निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी

अतिपरिचयाने अवज्ञा होते,’ अशी थोरामोठ्यांची शिकवण आहे. त्याची प्रचीती आपण निसर्गाशी जी वागणूक करतो त्यातून येते. आपल्याभोवती असणारी सृष्टी म्हणजे माणसाला मिळालेले अमोल भांडार आहे, हे माणसाच्या लक्षातच येत नाही.

निसर्गाच्या भांडारात विविध वृक्ष येतात. हे वृक्ष त-हेत-हेची विविध रसदार फळे माणसाला देतात. आपल्या सुगंधाने आसमंत सुगंधित करणारी अनेक प्रकारची सुवासिक फुले माणसाला देतात. एवढेच नाही तर माणसांच्या अनेक आजारांवर हमखास रामबाण ठरणारी औषधे देखील हे वृक्ष देतात असे आयुर्वेद सांगतो. वृक्षांचे इतरही अनंत उपयोग आहेत.

भूमी ही माणसाला आधार देते, म्हणूनच तिला ‘धरणी’ म्हणतात. ही भूमाता माणसाचे सारे अपराध सहन करते, म्हणून तर ती ‘क्षमा’ ठरते. हीच भूमी आपल्या उदरात माणसासाठी कितीतरी अमोल गोष्टी सांभाळते. धरतीच्या उदरात कोळसा असतो, इतर अनेक खनिजे ती माणसाला देते. मौल्यवान रत्ने, माणकेही धरतीच्या उदरात सापडतात. धरतीने आपल्या उदरातील चांदी, सोने यांसारख्या मौल्यवान धातूंनी माणसाला सजवले आहे.

कधी सागर आपल्याजवळील रत्ने माणसाला देऊन आपले ‘रत्नाकर’ हे नाव सार्थ ठरवतो. सागराच्या ठायी मिळणारे ‘इंधन’ आज माणसाला रत्नापेक्षाही मौल्यवान वाटते. अशा अनेकविध प्रकारे निसर्ग माणसावर आपली दौलत मुक्तपणे उधळत असतो. माणसाला ते भांडार लुटायला त्याचे इवलेसे दोन हात अपुरेच पडतात.

पुढे वाचा:

Leave a Reply