माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध – Maza Avadta Lekhak Marathi Nibandh

वाचन हा माझा आवडता छंद आहे. या छंदाने मला वेड लावले आहे. पुस्तक मग ते कोणत्याही भाषेतील किंवा कोणत्याही विषयाचे असो, मी ते पुस्तक वाचून काढल्याशिवाय स्वस्थ झोपू शकत नाही किंवा बसू शकत नाही, जणु काही पुस्तक वाचण्याचे मला एक व्यसनच आहे. काही पुस्तके तर माझी एवढी आवडती आहेत की ती पुन्हा-पुन्हा वाचली तरी मला त्यांचा कंटाळा येत नाही. उलट मुरलेल्या लोणच्याप्रमाणे त्यांची लज्जत वाढतच जाते.

या अशा खास पुस्तकांत पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके आहेत काही मला बक्षीस मिळालेली व काही मी विकत घेतलेली. ही सर्व पुस्तके मी न कंटाळता कितीदा तरी वाचलेली आहेत कारण पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत. माझेच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. कला, कल्पना आणि विनोद यांचा त्रिवेणी संगम म्हणजे पुलंचे व्यक्तिमत्व होय.

अगदी सुरवातीला माझ्या वाचनात आले पु. ल चे ‘खोगीरभरती’ आणि ‘नस्ती उठाठेव’ हे विनोदी लेखसंग्रह पुलंची पुस्तके वाचत असता काहीतरी वेगळच आपण वाचत असतो असा मला अनुभव आला. त्यांच्या ‘वय मोठं खोटं’ ही नाटुकली पहात असताना त्यांच्या प्रतिभेची ओळख पटली. हळुहळू असेही कळले की ज्या ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर शाळेतील कार्यक्रमात नाच केला त्या गाण्याची चाल पुलंनीच दिलेली आहे आणि ‘गुळाचा गणपत्ती’ हा चित्रपट तर ‘सबकुछ पुलं’ आहे. नंतर वाचनात आली पु. ल ची ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘गणगोत’ ही पुस्तके तेव्हा लक्षात आले की पुलं केवळ विनोदीच लिहित नसून उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतात. या व्यक्तिचित्रणांत शाब्दिक कोट्या, प्रसंगाधिष्ठित विनोद आहे. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करुन जातो.

पु. ल. ची ‘तुझे आहे तुजपाशी’ ‘अंमलदार’ ‘ती फुलराणी’ ही नाटके पाहिली. पण ‘बटाट्याची चाळ’ ‘वाऱ्यावरची वरात’ ‘असा मी असामी’ हे एकपात्री प्रयोग पाहायची संधी मिळाली नाही कारण पु. ल नी नव्हे त्यांच्या मृत्यूने ते प्रयोग आता थांबवले आहेत. पु. ल. ची पुस्तके बाजूला ठेवली तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची ‘नारायणगिरी’ विसरत नाही. .

पुलंनी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्किल, खुशखुशीत भाषेत शब्दरुपांनाही आणला अपूर्वाई, पूर्वरंग, बंगदेश ही पुस्तके मराठी साहित्यातील अजरामर स्थलवर्णने आहेत. पुलंनी अनेक पुस्तकातील प्रस्तावना लिहिल्या. त्या आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात.

हास्य हे माणसामाणसाच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती ह्या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. असा हा लेखक महाराष्ट्राचा महान अष्टपैलू असून माझा आवडता लेखक आहे.

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध – Maza Avadta Lekhak Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply