Set 1: नदीची आत्मकथा मराठी निबंध – Nadichi Atmakatha Marathi Nibandh

मी आहे भीमा नदी. मी महाराष्ट्रातल्या भीमाशंकर ह्या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते बरे का? तिथेच भीमाशंकराचे देऊळ आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देऊळ आहे. मी तिथे उगम पावते म्हणुनच तेथील शिवशंकराला भीमाशंकर असे नाव मिळाले. माझ्या उगमाच्या ठिकाणी मी अगदी अवखळ असते. एखादी लहान मुलगी असावी ना तशी उत्साहाने खळखळत मी भीमाशंकरावरून धावत सुटते. सह्याद्रीच्या कड्यांवरून अनेक धबधबे आणि ओढे एकत्र येतात. त्या सर्वांचे प्रवाह एकत्र येऊन मला भीमा हे माझे नाव मिळते.

नदीला लोकमाता म्हणतात. मीही लोकमाताच आहे. माझ्या काठावरची हिरवाई फुलवत फुलवत मी पुढे जात असते. मी सतत वाहाती असते त्यामुळेच मी निर्मळ असते. वाटेत मला माझ्या पुष्कळ सख्या येऊन मिळतात. त्यांनाच तुम्ही लोक माझ्या उपनद्या म्हणता. ह्या माझ्या सख्या कोण आहेत ते सांगू का? त्या आहेत घोड, सीना, कागिनी, भामा, मुळा, मुठा, नीरा आणि इंद्रायणी. ह्या सगळ्या जणींना माझ्या पोटात मी सामावून घेते आणि तिथून पुढे जाऊन मी स्वतःच कृष्णेला मिळते.

माझ्यावर आणि माझ्या उपनद्यांवर भरपूर ठिकाणी धरणे बांधून मानवाने आमचे पाणी अडवले आहे आणि त्यावर जलविद्युत प्रकल्प काढलेले आहेत. त्यामुळे माझ्या काठावरच्या गावात वीज आली आहे. उद्योगधंद्यांनाही वीज त्यामुळेच मिळाली आहे.

ह्या उद्योगधंद्यातील सांडपाण्यामुळे माझ्या पाण्याचे प्रदूषण होते. त्याशिवाय साखर कारखान्यातील मळीसुद्धा माझ्याच पाण्यात सोडली जाते. त्यामुळे माझ्या उदरातील मत्स्यजीवन धोक्यात येते आहे. माझ्या काठच्या वाळूचा अंदाधुंद उपसा झाल्यामुळे माझ्या काठावरची जमीन खचते आहे.

माझी काळजी वेळीच घ्या असे तुम्हाला ह्या तुमच्या मातेचे कळकळीचे सांगणे आहे.

Set 2: नदीची आत्मकथा मराठी निबंध – Nadichi Atmakatha Marathi Nibandh

मुलांनो, मला ओळखलेत का? अरे, मी तुमच्या गावाच्या मध्यातून वाहणारी नदी. तुमच्या गावाजवळच्याच पर्वतात माझा जन्म झाला. मी एक खूप जुनी नदी आहे. माझे बालपण या पर्वताच्या हिरव्यागार वनराईत आणि दऱ्याखोऱ्यात गेले. अनेक लहान-लहान टेकड्या आणि जंगले पार करीत मी येथपर्यंत येऊन पोहोचले. डोंगरातून वाहताना माझ्या पाण्याला अतिशय वेग असतो आणि पाण्याचा खळ-खळ असा आवाज येतो. खाली उतरून मैदानी प्रदेशात वहायला लागल्यानंतर मात्र मी शांतपणे वाहू लागले.

माझ्या किनाऱ्यावर अनेक गावे व शहरे वसलेली आहेत. मी सर्वांनाच पाणी देते. लहान-मोठा गरीब-श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. माझ्या पाण्याचा उपयोग किती विविध कारणांसाठी केला जातो! पिण्याचे पाणी, शेती, सिंचन, धरणे, विद्युत निर्मिती. पशु-पक्षी माझेच पाणी पिऊन आपली तहान भागवतात. माझ्या पात्रात वाढणारे मासे अनेकांची भूक भागवतात. माझ्या दोन्ही किनाऱ्यांजवळ असणारी शेती कशी हिरवीगार असतो बघा. तुमच्या गावाजवळच माझ्या पात्रावर एक मोठे धरण बांधले आहे. तेथे निर्माण होणारी वीज आजूबाजुच्या १५-२० गावात प्रकाश आणते. अनेक कारखाने या वीजेवर चालतात.

वाहत रहाणे हा माझा धर्म आहे. शेवटी सागराला जाऊन मिळणे हेच माझे ध्येय आहे. मी लोकांना जीवनदान देते. म्हणूनच मला जीवनदायीनी, लोकमाता असे संबोधले जाते. पण तुम्ही माणसे अतिशय कृतघ्न आहात. गावातील सर्व कारखान्यातील घाण तुम्ही माझ्या पात्रात खुशाल सोडून देता. शहरातील घाण, मैला टाकला जातो. त्यामुळे माझे पाणी घाणेरडे व प्रदूषित झाले आहे. ते पिण्यासारखे राहीले नाही. मी आता पशु-पक्षांचीही तहान भागवू शकत नाही ही अतिशय दुःखाची बाब आहे. माझे स्वच्छ, सुंदर जीवन मला परत कधी मिळेल? माझ्या इतर बहिणींचीही हीच स्थिती आहे.

पाणी शुद्ध करण्याचे आश्वासन मला दरवर्षी मिळते. पण ते कधीच पूर्ण होत नाही. बांधकाम करुन तुम्ही माझे पात्र छोटे करुन टाकले आहे. त्यामुळे अर्थातच पावसाळयात मी फुगते आणि वाटेत आलेली प्रत्येक गोष्ट गिळंकृत करत सुटते. माझे हे रौद्र रुप पाहून तुम्ही घाबरता व मलाच दोष देता. पण मला असे बनविण्यात तुमचा मोठा हात आहे हे विसरुन जाता. माझी एवढीच इच्छा आहे की सर्वांना उपयोगी पडण्याचा माझा धर्म मला पार पाडता यावा. माझे पाणी स्वच्छ व निर्मळ असावे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर करणार ना मला प्रदूषण मुक्त?

नदीची आत्मकथा मराठी निबंध – Nadichi Atmakatha Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply