सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध – Jim Corbett Abhyaran Nibandh Marathi

माझे बाबा बँकेत नोकरी करीत असल्याने आम्हाला दर दोन वर्षांनी बँकेकडून प्रवास सवलत भत्ता मिळतो. त्यामुळे आम्ही दर दोन वर्षांनी एक मोठी सहल काढतो. ह्या ही वर्षी आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यात पर्यटनाला गेलो होतो.

हे संरक्षित क्षेत्र असल्यामुळे इथे प्लास्टीकच्या वापरास बंदी आहे तसेच मोठोमोठ्याने आवाज करण्यासही बंदी आहे. आम्ही नैनितालहून जिम कॉर्बेट अभयारण्याकडे मोटारीने येताना वाटेत एवढी गर्द झाडी लागली की ती पाहता पाहाता आमचे डोळे अगदी निवून गेले. शिवाय डोंगरद-यांची वळणावळणाची वाट असल्यामुळे खालच्या दरीत पुष्कळ धुके साठले होते. ते पाहून आम्ही कुठल्यातरी आभासी दुनियेची सफर तर करीत नाही ना असे आम्हाला वाटले. जिम कॉर्बेट अभयारण्य कोसी नदीच्या काठावर वसलेले आहे. ही कोसी नदी नेपाळमधून भारतात वाहात येते.

जिम कॉर्बेट हा एक ब्रिटिश शिकारी आणि निसर्गप्रेमी होता. कुमाऊ जिल्ह्यातील लोकांना सळो की पळो करून सोडणा-या नरभक्षक वाघाला त्यानेच ठार मारले. परंतु तो केवळ शिकारीच नव्हता. जंगलांचे संवर्धन केले पाहिजे ह्यासाठी त्याने भरपूर काम केले. त्याच्या स्मरणार्थ ह्या अभयारण्याला त्याचे नाव देण्यात आले आहे.

भारतातील हे सर्वात जुने अभयारण्य असून १९३५ साली त्याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. मुळात अतिशिकारीमुळे बंगाली वाघाची जातच जगातून नामशेष होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. तसे होऊ नये म्हणून ह्या अभयारण्यात वाघांचे संवर्धन केले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर तर आपण ताडोबा, कान्हा, पेच, रणथंबोर, नागझरी अशा अनेक ठिकाणी अभयारण्ये उभारली आहेत आणि वाघाच्या शिकारीवर तर बंदीच घातली आहे.

आम्ही ह्या अभयारण्यातील जंगल लॉजवर उतरलो होतो. अगदी छान कॉटेजेस आहेत तिथे. त्यातल्याच एका कॉटेजवर आम्ही राहिलो. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझा भाऊ कोसी नदीच्या किना-यावर खेळायला गेलो. दुस-या दिवशी सकाळी आम्ही हत्तीवर बसून फेरफटका मारला. तेव्हा गर्द जंगलाचा इतका सुंदर वास येत होता म्हणून सांगू? आम्हाला मोर, हरणे, सांबर, रानम्हशी असे पुष्कळ प्राणी दिसले. वाघ दिसला नाही परंतु एवढी हरणे असल्यामुळे वाघ तिथे कुठेतरी नक्कीच असणार.

त्यातच आमच्या हत्तीच्या माहुताने सांगितले की रात्रीच्या वेळेस तिथे कोसी नदीवर पाणी प्यायला वाघ येतो. म्हणजे आम्ही खेळायला गेलो होतो तिथेच की? ते कळल्यामुळे आम्ही थोडेसे घाबरलो. परंतु माहुत म्हणाला की तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत आलात ना इकडे, मे महिन्याच्या सुट्टीत जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही म्हणून वाघ तेव्हा बरेचदा दिसतो. ह्या वेळेस दिसला तर तुमचे नशीब.

तिथे एवढे पक्षी होते वेगवेगळे की काही विचारूच नका. त्याशिवाय, मुंग्यांची भलीमोठी वारूळंही आम्ही तिथेच पाहिली. संध्याकाळी आम्ही जीपमधून सफारी केली तेव्हा आम्हाला वेगळ्या भागात नेले होते. जंगलातली किर्र झाडी आणि मधुनच असलेल्या आमच्या पक्क्या वाटा पाहून जुन्या काळी लोक कसे राहात असतील ह्याचा प्रश्नच पडला.

हे सुंदर अभयारण्य सोडून कुठे जाण्यासाठी आमचा पायच निघत नव्हता. परंतु शेवटी निघावे तर लागलेच. परत पुढल्या वर्षी दुस-या कुठल्यातरी अभयारण्याला भेट द्यायची असे ठरवूनच आम्ही तिथून निघालो.

सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply