परिचारिका निबंध मराठी – Paricharika Nibandh Marathi

आमच्या इमारतीत एक परिचारिकाबाई राहातात. त्या माझ्या मैत्रिणीच्या आत्या आहेत. ती त्यांना गीता आत्या असे म्हणते. त्या आमच्या इथल्याच सीताराम रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात.

त्या खूपच चांगल्या आहेत. एकदा मी माझ्या मैत्रिणीसोबत त्यांच्या रूग्णालयात गेले होते तेव्हा त्या किती महत्वाचे काम करतात ते मला समजले. त्या तिथल्या मुख्य परिचारिका आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्या परिचारिकांवर लक्ष ठेवावे लागते. प्रत्येक रूग्णाची नीट देखभाल होत आहे की नाही? त्याला औषधपाणी व्यवस्थित मिळते आहे की नाही? हे पहावे लागते. आम्ही गेलो तेव्हा नेमका एक अपघाताचा रुग्ण आला होता. त्या वेळेस डॉक्टर येईपर्यंत गीता आत्यांची नुसती धावपळ उडाली होती.

त्यांनी त्याला ताबडतोब सलाईन लावले, त्याच्या जखमांना ऍण्टिसेप्टिक लावून त्या स्वच्छ केल्या. त्याचा रक्तदाब पाहून घेतला मग दहा पंधरा मिनिटांनी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा कुठे त्यांची धावपळ कमी झाली. गीता आत्यांचे काम पाहून मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटला. ब-याच रूग्णांचे नातेवाईक त्यांच्यापाशी येऊन त्यांचे आभार मानत होते, त्यांना मनातल्या शंका विचारत होते. आणि गीता आत्या त्यांना अगदी व्यवस्थित, शांतपणे आणि हसतमुखाने उत्तर देत होत्या. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांच्या चेह-यावरील ताण कमी होत होता.

रूग्णांचा संबंध डॉक्टरांसोबत परिचारिकेशीसुद्धा येतो. त्यामुळे गीता आत्यांचा सर्व रूग्णांना आधार वाटतो. मध्यंतरी आमच्या सोसायटीतील रानडे आजोबांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्या मदतीस धावून गेल्या होत्या आणि त्यामुळेच त्या आजोबांचे प्राण वाचले होते.

मला त्यांच्याबद्दल वाटणारा आदर आणखीनच वाढला आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply