नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी
शाळेतून हल्लीच आम्हाला नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात आले होते. त्या वेळेस तिथे आम्ही जे कार्यक्रम पाहिले त्यामुळे माझी मतीच गुंग झाली. पुस्तकात वाचून जे आम्हाला समजले नसते ते आम्हाला तिथे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
तिथल्या मार्गदर्शकांनी नेहरू तारांगणाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. हे तारांगण ३ मार्च, १९७७ रोजी स्थापन करण्यात आले. लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी आणि मनोरंजनातून ज्ञान मिळावे हा त्यामागील हेतू होता.
खरोखरच खगोलशास्त्राबद्दलचा एक सुखद अनुभव आम्हाला तिथे मिळाला. तिथे सूर्यमालेवर एक कार्यक्रम होता. तो पाहायला बसलो तेव्हा मला खूपच गंमत वाटली. आकाशाच्या गोल घुमटासारखा बांधलेला तिथला रंगमंच आगळावेगळाच आहे. खुर्त्या पूर्ण मागे सरकवून आडव्या करण्याची सोय असल्यामुळे जवळजवळ आडवेच होऊन त्या घुमटाकृती रंगमंचावर चाललेली अद्भुत दृश्ये पाहाता येतात. सगळीकडे संपूर्ण अंधार असतो. त्यामुळे भर दुपारी देखील आपण रात्रीचे आकाश पाहू शकतो.
आपली सूर्यमाला, ग्रह, सप्तर्षांचा तारकासमूह आणि आकाशगंगा पाहून मी चकीतच झालो. नंतर हेलेच्या धुमकेतूवरचा माहितीपटही पाहिला. दर ७५-७६ वर्षांनी दिसणारा हा धुमकेतू १९८६ साली दिसला होता. ह्यापुढे तो २०६१ साली दिसेल. ते पाहून मला खगोलशास्त्र एवढे मनोरंजक वाटले म्हणून सांगू? असं वाटलं की मोठेपणी आपण खगोलशास्त्र ह्याच विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि कल्पना चावलासारखं अंतराळवीर व्हावे.
कार्यक्रम संपल्यावर आम्हाला बाहेरच्या दालनात नेण्यात आले. मार्गदर्शक आम्हाला इतरही माहिती सांगू लागले. ते म्हणाले की खगोलशास्त्रावरील एक वैज्ञानिक केंद्र म्हणून ह्या तारांगणाला मान्यता मिळाली आहे. अनेक खगोलशास्त्रज्ञ येथे चर्चासाठी आणि परिषदांसाठी येतात. सूर्यग्रहणासारखी महत्वाची खगोलीय घटना घडणार असेल तर त्या वेळीही इथे व्याख्याने आयोजत केली जातात.
ह्या सर्व कार्यक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा असल्यामुळे येथे खगोल शास्त्रविषयक स्पर्धा घेतल्या जातात. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि अशाच घटना पाहाण्याची, त्यांचे फोटो काढण्याची सोय तिथे केली जाते. त्याशिवाय तारांगणाच्या आवारात शक्तिशाली दुर्बिणीसुद्धा बसवल्या आहेत.
मला स्वतःला शनीभोवती असलेली कडी आणि गुरूचे बारा चंद्र पाहाण्याची खूप इच्छा होती. ती माझी इच्छा तिथे पूर्ण झाली म्हणून मी खूपच आनंदलो. वर्गातील सर्वच मुलांना खूप मजा वाटत होती. आता यंदा दिवाळीच्या सुट्टीत मी आईबाबांना घेऊन नेहरू तारांगणात जाणार आहे.
पुढे वाचा:
- निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी
- निसर्ग माझा मित्र निबंध मराठी
- नियमितपणाचे महत्व निबंध मराठी
- नारळी पौर्णिमा विषयी निबंध
- नागपंचमी निबंध मराठी
- नव्या युगाचे मागणे निबंध मराठी
- नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन
- नदीची कैफियत निबंध मराठी
- नदीची आत्मकथा मराठी निबंध
- नको हा मेला पोरीचा जन्म निबंध मराठी
- नंदीबैल निबंध मराठी
- ध्वनी प्रदूषण निबंध मराठी
- मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी
- दूरदर्शनचे फायदे व तोटे
- दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
- दूरचित्रवाणी निबंध मराठी
- दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
- दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी