साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी निबंध मराठी – Sadhi Rahani Ucch Vichar Essay in Marathi

सरळपणा आणि साधेपणा हेच सर्व सुखांचे मूळ आहे. ह्या उलट दांभिकता, बढाईखोरपणा, दुस-यावर कुरघोडी करण्याची वृत्ती हे सर्व दुःखांचे मूळ आहे. साधे जीवन जगल्यास जीवन आनंदी होते. मनात चांगले, सकारात्मक विचार येतात. त्यामुळे उत्साह आणि उर्जा वाढते. व्यक्ती सुखी आणि संतुष्ट बनते. आपले पूर्वज आपल्यापेक्षा सुखीच म्हणायचे कारण त्यांच्या गरजा कमी होत्या, निसर्गाच्या क्रमानेच त्यांचे जीवनही चालत होते. जीवनात सुखसुविधा कमी असतील परंतु शारीरिक कष्ट भरपूर केल्यामुळे आजारही फारसे वाट्याला येत नव्हते.

आज माणसे स्वतःच्या सुखासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करू लागली आहेत. चंगळवादी बनू लागली आहेत. जे सापडेल ते ओरबाडून घेण्याची वृत्ती वाढली आहे. ‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ हा उपदेश आता कुणाला पटेनासाच झाला आहे. आपण गांधीनेहरूंना विसरलो आहोत.

सध्याच्या आपल्या जीवनात एवढा असंतोष, गोंधळ, हाणामा-या, दगदग, धावपळ का आहे? एवढी ईर्ष्या, ताणतणाव, रोगराई आणि दुःख का आहे? हे सगळे आहे कारण आपण आपले सुख वस्तूंत पाहात आहोत. शेजारच्या माणसाने भली मोठी गाडी घेतली तर ती गाडी माझ्याकडे आलीच पाहिजे असा अट्टाहास माणसे करीत आहेत. सुखलोलुपता आणि हव्यासापायी माणूस हे विसरूनच गेला आहे की आपण मेल्यावर ह्यातील चार आणेसुद्धा सोबत घेऊन जाणार नाही. मागे काय राहील ते चांगले कर्म तेवढे राहील. परंतु आजच्या ह्या स्पर्धात्मक जगात जो तो धावत सुटला आहे आणि आपण कशासाठी एवढी उरस्फोड करीत आहोत हेच तो विसरून गेला आहे. त्यामुळे एवढ्या सुविधा हाताशी आहेत, एवढी उपकरणे हाताशी आहेत, एवढ्या सोयी मिळत आहेत तरी माणूस समाधानी कसा तो नाही. सुख हे आपल्या मनात असते. मनात सदैव मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुस-याला कसे फसवता येईल ह्यासारखे नकारात्मक विचारच येत असतील ते मन शांत राहाणार तरी कसे? मनशांत नाही म्हणून सुख नाही.

ह्यासाठीच आपल्या संतांनी सांगितले आहे की ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान.’ संत असेही म्हणतात की ‘ पुण्य पर उपकार, पाप हे परपीडा.’ मग आपण जर पापाचरण करीत असलो तर सुख लागणार कसे?

म्हणूनच ‘साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ हाच सुखाचा मूलमंत्र आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply