत वर्गात येऊन बसलेली असतात. त्यानंतर प्रार्थना होते. मी ठणठणाट केल्यावरही जी मुले उशीरा येतात त्यांना शिक्षा भोगावी लागते. कारण वेळ पाळण्याचे महत्व किती आहे ही शिस्त मुलांच्या अंगी लहानपणीच बाणवणे हेच तर शाळेचे कर्तव्य असतेना.

शाळा सुरू झाली की माझे काम संपले असे होत नाही बरे का ! त्यानंतर प्रत्येक तासातासाला घंटा होते. तेव्हा एक शिक्षक आपला तास संपवून जातात आणि दुसरा विषय शिकवायला पुढले शिक्षक येतात. अशा त-हेने वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषय रोज झाले पाहिजेत ह्यासाठी माझे योगदान किती आहे हे तुम्हाला आता कळले असेलच.

त्याशिवाय छोटी सुट्टी, मधली सुट्टी आणि शाळा संपते तेव्हाही मीच मोठ्याने ठणठणाट करते मात्र. सुट्टी सुरू झाल्याचा ठणठणाट मी केला की सगळी मुले हो… असा मोठा आवाज करून उठतात.

कित्येक मुलांना पटापट डबा खाऊन शाळेच्या मैदानावर खेळायला जायचे असते. त्यांचे खेळणे बघायला मलाही आवडते पण काय करणार? सुट्टीची वेळ संपली की मला परत ठणठणाट करावा लागतोच ना? तेव्हा पाय ओढत मुले वर्गात परततात. पण गंमत म्हणजे तीच मुले शाळा सुटण्याचा ठणठणाट केला की पुन्हा धावायला आणि आरडाओरडा करायला तयार असतातच. तेव्हा मलाही बरे वाटते.

माझे आणि शाळेतल्या शिपाईदादांचे जवळचे नाते आहे. कारण शिपाईदादांनी जर माझे टोले वेळेवर दिलेच नाहीत तर मी तरी कशी काय वाजणार? आमच्या शाळेतले रामभाऊ शिपाई आहेत त्यांच्याकडे हे जबाबदारीचे काम सोपवले गेले आहे.ते गेली कित्येक वर्षे नियमितपणे हे काम करीत आहेत. किती मुले आली आणि गेली परंतु मी मात्र वर्षानुवर्षांपासून माझे काम करीत आले आहे.

मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी – Mi Shalechi Ghanta Bolte

पुढे वाचा:

Leave a Reply