विविधतेत एकता निबंध मराठी – Essay On Unity in Diversity in Marathi
आपल्या देशात अनेक जाती, धर्म आणि पंथांचे लोक राहातात. आपल्याकडे एकुण पंधरा भाषांना अधिकृत मान्यता मिळालेली आहे. त्याशिवाय गावोगावच्या बोली किती असतील ह्याला काही गणतीच नाही. धर्मांबद्दल बोलायचं तर प्रामुख्याने हिंदू, मुसलमान, शिख, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध ह्या धर्माचे लोक ह्या आपल्या भारत देशाचे रहिवासी आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्म आणि पंथात असलेल्या सलोख्यामुळेच आपण आज एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत.
संकटसमयी सारे भारतीय लोक एकत्र होतात आणि एकदिलाने त्या संकटाशी झुंजतात असाच आजवरचा अनुभव आहे. १९९९ साली पाकिस्तानने भारताच्या कारगीलवर आक्रमण केले तेव्हाही हेच दिसून आले होते.
ह्या विविधतेतील एकतेचा मूळ स्त्रोत आहे आपल्या भारताची सांस्कृतिक पार्श्वभूमी. ‘जगा आणि जगू द्या, हेच आपले ब्रीदवाक्य आहे. आपल्या राष्ट्रीय सद्भावनेचे ते प्रतिक आहे. सर्व धर्मपंथांचे लोक इथे मिळून मिसळून वागतात हे देशाच्या प्रगतीसाठीही आवश्यक आहे. ‘विश्वचि माझे घर’ ही आपली सर्वसमावेशक वृत्ती आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हिंदू, मुसलमान आणि शिख धर्माचे अनुयायी भारताचे राष्ट्रपतीपदावर बसले आहेत. आपल्या सेनांच्या प्रमुखपदावर तर सर्व धर्मांचे सेनापती आलेले आहेत. बांगला देशाच्या युद्धाच्या वेळेस सॅम माणेकशा हे धर्माने पारशी असलेले गृहस्थ आपले सेनाप्रमुख होते. भारताच्या राज्यघटनेनेही सर्व भारतीयांना त्यांची जात, धर्म आणि वंश कुठलाही असला तरी समानाधिकारच दिलेले आहेत. ह्यामुळेच आपली लोकशाही मजबूत पायांवर उभी आहे. ही एकतेची भावना निरंतर टिकवून ठेवणे हीच खरी एक राष्ट्र म्हणून आपली कसोटी आहे.
स्वतःच्या क्षणिक स्वार्थासाठी, राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रीय सद्भावनेला सुरूंग लावून जातीयतेला उत्तेजन दिले जात आहे. जातीपाती आणि धार्मिक आधारांवर निवडणुकांचे राजकारण खेळले जाते हे फार वाईट आहे. असे केल्याने धार्मिक सद्भावना नष्ट होते. धार्मिक उत्सवही मोठा गाजावाजा करून आणि ध्वनिप्रदूषण करून साजरे केले जातात ही एक प्रकारची विकृतीच आहे. हे सर्व प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत. आपण धर्माने कुणीही असलो तरी सर्वप्रथम आपण एक माणूस आहोत, हे आपण कदापि विसरता कामा नये.
आपल्याला एक राष्ट्र म्हणून प्रगती करायची असेल तर ही विविधतेतील एकता आपण जपली पाहिजे. त्यासाठी समाजातील सर्व विचारवंतांनी पुढे आले पाहिजे. सरकारनेही खोडसाळांना वेसण घातली पाहिजे.
आपल्या देशात निसर्गही वेगवेगळा आहे. कुठे मैदानी प्रदेश तर कुठे डोंगरद-या तर कुठे वाळवंट असे जगातील सगळे भौगोलिक प्रकार आपल्या देशात आपल्याला पहायला मिळतात. आपल्या भाषा वेगळ्या, आपल्या भागातील प्रथा, समजुती, चालीरीती वेगळ्या असे असूनही आपली संस्कृती एक आहे म्हणूनच आपण एक आहोत. ही विविधतेतील एकता आपण प्राणपणाने जपली पाहीजे. ती आपण जपूया.
पुढे वाचा:
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
- भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
- बैल प्राणी निबंध मराठी
- बालमजुरी निबंध मराठी
- माझे बालपण निबंध मराठी
- बालदिन निबंध मराठी
- बाबा आमटे निबंध मराठी
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी
- मी पाहिलेले बसस्थानक निबंध मराठी
- बरे सत्य बोला यथातथ्य चाला
- फॅशन आणि विद्यार्थी भाषण मराठी
- फुलाचे मनोगत निबंध मराठी
- फुलपाखरू निबंध मराठी