Set 1: फाटक्या पुस्तकाचे मनोगत निबंध – Fatkya Pustakache Atmavrutta Marathi
बाळांनो! इकडे, माझ्याकडे पाहा. मी इथे आहे. बघा, अजून लक्ष गेले नाही ना? हेच माझे दु:ख आहे. बाळांनो, मी पुस्तक बोलत आहे! मी एक फाटके पुस्तक आहे.
माझ्याकडे कुणीच बघत नाही, याला एक कारण आहे. तुम्हांला कोणालाच हल्ली वाचनाची आवड राहिलेली नाही. सगळेजण दूरदर्शन वा संगणक यांच्यातच गुंतलेले असतात. तसेच, माझी ही जीर्ण अवस्था झालेली आहे, म्हणूनही कोणी माझ्याकडे बघत नाही.
माझी ही जीर्ण अवस्था कोणी केली? तुम्हीच ना? तुम्ही मला कधी प्रेमाने वागवलेच नाही. तुम्ही मला कुठेही फेकत होता. तुम्ही माझी पाने दुमडली. पानांवर काहीबाही लिहून ठेवले. त्यामुळे माझी ही अवस्था झाली. पण मी तुम्हां माणसांसाठी काय काय केले!
मी तुम्हांला वाचायला शिकवले. तुम्हांला अनेक प्रकारची माहिती सांगितली. खूप गोष्टी सांगितल्या. खूप कविता, गाणी दिली. पण तुम्ही हे सारे विसरलात. आता तरी लक्षात घ्या. मला व माझ्या बांधवांना जवळ घ्या. तुमचे जीवन सुखी होईल.
Set 2: फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी – Fatkya Pustakache Atmavrutta Marathi
वार्षिक परीक्षा संपली. ३० एप्रिलला इयत्ता ७ वीचा निकाल लागला. मी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. घरी येऊन जुनी पुस्तके, रद्दीवाल्याला द्यावी म्हणून कपाट उघडले तर आवाज आला स्थांब महेश.’ मला आश्चर्य वाटले. मी पुस्तकांना हात लावला तर एक कोपऱ्यातील जुनेपुराणे पुस्तक बोलायला लागले.
ते म्हणाले, ‘आठवतं का महेश, अरे तुझ्या वाढदिवसाला तुझ्या काकांनी मला तुझ्यासाठी भेट दिले. तेव्हा तू सारखा चित्रांकडे पाहत होतास. वारंवार माझा सुगंध घेत श्यामची आई, श्यामची आई असे सर्वांना सांगत होतास.’
झोपतानाही मला जवळ ठेवत होतास. तेव्हा झोपेत माझी पाने चुरगाळत असताना मला किती वेदना होत होत्या. तू मला चांगले कव्हर घातलेस. स्वतःचे नाव लिहून ऐटीत सर्वांना दाखवित होतास. पण व्हॉलीबॉल सारखे मला हाताळीत होतास.
माझे एक एक पान दूर करताना कधी माझा विचार केलास? मला त्यावेळी किती वाईट वाटत होते.
नाही महेश, असे मला आता रद्दीत टाकशील तर नंतर तो चणेवालाही माझ्या एका एका पानाचे तुकडे करणार. एवढा निर्दयी होऊ नकोस. विचार कर. मी शुद्धीवर आलो आणि पुस्तक व्यवस्थित ठेऊन दिले.
Set 3: फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी – Fatkya Pustakache Atmavrutta Marathi
खेळायला पळायचे होते परंतु आईचे काम केल्याशिवाय परवानगी नव्हती म्हणून नाराजीनेच रद्दीवाल्याकडे रद्दी घालायला गेलो. वजन करुन घेताना दुकानाच्या एका कोपऱ्यातुन विव्हळण्याचा, कण्हण्याचा आवाज आला. भास झाला असे समजून जात असता हळू आवाजात बोलणे ऐकायला आले. वळून पाहिले तर कोपऱ्यात एक फाटके पुस्तक पडलेले दिसले. तेच बोलत असल्याचे लक्षात आले. “अरे मित्रा, थांब जरा, मी काय सांगतो ते ऐकून घे” असे म्हणत त्या पुस्तकाने आपली फाटकी व दर्दभरी कहाणी ऐकविण्यास सुरुवात केली.
गेल्याच वर्षी मी एका ग्रंथालयातील नव्या काचेच्या कपाटात सुंदर आवरणात बांधलेलो व विक्रीची वाट पाहत होतो. जेणेकरुन माझ्या प्रत्येक पानातील ज्ञानामृत अनेकजण प्यावेत. खरेदीसाठी नाही परंतु वाचण्यासाठी एका माणसाने मला आपल्या घरी नेले. मी हर्षभरीत झालो होतो. आता या माणसाच्या घरातील सर्वजण माझे वाचन करुन, दुसऱ्या मित्रांनाही माझा सहवास घडवतील पण त्या घरातील चेतन आणि नेहा या बहिणभावाच्यात मला आधी कुणी वाचायचे म्हणून मला खेचण्यास सुरुवात झाली.
कधी चेतन, कधी नेहाकडे खेचला जाऊन मी खिळखिळा झालो माझ्या अंगाची लक्तरे निघाली. पाने ढिली होवून एक-एक करत हातात आली. तरीही त्यांच्या बाबांनी डिंकाने व्यवस्थित मला चिटकवले. परंतु नेहाची मैत्रीण रितू घरी आली माझ्या अंगावर पेपरवेट असतानाही मला खस्कन ओढले त्यात माझ्या मुखपृष्ठाच्या चिंध्या झाल्या आणि मी वाचनाच्या कामाचा राहिलो नाही. म्हणून त्यांच्या बाबांनी माझी रवानगी सरळ रद्दीवाल्याकडे केली. मला खूप दुःख झाले. आता माझे वैभवाचे दिवस संपले आहेत. पण अजून नशिबात किती वणवण आहे कोण जाणे । आता सुखाचे क्षण पुन्हा लाभणार नाहीत हे माहित असुनही अजुन वेडी आशा आहे की माझ्यातील शिल्लक असलेल्या पानावरच्या गोष्टी वाचाव्यात. माझ्यातील चित्रे बघावीत. तेवढेच दुसऱ्यांना आनंद दिल्याचे समाधान मला पुन्हा एकदा मिळेल.
पुढे वाचा:
- फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
- प्रामाणिकपणा मराठी निबंध
- मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध मराठी
- प्रार्थना चे महत्व मराठी निबंध
- प्रातः कालीन भ्रमण निबंध
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी