भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत

आजचा दिवस माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्हा लोकांना सांगितल्याप्रमाणे ‘युवक वर्षा ‘निमित्ताने आज मी माझी कैफियत तुमच्यासमोर मांडत आहे आणि तुम्ही प्रचंड संख्येने आज ती ऐकायला येथे जमला आहात, हेही मी माझे भाग्यच समजतो. असा दिवस कधी उगवेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.

आजवर मी बोलत असे तो केवळ माझ्या मेंढ्यांशी ! त्यांना माझी भाषा समजते आणि त्यांचे मनोगत मी जाणतो. माझे जग हे एवढेच मर्यादित आहे. या मेंढ्या, ही गाढवे आणि ही कुत्री ! मेंढ्या माझ्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात. ही मेहनती गाढवे आमचा संसार, आमची मुलेबाळे पाठीवरून वाहून नेतात. ही आमची इमानी कुत्री आमचे रक्षण करतात.

काय विचारता राव प्रश्न ! आमची घरं कुठे? अहो, आम्हांला कुठलं आलंय घर? रस्त्यावर कोठेही तीन दगड मांडले की, झाली आमची चूल तयार ! मग भाकरी- बेसन करायचे आणि त्यावरच गुजराण करायची. वर निळ्याशार आभाळाचे पांघरूण आणि खाली थंडगार जमिनीचे अंथरूण ! उन्हापावसात झाडाचा आधार, तर हिवाळ्यातील थंडी मेंढ्यांच्या दाटीवाटीत घालवायची, ही तर आम्हांला सवयच झाली आहे. आमचा जन्म रस्त्यावर आणि मरणही रस्त्यावरच ! पण लोकहो, पाय थकले ना, की फार अवघड जाते. त्यावेळी तशा अवस्थेत आमची फार परवड होते.

तीच कैफियत मी आज मांडत आहे. ‘भटके’ हा शिक्का आमच्या नशिबी घेऊनच आम्ही या जगात आलो. आमची मेंढरं सर्वांच्या शेतांत, बागांत बसवून आम्ही त्यांची जमीन सुपीक करतो; पण आमच्या सुखदु:खांचा विचार कोणालाही शिवत नाही.

आमच्या या अशा भटक्या जीवनामुळे आमच्या पोराबाळांना कुठे निवारा मिळत नाही. आज साऱ्या लोकांच्या वस्त्या होतात, इमारती उठतात. पण आम्हां भटक्यांना मात्र कुठेही आधार नाही. तेव्हा आमची कैफियत आहे की, आम्हालाही माणसासारखे जगण्याची संधी मिळाली पाहिजे! तो आमचा हक्कच नाही काय?”

पुढे वाचा:

Leave a Reply