मी मासा झालो असतो तर मराठी निबंध – Mi Masa Zalo Asto Tar in Marathi

परवाच मी आमच्या येथील तारापोरवाला मत्स्यसंग्रहालयात गेलो होतो. काचेच्या मोठमोठ्या पेट्यांत ठेवलेले वेगवेगळ्या रंगांचे आणि आकाराचे मासे पाहून मी अगदी दंगच होऊन गेलो. त्या माशांना पाहून मला वाटले की मीसुद्धा मासा म्हणून जन्माला आलो असतो तर?

ह्या पृथ्वीवर एक्काहत्तर टक्के पाणी आणि फक्त २९ टक्के जमीन आहे. मग समुद्राच्या आत केवढी अजबगजब दुनिया असेल ना? माणूस पाण्यात श्वास घेऊ शकत नाही म्हणून बरे आहे. माणसाला तेही शक्य झाले असते तर समुद्राच्या तळाच्या जमिनीवरही त्याने शहरे वसवली असती.

कशी असेल समुद्रातली दुनिया? मी मासा झालो असतो तर मला तिथले पर्वत, डोंगर आणि द-या पाहायला मिळाल्या असत्या. पाणवनस्पतींची मोठमोठी जंगले पाहायला मिळाली असती. शंख आणि शिंपल्यातले जीव समुद्राच्या पाण्यात बागडताना मी पाहिले असते. बेडूक, खेकडे, स्टारफिश, सील, आक्टोपस, सुसरी, मगरी, कासवे, पाणसाप आणि देवमासे ह्या सगळ्यांना मी भेटलो असतो.

सागरात कोरलसुद्धा जन्मते. अंदमानच्या आणि लक्षद्वीपच्या सागरात पुष्कळ कोरल आहेत. तिथं त्या कोरलचे मोठे ढिगारे असतात. त्यातून वाट काढत मासे लहरत असतात. मी जर मासा म्हणून तिथेजन्मलो तर मला तेही पाहायला मिळाले असते. पण मी कुठला मासा झालो असतो बरं? मला स्वतःला डॉल्फिन मासा बनायला खूप आवडले असते. मी वाचले आहे की डॉल्फिन माशाला माणसाळवता येते. त्याला वेगवेगळे खेळ आणि कसरती शिकवता येतात. तो बुद्धिमान असतो. म्हणून कित्ती बरे आहे ना?

म्हणूनच मला असा बुद्धिमान डॉल्फिन मासा बनायला आवडले असते. एक मात्र आहे की मी जर लहान मासा बनलो तर कुठलातरी मोठा मासा मला गिळून टाकू शकतो. मग काय उपयोग? म्हणूनच मला मोठा मासा बनायचे आहे. परंतु तसे पाहिले तर माशांचा सर्वात मोठा शत्रू तर माणूसच आहे. तो खोल समुद्रात यंत्रांद्वारे मासेमारी करतो, समुद्रात सांडपाणी आणि घातक रसायने सोडतो. त्या प्रदुषणामुळे समुद्रातील मासे मरतात. म्हणून मला मासा होण्याची भीतीसुद्धा वाटते. त्यामुळेच ही केवळ कल्पना आहे.

मी मासा झालो असतो तर मराठी निबंध – Mi Masa Zalo Asto Tar in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply