रात्र रागावली तर निबंध मराठी

माणसाला झोप किती प्रिय आहे ! रात्र झाली की माणूस सुखाची झोप घेतो. पण ही रात्र रागावली तर…! रात्र रागावली तर ती माणसांना सुखाची झोप यायला येणारच नाही. रात्र जर आली नाही, तर सूर्यसुद्धा मावळायचे विसरून जाईल. भल्या पहाटे उगवलेला सूर्य अस्ताचलाकडे जाणारच नाही. मग कोठली संध्याकाळ आणि कोठली रात्र ! चोवीस तास झगझगीत प्रकाश. संध्याकाळ झालीच नाही तर सकाळीच घरट्यांतून बाहेर पडलेले पक्षी आपल्या घरट्यांकडे कसे परतणार? मग त्यांची बाळे घरट्यांत वाट पाहून पाहून थकतील.

माणसे निदान घड्याळाकडे पाहून तरी आपले काम थांबवतील; पण सूर्याच्या भगभगीत प्रकाशात त्यांना शांत झोप लागणार नाही. झोप नाही म्हणजे त्यांचा थकवा जाणार नाही. नवीन काम करायला हुरूप येणार नाही. छोट्या बाळांना मात्र बरे वाटेल, कारण रात्र रागावली तर अंधार होणार नाही. अंधार नाही म्हणजे बागुलबुवा नाही, म्हणून लहान मुलांना काही काळ बरे वाटेल; पण नंतर त्यांना आपल्या चंदामामाचा विरह जाणवू लागेल.

रात्र नाही म्हणजे चांदोबा नाही. त्याचे प्रसन्न चांदणे नाही. ‘चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ असे लहान मुले कोणाला विचारणार? चांदण्या नाहीत म्हणजे चकचकीत टिकल्यांचे आकाश नाही. मग आमच्या कविमंडळींना स्फूर्ती कशी येणार?

रात्र रागावली तर गोड गोड स्वप्ने कोण दाखवणार? प्रत्यक्षात ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, त्या आपल्याला स्वप्नात लाभतात. रात्र नाही म्हणजे शीतलता नाही, स्वास्थ्य नाही. रात्र कधीच झाली नाही तर सूर्योदयाचे महत्त्व उरणार नाही. रम्य उष:काल किंवा अरुणोदय होणार नाही. रात्र रागावली तर त्याचा परिणाम झाडावेलींवर होणार. रात्रीच्या अंधारात फुलणारी पांढरी, सुगंधी फुले कशी फुलणार? रातराणी कधीच हसणार नाही. कमलिनी सदा फुललेल्या राहतील आणि कुमुदिनी कधीच फुलणार नाहीत.

रात्र रागावली तर-रात्री वावरणारे प्राणी दुःखी होतील. चोरांचा धंदा बसेल. उंदरांची उपासमार होईल. वाघाला शिकार मिळणार नाही. मग सगळेजण विनवू लागतील,”रात्री, रात्री, तू रागावू नकोस, आमच्यावरती रुसू नकोस.”

पुढे वाचा:

Leave a Reply