भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
एके काळी भारत दैववादी होता, अनेक अंधश्रद्धांनी येथील लोकांची मने ग्रासून टाकली होती. अज्ञानामुळे तसे घडत होते. आपण तेव्हा पारतंत्र्यात होतो, त्यामुळे आपण अज्ञानी असणे हे आपल्यावर राज्य करणा-या इंग्रजांच्या फायद्याचे होते. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपल्या देशाने वैज्ञानिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी आय. आय. टी.सारख्या वैज्ञानिक संस्था काढल्या. बंगलोर, मुंबई येथील वैज्ञानिक केंद्रांना भरपूर सहाय्य केले, भाभा अणुसंशोधन केंद्र काढले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अशा त-हेने आपण हळूहळू वैज्ञानिक प्रगती करू लागलो.
एके काळी म्हणजे १९७२ सालापूर्वी आपल्या देशात दोनतीन वेळा सलग दुष्काळ पडला होता, त्या काळात उपासमारीने माणसे मृत्युमुखी पडली होती, तसेच आपल्याला अमेरिकेहून मिलोसारखा निकृष्ट गहू खरेदी करावा लागला होता. परंतु आपण विज्ञानाची कास धरली आणि हरित क्रांती केली.आपली संस्कृती ही मूलतः कृषी संस्कृती असल्यामुळे शेती करण्याच्या नव्या पद्धती, उत्कृष्ट बी-बियाणे, रासायनिक खते, धरणे आणि कालव्यांतून आणलेले पाणी इत्यादींचा वापर करून दर एकरी धान्योत्पादन वाढवले. त्यामुळे आपला देश अन्नाच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण आहे आणि ही सर्व विज्ञानाचीच तर कमाल आहे.
आज जहाज बांधणी, रॉकेट्स, उपग्रह इत्यादींच्या निर्मितीत भारत अग्रेसर आहे. भारतीय सैन्याला लागणा-या नव्या प्रकारच्या तोफा, बंदुका, रडारयंत्रे, विमाने आदी बरेचसे साहित्य आता आपण भारतातच बनवतो. क्षेपणास्त्रांच्या बाबतीतही भारत पुढारलेला आहे. उर्जेच्या क्षेत्रात आपली प्रगती कौतुकास्पद आहे. नद्यांचे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी करण्यात येतो. सौर उर्जा, पवनचक्की, औष्णिक विद्युत आणि अणूविद्युत इत्यादी बाबी उर्जेच्या क्षेत्रातील आपली प्रगती दर्शवितात. आपण अणुशक्तीचा उपयोग विधायक कामासाठीच करतो. मात्र आपला शेजारी चीन ह्याच्यापाशी अणूबॉम्ब असल्यामुळे स्वतःची सरंक्षणक्षमता वाढवण्यासाठी १९७४ साली आपण अणुबॉम्ब तयार केला. त्याशिवाय हल्लीच ‘इस्त्रो’ ह्या भारतातील अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर मानवरहित यान पाठवले आहे. कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत आपण अनेक पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करीत आहोत. भास्कर, ऍपल, इन्सॅट,रोहिणी असे बरेच उपग्रह आपण यशस्वीपणे आकाशात सोडले त्यामुळे आपली दूरसंचारव्यवस्था अत्यंत सुदृढ झाली. हे सर्व विज्ञानाच्या प्रगतीनेच तर साध्य झाले.
आपण महानगरांमध्ये बहुमजली इमारती बांधू शकतो, रस्ते, उड्डाणपूल, भूमिगत रस्ते, मेट्रो ह्या सर्व आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या खुणा आहेत. म्हणूनच मला वाटते की भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात चांगली झेप घेतली आहे ह्यात काहीच संशय नाही.
भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे. त्याची शक्ती अमर्याद आहे. सृष्टीच्या निर्मितीबरोबरच तिचे पालन पोषण आणि संहारही तोच करतो. आज विज्ञान ब्रह्मा, विष्णू, महेशालाच आव्हान देत आहे. कृत्रिम गर्भधारणेतून टेस्ट ट्यूब बेबी’ उत्पन्न करून त्याने ब्रह्माला ललकारले आहे. मोठमोठे उद्योगधंदे उघडून लाखो लोकांना रोजगार पुरवून विष्णूला त्याने आव्हान दिले तर सर्व नाशासाठी अणुबाँबची निर्मिती करून त्याने शिवालाही चकित करून टाकले.
विज्ञानाच्या क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करीत आहे. विज्ञान म्हणजे एखाद्या विषयाचे विशेष ज्ञान. विज्ञान एक वरदान असून मानवासाठी कामधेनूप्रमाणे आहे. विज्ञान मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. मानवाच्या कल्पनेला साकार करते. आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने प्रवेश केला आहे उदा. कला, संगीत, राजकारण इत्यादी मानवाने संपूर्ण पृथ्वी आणि अंतरिक्षाला वामनाप्रमाणे तीन पावलांत काबीज केले.
विज्ञानाने मानवाचे राहणीमान, खाणे-पिणे, आचारविचार, ज्ञान इत्यादी विषयांची चिंतन पद्धतीच बदलून टाकली. विज्ञानाच्या शक्तीमुळे तो भूगर्भातून पाणी खेचू शकतो, समुद्रातून सेल काढू शकतो. बाँबे हायवेतून निघणारे तेल हा भारतीय वैज्ञानिक प्रगतीचा जिवंत नमुना आहे. याशिवाय आसाम आणि इतर राज्यांत पेट्रोलियमच्या विहिरी शोधण्यात आल्या आहेत. रासायनिक खतांच्या साह्याने शेतजमिनीच्या उत्पादनशक्तीला वाढविले व अन्नधान्याची टंचाई दूर केली. कापडाच्या कारखान्यात इतके कापड उत्पादन होते की आपली गरज पूर्ण होऊन आपण कापडाची निर्यात करतो. औषध न मिळाल्यामुळे कुणी मरू नये म्हणून औषधाचे कारखाने काढले. चिकित्साशास्त्राच्या विज्ञानात इतकी प्रगती झाली आहे की मलेरिया, कॉलरा, प्लेगसारख्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवता येते. शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात अवयवांचे प्रत्यारोपण करून यश प्राप्त केले आहे. इतर असाध्य रोगांच्या इलाजावर संशोधन चालू आहे.
विज्ञानाने मानवाचा वेळ आणि शक्ती वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. भारतात आता काही अपवाद सोडल्यास सर्व कामे यंत्राच्या साह्याने करता येतात. माणसाला फक्त यंत्रावर नियंत्रण ठेवावे लागते. धान्य दळणे, पीठ तिंबण्यापर्यंत, धान्याची पेरणी करण्यापासून धान्याची पोती भरण्यापर्यंत. वृक्ष तोडण्यापासून फर्निचर तयार करण्यापर्यंत सर्व कामे यंत्रांद्वारे होतात. विज्ञानाने मानवाच्या दैनंदिन जीवनातही अनेक क्रांतिकारक सोयी केल्या आहेत. रेडियो, फॅक्स, रंगीत टी. व्ही. टेपरेकॉर्डर, व्ही. सी. आर, टेलिफोन, वॉशिंग मशिन, व्हॅक्यूम क्लीनर, कुलर, पंखा, फ्रीज, हिटर, मिक्सर इत्यादी आरामदायक यंत्रांची निर्मिती केली. त्याची इतकी सवय माणसाला झाली की ‘ती नसतील तर जीवन नीरस वाटते. भारताने दूरदर्शनमध्ये पण खूप प्रगती केली आहे.
घरातील चुलीची जागा आता शहरात गॅसने तर खेड्यांत गोबरगॅसच्या शेगडीने घेतली आहे. वेगाने चालणारी विमाने, बस, ट्रक, कार, स्कूटर, रेल्वे इत्यादी वाहतुकीची साधने विज्ञानाने वाहतुकीच्या क्षेत्रात केलेली प्रगती दर्शवितात. भारतात संगणकाचा प्रवेश आणि त्याचा प्रसार आपल्या यांत्रिक प्रगतीकडे निर्देश करतो. छापलेल्या पुस्तकांच्या प्रकाशाने ज्ञानाचे दीप घरोघर पेटविले. अशिक्षितांना शिक्षण देण्याची आणि विचार करण्याची शक्ती दिली. वृत्तपत्रांनी भारताला जगाच्या जवळ नेले. सिनेमाच्या क्षेत्रातील आपली प्रगती कौतुकास्पद आहे.
विज्ञानाने भारतीयांचे राहणीमान आणि चिंतनशक्ती पूर्णपणे बदलून टाकली. विमाने, जहाजे, रॉकेटस, उपग्रह इत्यादी च्या निर्मितीत भारत अग्रस्थानी आहे. ऊर्जेच्या क्षेत्रात आपली प्रगती कौतुकास्पद आहे. नद्यांचे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचन आणि विद्युत निर्मितीसाठी केला गेला. सौर ऊर्जा, पवनचक्की, औष्णिक विद्युत, अणुविद्युत इत्यादी बाबी ऊर्जेच्या क्षेत्रांतील आपली प्रगती दाखवितात. अणुविद्युतचा उपयोग भारताने फक्त विधायक कार्यासाठीच केला आहे.? विज्ञानाने अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक चमत्कार केले आहेत. महानगरांत गगनचुंबी इमारती, रस्ते, उड्डाणपूल, भूमिगत मार्ग इत्यादी. आपल्या प्रगतीचे निदर्शक आहेत. खेळांच्या प्रसारासाठी अनेक स्टेडियम, तरण तलाव बनविण्यात आले आहेत.
भारतीय सेनेला अत्याधुनिक पद्धतीने सुसज्जित करण्यात विज्ञानाचे मोठे योगदान आहे. नव्या प्रकारच्या तोफा, बंदुका, मशिनगन, रणगाडे, रॉकेट, बाँब, रडारयंत्रे, विमाने, जहाजे यांची निर्मिती आता भारतातच होते. क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञानही भारताजवळ आहे.
१९ एप्रिल १९७५ ला सोव्हियट अवकाश केंद्रातून “आर्यभट” नामक उपग्रहाचे सफल प्रक्षेपण करून भारताने अंतराळ युगात प्रवेश केला आहे. कृत्रिम उपग्रहांच्या निर्मितीमध्ये आपण विकसित देशांशी टक्कर घेत आहोत. भास्कर, अॅपल, इन्सॅट, रोहिणी सारखे अनेक उपग्रह अंतराळात पाठवून जगातील महाशक्तीसमोर भारत उभा राहिला आहे. १९८५ मध्ये “अनुराधा'”नामक प्रयोगशाळा अंतराळात पाठवून सूर्य आणि ब्रह्मांडातील अन्य स्त्रोतापासून निघून पृथ्वीच्या वायुमंडळात येणाऱ्या ऊर्जा किरणांचे संघटन व तीव्रतेचे संशोधन केले. कृत्रिम उपग्रहांद्वारे आपली संचार व्यवस्था सुदृढ़ झाली. हा उपग्रह अंतराळातून इतर ग्रहांची माहिती व छायाचित्रे आपणास पाठवितो. ती पाहून आपण रोमांचित होतो. ऋतुसंबंधीची माहिती पण आपणास या उपग्रहांद्वारे मिळते. एप्रिल १९८४ मध्ये स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा रशियन अंतराळवीर मेलिशेव ओ गेन्नाडी स्वेकालेन यांच्याबरोबर अंतराळयात्रा करून आला.
मानव पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. ज्याने आपल्या बुद्धीचे नित्य नवे चमत्कार करून आपले जीवन सुखमय बनविले. पृथ्वीवर विजय पताका फडकविल्यानंतर आता तो अंतराळात घर बांधू इच्छितो. यात भारत कुठे असेल ते काळच सांगेल. परंतु हे खरे की विज्ञानाने मानवाला आपले गुलाम केले आहे. अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे सर्व वैभव, ऐश्वर्य मनुष्याला देण्यासाठी विज्ञान उभे आहे. म्हणून विज्ञानाचा सदुपयोगच झाला पाहिजे. दुरुपयोग नव्हे. विज्ञान अशी शक्ती आहे की जिचा प्रयोग विचारपूर्वकच केला पाहिजे.
पुढे वाचा:
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
- भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
- बैल प्राणी निबंध मराठी
- बालमजुरी निबंध मराठी
- माझे बालपण निबंध मराठी
- बालदिन निबंध मराठी
- बाबा आमटे निबंध मराठी
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी