भाऊबीज निबंध मराठी – Bhaubeej Nibandh in Marathi

मला तर भाऊबीज हा सण खूप आवडतो कारण ह्या दिवशी मला ओवाळणीमध्ये खूपखूप भेटी मिळतात. ह्या दिवशी आम्ही सर्व नातेवाईक एकत्र भेटतो. माझी मावशी आणि मामा आमच्या घरी येतात. मला दोन मावसभाऊ आणि दोन मामेभाऊ आहेत. त्यांना सख्खी बहीण नाही त्यामुळे माझे खूप लाड होतात. भाऊबीजेच्या आदल्या दिवशी आई दिवसभर दूध आटवून चांगली दाट बासुंदी करते.

त्यामुळे आम्हाला भाऊबीजेच्या दिवशी बासुंदीपुरीचे सुग्रास जेवण मिळते. भाऊबीजेच्या दिवशी मी नवा परकरपोलका घालून चांदीच्या निरांजनाने माझ्या भावांना ओवाळते. ते मला बाहुली, पुस्तके, फ्रॉक अशा छानछान वस्तू देतात. मीसुद्धा त्यांना बॅट, बॉल, व्यापारडाव अशा भेटवस्तू देते. मग संध्याकाळी आम्ही गच्चीवर जातो तेव्हा आकाशातली फटाक्यांची आतषबाजी पाहून मन अगदी हरखून जाते.

भाऊबीजेचा सण दिपावलीच्या शेवटल्या दिवशी साजरा केला जातो. हा मुख्यत्वेकरून हिंदूंचा सण असून तो भारतातील सर्व राज्यांत आणि नेपाळ येथेही साजरा केला जातो..

हा भाऊबहिणीच्या मंगल नात्याचा सण आहे. सासरी गेलेल्या बहिणीला ह्या दिवशी तिचा भाऊ भेटतो. ती त्याला निरांजनाने ओवाळते. तो तिला आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओवाळणी घालतो.

ह्या सणाला यमद्वितीया असेही नाव आहे. पुराणात अशी कथा आहे. की मृत्यूदेव आणि नरकाचा राजा यम आपली बहीण यमी हिला ह्याच दिवशी भेटायला गेला होता. तेव्हा तिने त्याच्या कपाळी कुंकुमतिलक लावून त्याला ओवाळले. त्यामुळे हिंदू लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की ह्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडून ओवाळून घेईल त्याला कधीही नरकात जावे लागणार नाही.

ह्या दिवसाबद्दल पुराणातील दुसरी कथा अशी आहे की श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यावर तो आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला गेला. तेव्हा तिने त्याला ओवाळले. त्या प्रसंगाची आठवण म्हणूनही भाऊबीज साजरी करतात. ज्या स्त्रियांना भाऊ नसतो त्या चंद्रालाओवाळतात.

असा हा सण मला खूप आवडतो. मी दर वर्षी ह्या सणाची वाट पाहात असते.

भाऊबीज निबंध मराठी – Bhaubeej Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply