साक्षरतेची मोहीम निबंध मराठी – Sakshartechi Mohim Marathi Nibandh
सर्व शिक्षा अभियान सारे शिकूया, पुढे जाऊया
आपला भारत एक विकसनशील राष्ट्र आहे. उद्याची महासत्ता म्हणून काही लोक भारताचा उल्लेख करीत असले तरी आपल्या देशात अजूनही बऱ्याच मूलभूत समस्या शिल्लक आहेत. जोपर्यंत आपण त्या समस्या सोडवत नाही तोपर्यंत आपण महासत्ता ह्या बिरूदाच्या जवळपासही फिरकू शकणार नाही. निरक्षरता ही त्या समस्यांपैकी एक समस्या आहे. आजही भारतातील बहुतांश जनता अशिक्षित आहे. शिक्षणाअभावी माणसाची गत पशूसारखी होते. शिक्षण माणसाला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढते आणि ज्ञानाच्या प्रकाशात नेते.
अशिक्षित माणसाचा कशावरही पटकन विश्वास बसतो. तो अंधश्रद्धेला लौकर बळी पडतो. आपले स्वतःचे हित कशात आहे ते ओळखणे, विचार करणे, समजून घेणे हे सर्व करण्यासाठी लागणा-या मानसिक क्षमता त्याच्यात विकसित होत नाहीत. मागासलेपणाचा शिक्का बसल्यामुळे समाजात तो उपहासाचा विषय बनतो. लफंगे लोक अशा माणसाचा गैरफायदा घेऊन त्याला आर्थिक गंडाही घालतात.
साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी आपल्या देशात कित्येक देशभक्तांनी खस्ता खाल्ल्या. राजा राममोहन रॉय, पंडित मदन मोहन मालवीय, महात्मा गांधी, विष्णुशास्त्री चिपळूणकर आदी श्रेष्ठ लोकांनी साक्षरताप्रसारासाठी जीवाचे रान केले तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे आदी महान लोकांनी स्त्रीशिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या.
स्वातंत्र्योत्तर काळात परिस्थिती पालटण्याचा खूप प्रयत्न झाला. राज्यघटनेने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्कांत सामील केला. त्यामुळे सरकारनेही प्राथमिक शिक्षणावर भर दिला. भविष्यात येणारी पिढी सुशिक्षित व्हावी हा विचार त्यामागे होता. ह्या धोरणामुळे देशात साक्षरांची संख्या नक्कीच वाढली. १९५१ साली आपल्या देशातील अधिकांश जनता निरक्षर होती. केवळ १८.७७ टक्के लोकच देशभरात साक्षर होते. परंतु २०११ सालच्या जनगणनेनुसार हाच दर ७४.०४ टक्के झाला आहे. केरळ राज्यात हा दर सर्वात जास्त म्हणजे ९३.९१ टक्के आहे तर बिहार राज्यात तो सर्वात कमी म्हणजे ६३.८२ टक्के आहे.
सरकारने प्रौढ शिक्षणासाठी रात्रशाळाही उघडल्या आहेत. शाळेत जाऊन शिकण्याचे ज्यांचे वय नसते अशा लोकांना प्राथमिक शाळेत जाऊन शिकायला संकोच वाटतो. तसेच दिवसा नोकरीव्यवसाय करून पैसे कमवावे लागत असल्यामुळे ते शाळेत जाऊ शकत नाहीत. अशा लोकांना घराजवळच्या रात्रशाळेत शिकता येते आणि आपल्या जीवनाचा स्तर उंचावण्याची संधी मिळते.
पालकांनी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शाळेत पाठवले पाहिजे. सुशिक्षित मातापिता शिक्षणाचे महत्व जाणतात, शिकलेली आई आपल्या मुलांचे पालनपोषण चांगले करू शकते. त्यांच्या भविष्याबद्दल जागरूक राहाते. शिक्षणाचे पहिले संस्कार आईबापांकडूनच घडतात म्हणून साक्षरतेची मोहीम आपण राबवत आहोत.
पुढे वाचा:
- साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी
- सहशिक्षण निबंध मराठी
- सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध
- विदुषक मराठी निबंध
- मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी
- डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी
- समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध
- समता हवी निबंध मराठी
- सत्संगती मराठी निबंध
- सत्यमेव जयते मराठी निबंध
- माझे शेजारी मराठी निबंध
- संस्कृतीचे समाजावरील परिणाम निबंध मराठी