भारत माझा जगी महान मराठी निबंध – Bharat Maza Jagi Mahan Nibandh Marathi

‘माझा भारत महान’ हे सुवचन सर्वत्र ऐकायला व पाहायला मिळते. नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा प्रसारमाध्यमांतून हे विधान आपल्या कानांवर, डोळ्यांवर आणि मनावर वारंवार ठसवले जाते. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता आपण वस्तुस्थितीचा विचार करू लागल्यास आपले मन साशंक होते. आपण जेव्हा शांतपणे विचार करू लागतो तेव्हा मनात येते की, खरोखरच माझा भारत जगात महान आहे का?

नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांत एवढ्या विशाल भारतातील खेळाडूंची कामगिरी काय? तर एक कांस्य पदक ! भारतातील एखादया राज्याएवढ्या छोट्या देशांनीही अनेक सुवर्णपदके पटकावली; मग भारताला असा पराक्रम का जमू नये? १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हाच जपानही अणुबॉम्बहल्ल्यातून स्वत:ला सावरत होता. पण आज औदयोगिक प्रगती आणि व्यापार या दोन्ही बाबतींत जपान जगात अग्रेसर आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात मात्र लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली, निरक्षरतेचे प्रमाण वाढले. नैतिकतेचा विलक्षण हास झाला. मग असा हा भारत जगी महान आहे, असे कसे म्हणता येईल?

एक काळ असा होता की भारत ही सुवर्णभूमी होती. ज्ञान व अध्यात्म या क्षेत्रात तो अग्रेसर होता. अनेक परदेशी विद्वान येथे ज्ञानग्रहणासाठी येत आणि येथील पंडित त्यांना ज्ञानदानाचे कार्य करत. ही महान परंपरा भारताला लाभली आहे. भारताचा इतिहासही उज्ज्वल आहे. निसर्गाची विविधता आणि महानता भारतात आहे. आपल्याला उज्ज्वल संस्कृतीचा वारसा लाभला आहे; पण तरीही जीवनाच्या विविध क्षेत्रांत आजही आपला हा भारत इतर राष्ट्रांच्या मानाने खूपच अप्रगत आहे.

भारतात आजमितीला अफाट दारिद्र्य आहे. जातिभेद, धर्मभेद, पंथभेद यांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे. परिश्रमावाचून संपत्ती मिळवण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. शिस्त, परिश्रम, स्वावलंबन यांच्या बळावर व त्याहीपेक्षा देशहितांची खरी कळकळ बाळगून जर भारतीय काम करू लागले, तर हा आपला भारत खरोखरच महान राष्ट्र होईल व मग ‘मेरा भारत महान’ असे आपण मोठ्या अभिमानाने म्हणू शकू.

भारत माझा जगी महान मराठी निबंध – Bharat Maza Jagi Mahan Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply