Set 1: माझे बालपण निबंध मराठी – Maze Balpan Nibandh Marathi
बालपणीचा काळ सुखाचा, किती मौजेचा गंमतीचा.. असे एक गाणे आहे किंवा ‘रम्य ते बालपण, देई देवा फिरून ‘ असेही एक गाणे आहे. पण ही सर्व गाणी मोठ्या माणसांनी लिहिलेली आहेत. मोठ्या माणसांना बालपण आवडत असले तरी आम्हा लहान मुलांना मात्र ते आवडत नाही बरे का?
आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला मोठ्यांचे सांगणे ऐकावे लागते, रोज शाळेत जावे लागते, अभ्यास करावा लागतो, गृहपाठ केला नाही तर शिक्षा होते. वर्गातली दांडगट मुले आमच्यावर दादागिरी करतात. शिवाय आम्हाला परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत चांगले गुण नाही मिळाले तर आई, बाबा आणि आजी आजोबा आमच्यावर टीका करतात.
उन्हाळ्याच्या रजेतही आम्हाला मनासारखे खेळता येत नाही कारण आमच्या घराजवळ मैदान नाही. सोसायटीत खेळलो की काचा फुटतील म्हणून मोठे लोक ओरडतात. मग आम्हाला टीव्हीवर कार्टून पाहात बसावे लागते किंवा व्हिडिओ गेम खेळावे लागतात. मग सांगा, हे बालपण कुठे आहे रम्य?
पण ह्या वर्षी बाबा मला पोहायला नेणार आहेत आणि आजीकडे गावालाही पाठवणार आहेत. तेव्हा मात्र मला खरेच बालपणाचा आनंद घेता येणार आहे.
Set 2: माझे बालपण निबंध मराठी – Maze Balpan Nibandh Marathi
मी आठवीत आलो आणि आईने मला सुनावले, “बाळकोबा, आता तुमचं बालपण सरलं बरं का? आता तुम्ही मोठे झालात हे विसरू नका!” त्या क्षणी मला मोठ्यांदा रडावेसे वाटले; कारण आईच्या या शब्दांमुळे मला माझे बालपण हरवले आहे, याची जाणीव झाली.
आपण मोठे झालो ही जाणीव फारशी सुखद नव्हती. बालपण हरवणे म्हणजे मोठ्यांसारखे वागणे आले, नाना बंधने आली. हट्ट नाही, लाड नाहीत. सगळीकडे कसे अगदी गंभीरपणे वागायचे! बालपणातील भाबडेपणा, निरागसपणा आता संपला! कवयित्री शांता शेळके यांनी या दिवसांचा उल्लेख ‘सुंदर दिवस’ म्हणून केला आहे. कारण बालपणाच्या त्या दिवसांनी त्यांना ‘मधुभावांचे वेड’ लावले होते. खरोखरच, हे बालपण मधाळ असते. त्याला साजरेगोजरे बाळसे असते. सगळीकडे स्वच्छंदता असते. वात्सल्यपूर्ण शब्दांनी त्याचे स्वागत होते. माझे बालपणही असेच सुंदर होते.
मोठ्या कुटुंबातील सर्वांत धाकटा म्हणून सर्वजण माझे कौतुक करत असत. या काळात मी जे जे मागितले ते ते मला ताबडतोब मिळत गेले. माझे खूप लाड झाले. नाचत, बागडत केलेला थोडासा अभ्यासही उत्तम गुण मिळवायला पुरेसा ठरत होता.
घरच्यांचे कोडकौतुक जरा कमीच भासे म्हणूनच की काय येणारे पाहुणेही कौतुक करत, पाठीवर शाबासकीची थाप देत, सोबत खाऊची खिरापत आणत. मी वेड्यावाकड्या बेसूर स्वरात गाइलेले गाणेही कौतुकाचा विषय होत असे. बालवयातील माझी प्रत्येक कृती आणि उक्ती हा कौतुकाचाच विषय ठरत असे. माझ्या अनेक चुकांकडे बालपणाच्या नावाखाली दुर्लक्ष केले गेले आहे. ‘अवनी गमली अद्भुत अभिनव’ अशा स्वरूपातील ते बालपण आता हरवले होते आणि वाट्याला मोठेपण आले होते.
याचवेळी एक कटू सत्य मला जाणवले, पुढील आयुष्यात मी ज्ञान, धन, कीर्ती मिळवू शकेन, पण मला माझे हरवलेले बालपण पुन्हा गवसणार नाही.
पुढे वाचा:
- बालदिन निबंध मराठी
- बाबा आमटे निबंध मराठी
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी
- मी पाहिलेले बसस्थानक निबंध मराठी
- बरे सत्य बोला यथातथ्य चाला
- फॅशन आणि विद्यार्थी भाषण मराठी
- फुलाचे मनोगत निबंध मराठी
- फुलपाखरू निबंध मराठी
- फाटक्या पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी
- फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
- प्रामाणिकपणा मराठी निबंध
- मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध मराठी
- प्रार्थना चे महत्व मराठी निबंध
- प्रातः कालीन भ्रमण निबंध
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी