भारतातील वनसंपदा निबंध मराठी
एके काळी आपला भारत वनांनी समृद्ध होता. सगळीकडे जंगलेच जंगले होती. दोन खेड्यांमध्ये संपूर्ण घनदाट असे जंगलच असे. आपण रामायण, महाभारत वाचतो तेव्हा त्यात दंडकारण्य, खांडववन असे मोठमोठ्या जंगलांचे उल्लेख आपल्याला आढळतात. राजेलोक शिकारीला बाहेर पडत तेव्हा हरणांचे कळपच्या कळप त्यांना दिसत. म्हणूनच तर शिकारीला मृगया असे नाव पडले होते. इंग्रज लोकांनी तर वाघसिंहाच्या भरपूर शिकारी केल्याचे भरपूर किस्सेही आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु हळूहळू लोकसंख्या वाढू लागली, शहरीकरण होऊ लागले तसतशी जंगले आक्रसत गेली. सध्या भारतीय भूमीचा २३.७ टक्के भाग जंगलांनी व्यापलेला आहे.
वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण, अज्ञान आणि अनास्था ह्यामुळे स्वातंत्र्यानंतर जंगलांचे आकारमान घटत चालले होते. परंतु हळूहळू पर्यावरणाचा समतोल ढळू लागला, तेव्हा कुठे लोकांना जंगलांचे महत्व कळू लागले आणि पटूही लागले. सरकारनेही त्या संदर्भात पावले उचलली. आपल्या भारतात जगात कुठेही सापडणार नाही एवढीजैवविविधता आहे, ही जैवविविधता टिकली पाहिजे म्हणून आपल्या सरकारने सर्वच राज्यात अभयारण्ये निर्माण केली. सर्व वन्य प्राण्यांच्या विशेषतः वाघांच्या शिकारीवर संपूर्ण बंदी घातली. आज आपण पाहिले तर भारतात काझीरंगा, जिम कॉर्बेट, ताडोबा, कान्हा, पेंच, नागझिरा, बंदीपूर अशी जवळजवळ १०५ अभयारण्ये आहेत. गंमत सांगायची म्हणजे १९७२ साली आपल्याकडे फक्त पाच अभयारण्ये होती.
खरोखर, हे वृक्ष…ही हिरवीगार वनराजी आपले मित्र आहेत. आपले सारे जीवन ह्या वृक्षवल्लरींवर आणि वनस्पतींवरच अवलंबून आहे. झाडे आपल्याला काय देत नाहीत? झाडे आपल्याला अन्न देतात, सावली देतात. झाडे जेव्हा स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर सोडून हवा शुद्ध करतात. आपल्या घरातील सामानसुमान लाकडाचे बनलेले असते. काही ठिकाणी तर घराच्या भिंतीसुद्धा लाकडाच्याच असतात. झाडापासून आपल्याला जळण, लाकूड, फळे, लाख, गोंद, रबर, मध असे नानाविध पदार्थ मिळतात. ह्यातील ब-या वस्तू आपण निर्यात करतो.
वेगवेगळ्या फुलांचे आपण गजरे बनवतो, लग्नात आणि अन्य समारंभात सुशोभीकरणासाठी फुलांचा उपयोग होतो. फळांपासून जॅम, मोरंबा, लोणची बनतात. हिरडा, बेहडा, ज्येष्ठीमध, वावडिंग असे अनेक औषधी पदार्थ आपल्याला झाडांपासूनच तर मिळतात. झाडापासून कापूस मिळतो. रेशीम जरी किड्यापासून मिळत असले तरी तो किडा तुतीच्या झाडांच्या पानावरच राहातो. झाडांमुळे जमिनीची धूप होत नाही. दुष्काळाचे मान कमी होते, झाडांची मुळे जमिनीला घट्ट पकडत असल्यामुळे पुराच्या वेळेस फार नुकसान होत नाही. हल्ली विद्युतदाहिनीचा वापर कुठे कुठे होऊ लागला असला तरी अजूनही ब-याच ठिकाणी मृतदेहाचे दहन करण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो.
म्हणूनच भारतातील ही वनसंपदा आपण जपली पाहिजे आणि तिचे सवंर्धन केले पाहिजे.
पुढे वाचा:
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
- भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
- बैल प्राणी निबंध मराठी
- बालमजुरी निबंध मराठी
- माझे बालपण निबंध मराठी
- बालदिन निबंध मराठी
- बाबा आमटे निबंध मराठी
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी
- मी पाहिलेले बसस्थानक निबंध मराठी