माझे शेजारी मराठी निबंध – Essay on My Neighbour in Marathi
Table of Contents
‘शेजाऱ्यांवर प्रेम करा’ असे कोणी संत म्हणाले होते. आम्हाला दोन शेजारी आहेत.
दोघेही प्रेमळ व प्रामाणिक आहेत. आमची आई घरात नसली की आम्हाला शेजाऱ्यांचे घर म्हणजे आमचेच वाटते. आमचे शेजारी आम्हाला मदत करायला नेहमी तयार असतात. त्यांना गरज पडली की आम्हीही त्यांना मदत करतो. आम्ही सर्वजण एकोप्याने राहतो.
त्यांच्याकडे ईद, नाताळ असला की आमच्याच घरी हे सण आहेत असेत वाटते. गणपती उत्सवात ते दोन्ही परिवार आमच्याकडेच असतात. सर्व कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतात.
त्यांची दोन्ही मुले आणि मी नेहमी एकत्र खेळतो. आमचे जरी भांडण झाले तरी काका आमच्यावर रागावत नाहीत. उलट आम्हाला समजावून सांगतात. आमचे शेजारी खूपच चांगले आहेत.
सख्खे शेजारी मराठी निबंध – My Neighbour Essay in Marathi
आमच्या शेजारी रावकाका राहायचे. मी त्यांच्याकडे लहानपणी रोजच जात असे. सकाळी उठले की हातात दुधाचा पेला घेऊन त्यांच्याकडेच जायचे. मग रावकाकी मला त्या दुधाची कॉफी करून द्यायच्या. मग त्यांच्याकडे मी खेळत, गप्पा मारीत बसत असे. मला आंघोळीसाठी बोलवायला आई येईपर्यंत माझा हा क्रम चालत असे.
त्यांच्याकडे जायला मला आवडायचे कारण तिथे माझे खूप लाड होत. त्यांच्याकडे लहान मूल कुणी नसल्यामुळे ती मंडळी माझ्याशी गप्पा मारत, खेळत. रावकाका मला महाभारतातल्या गोष्टी सांगत. ते सांगत ती बकासुराची गोष्ट तर मला खूपच आवडत असे. ती गोष्ट मला सांगा असा हट्ट मी पुन्हा पुन्हा धरत असे.
परंतु काही काळाने आम्ही ती जागा सोडली आणि आमचा तो प्रेमळ शेजारही हरपला. आम्ही नव्या आणि मोठ्या जागेत राहायला आलो खरे परंतु इथे आम्हाला प्रेमळ शेजार लाभला नाही. हा शेजार बेरकी होता, स्वार्थी होता. सतत आमच्याकडे वस्तू मागण्याची सवय त्याला होती. परंतु आम्हाला कधी काही लागले तर मात्र ते त्यांच्याकडून आम्हाला कधीच मिळत नसे.
एकदा तर त्या बाईंनी आमची इस्त्रीच मागून नेली. दोनतीन दिवसांनी आम्हाला गरज लागली तेव्हा मी ती मागायला गेले. तेव्हा त्यांच्या बहिणीने मला इस्त्री देताना म्हटले की तुमचे काम झाले की परत आणून द्या. तेव्हा मला हसावे की रडावे ते कळेना. मी जेव्हा तिला सांगितले की इस्त्री आमचीच आहे आणि तुमच्या ताईने ती नेली होती तेव्हा तिचा चेहरा अगदी पाहाण्यासारखा झाला होता.
कधीकधी शेजारी खूप चांगले असतात, प्रेमळ असतात, जीवाला जीव देणारे असतात. तर कधीकधी शेजारी स्वार्थी असतात, मत्सरी असतात, भांडखोर असतात. समोरची व्यक्ती पाहून आपल्याला त्याच्या फार जवळ जायचे किंवा नाही ते ठरवता येते. परंतु एक धोरण म्हणून शेजारपाजारी संबंध चांगले ठेवलेले बरे. कारण कधी कुणाची गरज लागेल ते सांगता येत नाही आणि अडी अडचणीला शेवटी शेजारचेच लोक धावून येतात.
माझे शेजारी मराठी निबंध – Maze Shejari Nibandh Marathi
एक महिन्यापूर्वी माझ्या वडिलांना शिवाजी नगर येथे राहण्यास निवासस्थान देण्यात आले. आमचे निवासस्थान बस स्टैंड जवळ आहे. येथील वातावरण शांत आहे. जवळच शासकीय शाळा आणि स्थानिक बाजार आहे. आमचे घर कोपऱ्यावर आहे. त्याला लागून असलेल्या रस्त्यामुळे घरे दोन भागांत विभागली गेली आहेत. आमच्या समोरच्या घरात शिंदे राहतात. ते मूळ मुंबई राहणारे आहेत. शिंदे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. ते स्वभावाने खूप चांगले आहेत. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. या कुटुंबाशी आमचा चांगला स्नेह जुळला आहे. आम्ही एकमेकांकडे चहा फराळ करतो.
आमच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या घरात एक सिंधी कुटुंब राहते. त्यांना दोन मुली आहेत. त्यांचे आई वडील त्यांच्याकडेच असतात. ते लोक श्रीमंत आहेत. पती-पत्नी धार्मिक आहेत. दोन्ही मुली एका प्रसिद्ध पब्लिक स्कूलमध्ये शिकतात.
आमच्या शेजारच्या घरांत श्री. गुप्ता राहतात. ते अंदाजे ५५ वर्षांचे असून केंद्रीय विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. शेजार-पाजारचे लोक त्यांना खूप मान देतात. आपल्या मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या अडचणींसंबंधी सल्ला मसलत करण्यासाठी लोक त्यांच्याकडे जातात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. कॉलेजात शिकणारी त्यांची मुले नेहमी मदतीला तत्पर असतात.
आमच्या समोरच्या घरात एक वरिष्ठ अधिकारी राहतात. ते ३५ वर्षांचे असतील. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. ते डॉक्टर आहेत. आमच्या सोसायटीत कोणीही आजारी पडले तर आम्ही त्यांच्याकडेच जातो. ते खूपच चांगले व हसतमुख आहेत. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. ते दोघेजण एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात.
आमच्या सोसायटीतील एक कुटुंब असे पण आहे की ज्यांच्याकडे चार मोटारी आहेत. त्यांच्या मालकीच्या बसेस पण आहेत. तीस वर्षांपासून हे लोक इथे राहतात. श्री. कुलकर्णीना हे घर त्यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळाले. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. ते पुण्याजवळच्या एका गावातील आहेत. कुलकर्णी धार्मिक वृत्तीचे आहेत.
सारांश, येथील बहुतांश शेजारी सभ्य सुशिक्षित, शांतताप्रिय आहेत. एकमेकांच्या सुख-दु:खांत ते सहभागी होतात. एकमेकांसाठी काही करण्याचीही त्यांची इच्छा असते. चांगले शेजारी सुदैवानेच मिळतात.
शेजारधर्म मराठी निबंध – Essay on Neighbourhood in Marathi
शेजारधर्म म्हणजे शेजा-याच्या अडीअडचणीला धावून जाणे. शेजारधर्म म्हणजे शेजारच्या लोकांशी प्रेमाने वागणे. कधीकधी शेजारी खूप चांगले असतात, प्रेमळ असतात, जीवाला जीव देणारे असतात. तर कधीकधी शेजारी स्वार्थी असतात, मत्सरी असतात, भांडखोर असतात. समोरची व्यक्ती पाहून आपल्याला त्याच्या फार जवळ जायचे किंवा नाही ते ठरवता येते. परंतु एक धोरण म्हणून शेजारपाजारी संबंध चांगले ठेवलेले बरे. कारण कधी कुणाची गरज लागेल ते सांगता येत नाही आणि अडी अडचणीला शेवटी शेजारचेच लोक धावून येतात कारण नातेवाईक तर लांब असतात.
गिरगावात आमच्या शेजारी वत्सलाताई राहायची. मी त्यांच्याकडे लहानपणी रोजच जात असे. मी त्यांच्याकडे खेळत, गप्पा मारीत बसत असे. मला आंघोळीसाठी बोलवायला आई येईपर्यंत माझा हा क्रम चाले.
त्यांच्याकडे जायला मला आवडायचे कारण तिथे माझे खूप लाड होत. त्यांच्याकडे लहान मूल कुणी नसल्यामुळे ती मंडळी माझ्याशी गप्पा मारत, खेळत. वत्सलाताईचे बाबा मला महाभारतातल्या गोष्टी सांगत. ते सांगत ती सोनसाखळीची गोष्ट तर मला खूपच आवडत असे. परंतु काही काळाने आम्ही ती जागा सोडली आणि आमचा तो प्रेमळ शेजारही हरपला. आम्ही नव्या आणि मोठ्या जागेत राहायला आलो खरे परंतु इथे आम्हाला प्रेमळ शेजार लाभला नाही. हा शेजार बेरकी होता, स्वार्थी होता. सतत आमच्याकडे वस्तू मागण्याची घाणेरडी सवय त्याला होती. परंतु आम्हाला कधी काही लागले तर मात्र ते त्यांच्याकडून आम्हाला कधीच मिळत नसे.
दररोज आमच्याकडून काडेपेटीच्या काडीपासून ते मोठ्या पातेल्यापर्यंत त्या बाई सारखे मागतच असत. त्यांच्याकडे पाहुणे आले की आमच्या घरून पिशवीत घालून कपबशा नेत. पुन्हा परत स्वतःहून आणून देण्याचे नावच नाही. एकदा तर त्या बाईंनी आमची चाळणीच मागून नेली. दोनतीन दिवसांनी आम्हाला गरज लागली तेव्हा मी ती मागायला गेले. तेव्हा त्यांच्या बहिणीने मला चाळणी देताना म्हटले की तुमचे काम झाले की परत आणून द्या. तेव्हा मला हसावे की रडावे ते कळेना. मी जेव्हा तिला सांगितले की चाळणी आमचीच आहे आणि तुमच्या ताईने ती नेली होती तेव्हा तिचा चेहरा अगदी पाहाण्यासारखा झाला.
तर असे असतात शेजारी. आपले नशीब असेल तर चांगले शेजारी भेटतात. अन्यथा नाही. परंतु आपणही त्यांना अती शेफारून ठेवू नये आणि त्याच वेळेस माणूसकीचा धर्म सोडू नये. ही तारेवरची कसरत आहे खरी परंतु तीकरावी लागते हेही तितकेच खरे आहे.
पुढे वाचा:
- संस्कृतीचे समाजावरील परिणाम निबंध मराठी
- रम्य संध्याकाळ मराठी निंबध
- संत ज्ञानेश्वर मराठी निबंध
- संगणक शाप की वरदान मराठी निबंध
- संगणक वर मराठी निबंध
- श्रावणातील गमती जमती निबंध मराठी
- शेतातील कणीस बोलू लागले तेव्हा मराठी निबंध
- शेत मळ्याला भेट मराठी निबंध
- शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध
- शेकरू प्राणी निबंध मराठी
- शिस्तीचे महत्त्व निबंध मराठी
- शिष्टाचार मराठी निबंध
- शिंपी मराठी निबंध