विज्ञान एक वरदान निबंध मराठी – Vidnyan Ak Vardan Marathi Nibandh

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. मानवाने समुद्राच्या तळाचा वेध घेतला, पर्वतशिखरांवर पाय रोवले, चंद्रावर पाऊल ठेवले आणि आता इतर ग्रहांवर पोहोचण्याच्या तयारीत आहे. विज्ञानाने मानवाला प्रत्येक क्षेत्रात प्रयोग करण्याची स्फूर्ती दिली. आपले जीवन पूर्णपणे विज्ञानाद्वारे नियंत्रित होते. त्यामुळे जग जवळ आले. विज्ञान पृथ्वीसाठी कामधेनू आहे. त्यामुळे मानवाचे जीवन सुखी होण्यास मदत होते, प्रगती होते. विज्ञानामुळे आंधळ्याला डोळे दिले जाऊ शकतात, कृत्रिम पाय लावून मानव चालू शकतो, आकाशात भरारी घेऊ शकतो.

आपल्या आवश्यकतेसाठी मानव नवे नवे शोध लावतो. मोटरसायकल, कार, विमानाचा शोध लागल्यामुळे काही दिवसांचा प्रवास काही तासांत होतो. टेलिफोनमुळे देश-विदेशांतील व्यक्तींशी बोलता येते. जीवन संगीतमय बनविण्यासाठी दूरदर्शन, टेप, रेडियो यांची मदत होते. माणसाने पेन-पेन्सिल बनवून लेखन कला समृद्ध केली. पाण्यापासून जलविद्युत निर्माण करून अमावास्येची रात्र पौर्णिमेत परिवर्तीत केली. बहिरे, आंधळे, मुके यांच्यासाठी निरनिराळ्या यंत्रांचा शोध लावण्यात आला. एक्स-रे चा शोध लागल्यानंतर मानवाच्या शरीराच्या आतल्या अवयवांचा फोटो काढता येऊ लागला. उष्णता कमी करण्यासाठी कुलर, पंखे तर थंडी दूर करण्यासाठी हिटरचा शोध लागला. शेतीसाठी नवनव्या अवजारांचा शोध विज्ञानामुळेच लागला. गॅस, वॉशिंग मशिन, कीटकांचा नाश करण्यासाठी विषारी औषधे, स्वास्थ्यवर्धक इंजेक्शने, हृदयरोपण, शल्यचिकित्सा, प्लास्टिक सर्जरी, शिलाई यंत्र, पिठाची गिरणी, संगणक, इ० अनेक वस्तू विज्ञानाच्या शोधांमुळेच शक्य झाल्या. कॉम्प्यूटर्स, इंटरनेट, मोबाईल, कम्युनिकेशन, सॅटेलाइट्स यामुळे दूर-दूर अंतरावर संपर्क करणे सापे झाले. अशा प्रकारे विज्ञानाचे अनेक फायदे आहेत.

परंतु, विज्ञानाचे फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. क्षेपणास्त्रे, बाँब हे विज्ञानाचेच शोध आहेत. त्यामुळे मानवाचे अतोनात नुकसान झाले, सगळी कामे यंत्राद्वारे होत असल्यामुळे मानव आळशी झाला. दहा व्यक्तींचे काम एक यंत्र करीत असल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येत वाढ झाली. टिव्ही, कंप्यूटर यामुळे आपली कामे सोपी झाली खरी पण आपण या यंत्रांवर अधिक प्रमाणात विसंबून राहू लागतो. साध्या-साध्या कामांसाठीही कंप्यूटरची मदत घ्यावी लागते.

अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे मानवाच्या गरजांची पूर्ती विज्ञान करते. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्याच्या विजयाची पताका फडकत आहे. विज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे सर्वस्वी मानवावर अवलंबून आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर ते एक वरदान अन्यथा तो शाप आहे.

विज्ञान एक वरदान निबंध मराठी – Vidnyan Ak Vardan Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply