मुलामुलींनी एकत्र शिक्षण घ्यावे काय?

आमची शाळा मुलामुलींची एकत्र आहे. बालवाडीपासूनच ह्या शाळेत असल्यामुळे आम्ही सर्व मुलेमुली एकमेकांना अगदी लहानपणापासूनच ओळखतो. त्यामुळे एकमेकांशी वागताना आम्ही मोकळेपणाने वागतो. मला आमची शाळा आवडते कारण मुलामुलींमध्ये विनाकारण स्पर्धा येथे होत नाही. आज विचार केला की सगळे सोपे वाटते परंतु एके काळी मुलींना साधे शिक्षणही घेता येत नव्हते, मग उच्च शिक्षण तर फारच दूर राहिले.

वेदकाळात गार्गीमैत्रेयीसारख्या पंडिता होऊन गेल्या असतील परंतु, मध्ययुगात स्त्रियांची परिस्थिती अत्यंत शोचनीय झाली. त्यांना घराच्या चार भिंतीत डांबून ठेवण्यात आले. फक्त चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र उरले. भारतातच नव्हे तर जगभरातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. परंतु हळूहळू १९ व्या शतकात इंग्लंड, फ्रान्स येथील स्त्रिया जागृत झाल्या आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवू लागल्या.

मागच्या शतकापर्यंत भारतात हीच स्थिती होती. परंतु महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर, राजा राममोहन रॉय इत्यादी थोर समाजसुधारकांनी स्त्रियांच्या दुर्दशेबद्दल चळवळी सुरू केल्या. अनेक सुधारणा घडवून आणल्या गेल्या. त्यामुळे स्त्रिया पुढे येऊ लागल्या.

त्यांची उन्नती होऊ लागली. लोकांचे हळूहळू मतपरिवर्तन होऊ लागले. आता लोकसत्ताक भारतात स्त्रीपुरूषांना समान हक्क आहेत, शिक्षणाच्या समान संधी आहेत. पूर्वी मुलांची शाळा आणि मुलींची शाळा वेगळी असे. असे वेगवेगळे ठेवल्यामुळेच उलट मुलामुलींमध्ये अनावश्यक आकर्षण निर्माण होते. त्यांचा मानसिक विकास व्यवस्थित होत नाही. ह्या उलट मुलामुलींनी एकत्र शिकणे म्हणजेच सहशिक्षण. सहशिक्षणामुळे मुलामुलींना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. त्यांच्यात चांगली मैत्री होते.

परस्परांवरचा विश्वास वाढीला लागतो. जातीभेदाची आणि हुंड्याची अनिष्ट प्रथा नष्ट होण्यास मदत होते. सहशिक्षणामुळे मुलामुलींतील अनाठायी आकर्षण समाप्त होते. मुलींच्या मनातली भीतीची भावना नष्ट होऊन आत्मविश्वास जागृत होतो. मुलांच्या वागण्यातही सभ्यता येते. सहशिक्षणामुळे एकाच भागात दोन वेगवेगळ्या शाळा उभारण्याचावरचा खर्च टाळला जातो. मुलामुलींमधील निकोप स्पर्धा वाढीस लागते.

त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकासही उत्तम प्रकारे होतो. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला आपण निरोगी आणि आकर्षक बनावे असे सहशिक्षणामुळेच वाटते. म्हणूनच सहशिक्षण हे अधिक लाभदायक असते. आता ग्रामीण भागातही सहशिक्षण आले आहे. खाजगी आणि शासकीय शाळांत आणि महाविद्यालयातही सहशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सहशिक्षणामुळे समाजात स्त्रीपुरूष समानतेची बीजे रूजणार आहेत, जातीपातीची बंधने नष्ट होणार आहेत, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणूनच सहशिक्षणाला महत्व आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply