डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी – Sir C V Raman Essay in Marathi

सर सी. व्ही रामन किंवा चंद्रशेखर व्यंकट रामन हे भारतातील एक थोर शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर, १८८८ रोजी तिरूचिरापल्ली येथे झाला. लहान असल्यापासूनच त्यांना अभ्यासाची खूप आवड होती. त्यांचे वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडूनच लहानग्या चंद्रशेखरला प्रेरणा आणि उत्तेजन मिळाले. रामन ह्यांनी १९०४ साली मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजातून बीएची पदवी मिळवली आणि १९०७ साली भौतिकशास्त्रात एमएची पदवी मिळवली. खरंतर बीए झाल्यावर त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे होते परंतु तब्येत चांगली नसल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. विद्यार्थीजीवनातच त्यांनी भौतिकशास्त्रात नवनवीन संशोधन केले होते. प्रकाशलहरींवरील त्यांचा शोधप्रबंध १९०६ साली प्रसिद्ध झाला.

१९०७ साली ते सरकारी नोकरीनिमित्त कलकत्ता येथे गेले. तिथे त्यांची भौतिक शास्त्रज्ञ आशुतोष मुखर्जी ह्यांच्याशी ओळख झाली. त्यांची भौतकविज्ञानाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून १९१७ साली त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९२१ मध्ये ते युरोपच्या दौ-यावर गेले. तेव्हा त्यांच्या ज्ञानाने पाश्चात्य जगत खूपच प्रभावित झाले. १९२७ साली त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ चे सदस्यत्व देण्यात आलेच परंतु त्यांनी प्रकाशाविषयी जे संशोधन केले त्याबद्दल त्यांना १९३० साली भौतिकविज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले तर हा त्यांचा आणि भारत देशाचा सर्वोच्च सन्मान होता असे म्हणायला हरकत नाही. प्रकाशकिरण पारदर्शक माध्यमातून पाठवले प्रकाशाच्या गुणधर्मात बदल होतो ह्या विषयावर त्यांनी संशोधन केले होते. त्या संशोधनामुळे पदार्थाची आण्विक संरचना समजणे सोपे झाले. त्याशिवाय लेसर किरणांच्या शोधामुळे तर रामन इफेक्टचे महत्व आणखीच वाढले आहे.

१९४८ साली बंगलोरजवळ त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्युट काढली. ह्या संस्थेत ते मरेपर्यंत प्रयोग करीत राहिले. सी.व्ही. रामन ह्यांना दीर्घायुष्य लाभले. ते १९७० साली वयाच्या ८२ व्या वर्षी निधन पावले परंतु भारताने १९५८ सालीच भारतरत्न ही सर्वोच्च पदवी देऊन ह्या ज्ञानवंताचा सत्कार केला होता.

सर सी.व्ही. रामन हे एक व्यक्ती म्हणूनही मोठे होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरोखर एवढा मोठा शास्त्रज्ञ आपल्या देशात जन्माला आला हे आपले सर्वांचे भाग्यच म्हटले पाहिजे.

डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी – Sir C V Raman Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply