मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध – Mi Pahileli Circus Marathi Nibandh
Table of Contents
मी काल संध्याकाळी सर्कसला गेलो होतो. किती मज्जा आली सर्कस पाहाताना, म्हणून सांगू? तिथं माकडाला सायकल चालवताना पाहिलं, वाघ-सिंहांना रिंगमास्टरच्या इशा-यावर कोलांट्या उड्या मारताना पाहिलं, अगडबंब हत्तीला स्टुलावर उभं राहिलेलं पाहिलं. घोडे आणि झेब्रे रिंगणात येऊन धावले काय, दोन पायांवर नाचले काय? त्याशिवाय बुटुकबैंगण विदुषकांनीसुद्धा आम्हाला नाना चेष्टा करून हसवलं.
ते एकमेकांना धक्का देऊन पाडायचे. मागून येऊन एकमेकांच्या कानात ओरडून दचकवायचे. त्यांची गंमत पाहून लहान मुलं खूपच खिदळत होती. त्याशिवाय कसरतपटूंनी झोपाळ्यावरचे कसरतीचे प्रकार एवढ्या कौशल्यानं केले की काही विचारूच नका. हातात खंडीभर बशा घेऊन त्यातली एकही खाली न पाडता आकाशात फेकायची म्हणजे खायचं काम नाही महाराजा. अशा खूप गंमतीजमती पाहून आम्ही सर्कशीहून परत आलो. शिवाय तिथे मध्यंतरात बाबांनी आम्हाला बटाटेवडा आणि आईस्क्रीमसुद्धा दिले.
परत आल्यावर मी आजोबांना म्हटले की आजोबा, सर्कस हा प्रकार कसा आला असेल? त्यावर आजोबा म्हणाले की लोकांना जिवंत पशूपक्षी पाहायला खूप आवडतात. पण ते जंगलात जाऊन कसे पाहाणार? शिवाय जंगलात गेले तरी ते दिसतीलच ह्याची काय हमी? म्हणून मग डोकेबाज माणसाने प्राण्यांच्या पिल्लांना पाळायला सुरूवात केली.
माणसांची सवय झाल्याने ती पिल्ले माणसाळू लागली. त्यांना खायलाप्यायलाही माणूस देत असल्यामुळे वाघसिंहाच्या छाव्यांना नैसर्गिकपणे शिकार करणे म्हणजे काय हेसुद्धा माहिती नाहीसे झाले. मग काय? शाळेतल्या शिक्षकांप्रमाणे रिंगमास्टर त्या पिल्लांना लहानपणापासूनच सगळे खेळ शिकवू लागले. आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे ही पिल्लेही सगळे शिकू लागली. आज्ञापालन केले की खाऊ मिळतो आणि ऐकले नाही की चाबूक मिळतो हे त्या पिल्लांनाही उमजू लागले. कसरतपटूंनाही खूप लहान वयातच ह्या कसरती शिकाव्या लागतात कारण तेव्हा शरीर लवचिक असते.
ते ऐकून मी विचार करू लागलो की सर्कसमध्ये किती प्रकारचे त्रास आहेत. त्यात जंगलातील प्राण्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घातलेला आहेच शिवाय माणसाच्या मुलांनाही खूप लहान वयात सर्कशीत घातल्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच सगळी बंधने घातली जातात. त्यांचे नेहमीचे शिक्षण होत नाहीच पण सर्कस जिथे जिथे जाईल तिथे तिथे गावोगाव फिरावे लागते. त्यामुळे शाळेत जाणे हे स्वप्नच ठरते.
शिवाय हल्ली लोकांना टीव्ही, चित्रपट, व्हिडिओ गेम ह्या रूपात मनोरंजन मिळू लागल्यामुळे सर्कशीची मागणीही कमी होऊ लागली आहे.
म्हणूनच सर्कस हा प्रकार हळूहळू कालबाह्य होईल ह्यात काहीच शंका नाही.
सर्कस निबंध मराठी – Circus Marathi Nibandh
आमच्या गावात सर्कस आली की बाबा मला नेहमी सर्कशीला नेतात. मला सर्कस खूप आवडते. सर्कशीत हत्ती, घोडे, वाघ, सिंह, पाणघोडा, माकडे असे बरेच प्राणी असतात.
सर्कशीतला हत्ती स्टुलावर बसतो, वाघ आणि सिंहसुद्धा रिंगमास्टर सांगतात तसे ऐकतात आणि उड्या मारतात. ते पाहून मी तर तोंडात बोटच घालतो. माकड जेव्हा धावत्या घोड्यावर बसते आणि सायकल चालवते तेव्हा तर मला खूपच गंमत वाटते.
सर्कशीत वेगवेगळे कसरतपटूही असतात. ते एका सायकलवर तीन ते चार जण बसतात. त्याशिवाय धावत्या सायकलवर ते शीर्षासनही करतात. कधीकधी एक माणूस एकाच वेळी पंधरावीस बशा हवेत उडवतो आणि त्याची एकही बशी जमिनीवर पडत नाही.
सर्कशीतले झोपाळेसुद्धा खूपच छान असतात. एका झोपाळ्याला लटकून पार दुस-या झोपाळ्यापर्यंत जाणे हे काही खायचे काम नाही. कधीकधी विदुषकही त्या झोपाळ्यावर चढतो आणि घसरून खाली पडतो तेव्हा सगळेजण खूप हसतात.
सर्कशीतला विदुषक हा आम्हा सर्व लहान मुलांचा आवडता असतो. वात्रट मुलांसारखा दंगा करून तो आम्हाला हसवतो. म्हणूनच दर वर्षी गावात सर्कस आली की बाबा आम्हाला पुढच्या रांगेतली तिकिटे काढून ती दाखवायला नेतात.
सर्कस वर मराठी निबंध – Essay on Circus in Marathi
सर्कस हे मनोरंजनाचे खूपच चांगले साधन आहे. ती पाहिल्यामुळे ज्ञान मिळते व करमणूकही होते. आमच्या गावात मागील वर्षी ‘ग्रेट इंडिया सर्कस’ आली होती. त्यावेळी मला मोठ्या भावाबरोबर सर्कसला जाण्याची संधी मिळाली. आम्ही आधीच तिकिटे काढून ठेवली होती. रविवारचा दिवस होता. आम्ही वेळेपूर्वीच तिथे पोहोचलो. सर्कसचा तंबू खूपच मोठा होता. त्याशिवाय इतर बरेच लहान मोठे तंबू होते. मुख्य प्रवेशद्वारावर फार गडबड होती. मोठमोठे पोस्टर्स बाहेर लावलेले होते. त्यात सर्कसमधील विविध दृश्ये चित्रित केलेली होती. रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांच्या माळा लावलेल्या होत्या. त्यामुळे सगळीकडे झगमग प्रकाश पसरला होता. लाऊडस्पीकरवर गीते लावली होती.
आम्ही आत गेल्यावर पाहिले की तिथे खूप गर्दी होती. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलऱ्या केलेल्या होत्या. तसेच खुा पण होत्या. आम्ही सर्व जण समोरच्या खुर्त्यांवर बसलो. लवकरच सर्कस सुरू झाली आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन सर्कस पाहू लागले. सर्वात आधी दोन जोकर आले. एक जोकर खूप उंच होता आणि दुसरा बुटका. दोघांनी आपल्या मस्कऱ्यांनी, विनोदांनी लोकांना हसविले. त्यानंतर हत्ती, अस्वल, घोडे वगैरे जनावरांनी कसरती करून दाखविल्या. प्रत्येक कसरतीनंतर प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते. झोक्यावरील कसरतपटू मुले-मुली आपले प्राण धोक्यात घालून आश्चर्यकारक कसरती करून दाखवीत होते. एका माणसाने चार मोठे चेंडू एकदम वर फेकून व एकही चेंडू खाली न पाडता अनेक कसरती केल्या. अशाच प्रकारचे आणखी काही कार्यक्रम होते.
कित्येक मुलींनी एकमेकीवर उभे राहून एक खूप उंच पिरॅमिड बनविले, मग सायकलीवरच्या कसरती करून दाखविल्या. एक चाकी सायकलवर केलेल्या कसरती मनोरंजक होत्या. वाघांचा कार्यक्रम तर अद्भुतच होता. रिंगमास्तरने सात वाघांबरोबर कसरत करून दाखविली. त्यांना रिंगणाला फेरी मारावयास लावली, स्टुलावर उभे केले, फळीवर चालावयास लावले. मला तर त्यावेळी भीती वाटली. रिंग मास्तरने वाघाबरोबर कुस्ती केली. ती पाहून मजा वाटली. मध्येच रिंग मास्तर वाघाजवळ जाऊन त्याला कुरवाळायचा. कितीदा तरी मनात विचार आला रिंग मास्तरने या रानटी जनावरांना प्रशिक्षण कसे दिले असेल? कोणते उपाय योजले असतील? ते क्रूर असतील का?
टी. व्ही. चित्रपट या प्रसार माध्यमांनी सर्कसची लोकप्रियता कमी केली आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. लोकांची वन्यपशुंबद्दलची जागरूकता वाढली आहे. या लोकांना जनावरांचे शोषण करणे पसंत माणसांचीच सर्कस असेल तर किती छान होईल.
सर्कशीतील गमतीजमती मराठी निबंध – Sarkashitil Gamti Jamti Marathi Nibandh
एकदा आमच्या गावात सर्कस आली होती. एक दिवस आमचे काका आम्हाला संध्याकाळच्या खेळाला घेऊन गेले होते. आम्ही त्या सर्कशीच्या पटांगणावर गेलो. सर्कशीचा तंबू खूप मोठा होता. आतून . वाघाचा, हत्तीचा, सिंहाचा आवाज येत होता. तंबूत एका बाजूला बॅण्डवाले बसले होते. समोर एक सुंदर पडदा लावला होता. आमची तिकिटे अगदी पुढच्या रांगेतील होती. बॅण्ड सुरू झाला. लगेच आतून ऐटबाज . पोशाख घातलेला एक घोडेस्वार दौडत बाहेर आला. त्याने रिंगणात एक चक्कर मारली व सलामी देऊन आत निघून गेला.
नंतर हत्ती, घोडे यांची कामे सुरू झाली, ती आम्ही पाहिली. छोट्या मुली-मुले यांची कसरत पाहिली. विदूषकांनी तर खूपच धमाल केली. त्यांनी चित्रविचित्र ड्रेस घातलेला होता. त्यांची तोंडेही विचित्र केली होती व ते सतत वेड्यावाकड्या उड्या मारत होते. त्यांनी आम्हांला खूप हसविले.
ह्यानंतर थोड्या वेळाने रिंगमास्तर चाबूक घेऊन रिंगणात आला. रिंगभोवती उंच जाळ्या उभ्या केल्या होत्या. पिंजऱ्यातून दोन वाघांना रिंगणांत आणून सोडले. रिंगमास्तरने वाघांकडून खूप चांगले काम करून घेतले. ते बघताना भीती वाटत होती. परत मोठ्या- मुली मुलांची कसरतीची कामे झाल्यावर सर्कस संपली. नंतर आम्ही आनंद लुटत घरी आलो.
पुढे वाचा:
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी
- डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी
- समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध
- समता हवी निबंध मराठी
- सत्संगती मराठी निबंध
- सत्यमेव जयते मराठी निबंध
- माझे शेजारी मराठी निबंध
- संस्कृतीचे समाजावरील परिणाम निबंध मराठी
- रम्य संध्याकाळ मराठी निंबध
- संत ज्ञानेश्वर मराठी निबंध
- संगणक शाप की वरदान मराठी निबंध
- संगणक वर मराठी निबंध
- श्रावणातील गमती जमती निबंध मराठी