रिक्षावाला निबंध मराठी – Essay On Auto Rickshaw Driver in Marathi

वर्तमानपत्रात एका रिक्षावाल्याच्या छायाचित्रासह आलेल्या त्या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. कुणा एका प्रामाणिक रिक्षावाल्याचे ते छायाचित्र होते. त्याच्या रिक्षात मिळालेली एक पर्स त्याने त्यातील रकमेसह तिच्या मालकिणीचा पत्ता शोधून काढून तत्परतेने तिला परत केली होती.

परदेशातून पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेची ती पर्स होती. त्या पर्समधील रक्कम आणि कागदपत्रे गहाळ झाली असती, तर ती महिला फार अडचणीत आली असती. रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाने ती फार प्रभावित झाली होती. कृतज्ञतेने तिने त्याला देऊ केलेली बक्षिशी त्याने विनम्रपणे नाकारली होती.

तिने त्याला आपल्या देशात येण्याचे आमंत्रण दिले होते. हे वृत्त वाचून मनातल्या मनात मी त्या प्रामाणिक रिक्षावाल्याचे अभिनंदन केले.

योगायोग असा की, रात्री भावाला गाडीवर बसवून देऊन मी अकरा वाजता घराकडे परतण्यासाठी रिक्षाला हात केला आणि रिक्षा थांबली. पाहतो तर काय आश्चर्य! सकाळी वर्तमानपत्रात ज्याचे छायाचित्र पाहिले होते तोच हा रिक्षावाला होता. मग रिक्षा सुरू होण्यापूर्वी मी त्याचे प्रथम अभिनंदन केले. तो प्रसन्नपणे हसला. पण मी कसा गप्प बसेन ! तहेत हेचे प्रश्न विचारून मी त्याला बोलके केले.

तो रिक्षावाला फक्त संध्याकाळी रिक्षा चालवण्याचे काम करी. इतर वेळी तो शिकत होता. कायदयाचा अभ्यास करत होता. सुभाष त्याचे नाव. वडलांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्याने पदवी संपादन केली होती. त्यासाठी त्याने नाना उद्योग केले. आताही दिवसा तो महाविद्यालयात जात होता व त्याचबरोबर एका मोटार गॅरेजमध्ये काम शिकत होता. रिक्षादुरुस्तीसाठी कुणावर अवलंबून राहायचे नाही, ही त्याची त्यामागची धारणा होती. .

त्याच्या बोलण्यावरून लक्षात आले की, त्याच्या बऱ्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या संपत आल्या होत्या. पण त्याला स्वत:च्या मालकीची रिक्षा घ्यायची होती. शिवाय उत्तम वकील होऊन गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे त्याने ठरवले होते. रिक्षावाल्याचे हे उदात्त विचार ऐकून मला मनोमन समाधान वाटले.

पुढे वाचा:

Leave a Reply