वृक्ष आपले मित्र मराठी निबंध – Essay On Tree Our Best Friend In Marathi
मित्र कोणास म्हणावे? जो संकटात उपयोगी पडतो आणि जो सतत मदत करतो त्यालाच मित्र म्हणावे. पण खरोखरच या विश्वात, निसर्ग आपला खरा मित्र समजावा. त्यातही वृक्षच आपले खरे मित्र आहेत. वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे असे संतांनी उगाच म्हटले नाही. वृक्ष स्वत: उन्हात उभे राहून आपल्याला सावली देतात. सतत वर्षभर विविध प्रकारची पाने, फुले व फळे देतात. वृक्षांची पाने आपण पूजेसाठी, औषधोपचारासाठीसुद्धा वापरतो.
घरासाठी, फर्निचरसाठी लागणारे लाकूड वृक्षच आपल्याला देतात. जनावरांसाठी चारा, प्राण्यांना संरक्षण आपल्याला वृक्षांपासूनच मिळते. पक्षी आपली घरटी वृक्षांवरच बांधतात.
लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते वृद्धांना उपयोगी पडणारी काठीही वृक्षांपासूनच बनते. आणि म्हणून मला तरी असे वाटते की वृक्षच आमचे मित्र आहेत.
वृक्ष-मानवाचा जिवलग मित्र – वृक्ष आपले मित्र निबंध मराठी, Vruksha Aaple Mitra Essay in Marathi
जे वृक्ष लाविती सर्व काळ ।
तयांवरी छत्रांचे छल्लाळ ।
जे ईश्वरी अर्पती फळ ।
नानाविध निर्मळ।
संत नामदेवांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना वरील उद्गार काढले आहेत. वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून गाइली गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज – या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत.
विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ‘प्राणवायू’ हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.
वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.
स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.
पुढे वाचा:
- जर वीज नसती तर मराठी निबंध
- विहिरीचे मनोगत निबंध मराठी
- विवाहाचे दृश्य निबंध मराठी
- विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?
- विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा
- विज्ञान एक वरदान निबंध मराठी
- विज्ञान युगातील माणूस मराठी निबंध
- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
- वायु प्रदूषण निबंध मराठी
- लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध मराठी
- बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी
- वाचवील पाणी, साठवील पाणी